Crime News : किरकोळ वादातून एका पोटच्या मुलाने आपल्या 55 वर्षीय आईची गळा दाबून निर्घृण हत्या केली. निर्मला देवी असे मृत महिलेचे नाव असून, आरोपी मुलगा संजय दास याने हत्येनंतर आईचा मृत्यू हार्ट अॅटॅकमुळे झाल्याचे सांगून दिशाभूल केली. मात्र, संशय बळावल्याने रात्री उशिरा ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली, ज्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. उत्तर प्रदेशातील मेरठ परिसरातील ही घटना आहे.
ADVERTISEMENT
श्वास थांबत नाही तोपर्यंत..
मिळालेल्या माहितीनुसार, संजय दास हा हरिद्वारमध्ये नोकरी करतो आणि दोन दिवसांपूर्वीच घरी परतला होता. शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास आईने त्याला कोणत्या तरी कारणावरून रागावले, ज्याचा राग अनावर होऊन त्याने आईचा गळा दाबला. संजयने पोलिसांना कबूल केले की, जोपर्यंत आईचा श्वास थांबत नाही, तोपर्यंत त्याने गळा सोडला नाही. हत्येनंतर तो शांतपणे मृतदेहापाशी बसून राहिला आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांना आईचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवू लागला.
हे ही वाचा : जिच्यावर विश्वास ठेवला, तिनेच पाठीत खंजीर खुपसला; मोलकरणीने मालकीणीला का संपवलं?
पोटच्या मुलाचीही हत्या
संजय दास हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याने यापूर्वीही त्याने एक हत्या केली आहे. दीड वर्षांपूर्वी 2024 मध्ये त्याने आपल्या अवघ्या 21 दिवसांच्या मुलाला जमिनीवर आपटून ठार मारले होते. या प्रकरणी स्वतःच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर त्याला जेल झाली होती. सुमारे सात ते आठ महिन्यांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. मुलाच्या हत्येनंतर त्याची पत्नी घर सोडून कायमची माहेरी निघून गेली होती, तरीही त्याच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही.
हे ही वाचा : वाशिम : घराच्या अंगणातच अल्पवयीन मुलीवर 19 वर्षीय तरुण करत होता अत्याचार, मुलीच्या वडिलांनी बघताच..
आरोपी मानसिक रुग्ण असल्याचा दावा
पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात आरोपी मानसिक रुग्ण असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी त्याला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले असून मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, स्वतःच्या पोटच्या मुलाचा बळी घेणाऱ्या या नराधमाने आता जन्मदात्या आईचाही जीव घेतल्याने परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.
ADVERTISEMENT











