वाशीम : साहेब बायकोची बॉडी गाडीत आहे, 3 चिमुकल्यांना घेऊन नवरा पोलीस ठाण्यात; अन्...

मुंबई तक

• 07:22 AM • 15 Jul 2026

washim crime news : वाशिममध्ये पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती तीन लहान मुलांसह थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. "माझ्या गाडीत पत्नीचा मृतदेह आहे," असे सांगत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

washim crime news

washim crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

वाशीम : साहेब बायकोची बॉडी गाडीत आहे

point

3 चिमुकल्यांना घेऊन नवरा पोलीस ठाण्यात; अन्...

washim crime news, जका खान  : महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात सोमवारी सकाळी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात सकाळच्या सुमारास एक कार येऊन थांबली. त्यातून उतरलेल्या एका व्यक्तीने थेट पोलीस ठाण्यात जाऊन, "साहेब, माझ्या गाडीत माझ्या पत्नीचा मृतदेह आहे, मीच तिची हत्या केली आहे," अशी कबुली दिली. हे ऐकताच पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी क्षणभर स्तब्ध झाले. या घटनेमुळे पोलीस यंत्रणेत एकच खळबळ उडाली. आरोपीने स्वतःहून पोलीस ठाण्यात येऊन गुन्ह्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने पुढील हालचाली सुरू केल्या.

हे वाचलं का?

हेही वाचा : बायकोनं गरीब नवऱ्याच्या डोक्यात मोबाईल घातला, कोच पडून भळाभळा रक्त, अखेर दुर्दैवी अंत

लोखंडी रॉडने पत्नीच्या डोक्यावर जोरदार वार

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील कलौदा येथील रहिवासी सलमान खान हा स्वतःला व्यवसायाने बिल्डिंग ठेकेदार असल्याचे सांगतो. तो पत्नी हसीना बानो आणि तीन लहान मुलांसह महाराष्ट्रातील नाशिककडे निघाला होता. वर्धा शहरातून समृद्धी महामार्गावर आल्यानंतर प्रवासादरम्यान पती-पत्नीमध्ये संशयाच्या कारणावरून वाद झाला. हा वाद वाढत गेल्यानंतर आरोपीने समृद्धी महामार्गावर कार थांबवली. त्यानंतर त्याने लोखंडी रॉडने पत्नीच्या डोक्यावर जोरदार वार केला. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाली. मात्र, एवढ्यावरही आरोपी थांबला नाही. त्याने पत्नीच्या ओढणीने तिचा गळा आवळून तिची हत्या केल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा : 'कायदा सर्वांना समान', चुकीच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींना तुकाराम मुंढेंचा इशारा

बॉडी घेऊन समृद्धी महामार्गावर तब्बल 60 ते 70 किलोमीटरचा प्रवास

पत्नीचा मृतदेह कारमध्येच ठेवून आरोपीने तीन लहान मुलांसह समृद्धी महामार्गावर तब्बल 60 ते 70 किलोमीटरचा प्रवास केला. त्यानंतर त्याने समृद्धी महामार्ग सोडून पहाटे सुमारे पाच वाजता कारंजा शहरातील ग्रामीण पोलीस ठाणे गाठले आणि ड्युटीवरील पोलिसांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण पोलिसांनी तत्काळ कारंजा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमर चोरे यांना माहिती दिली. त्यानंतर ठाणेदार अमर चोरे यांनी आरोपी, त्याची तीन मुले आणि पोलिसांचे पथक घेऊन घटनास्थळाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधार असल्यामुळे आरोपीला नेमके घटनास्थळ ओळखता आले नाही. त्यानंतर आरोपी आणि त्याच्या चार वर्षांच्या मुलीला, दोन वर्षांच्या मुलाला तसेच एका वर्षाच्या चिमुकल्याला कारंजा शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

या संपूर्ण घटनेची गंभीरता त्या तीन निष्पाप मुलांना मात्र माहीत नव्हती. पोलीस ठाण्यात ते निरागसपणे इकडून तिकडे फिरत होते आणि खेळत होते. त्यांच्या निष्पाप वागण्याने पोलीस कर्मचाऱ्यांचेही मन हेलावून गेले. पोलीस कर्मचारी त्या चिमुकल्यांना बिस्किटे देताना आणि पाणी पाजताना दिसून आले. एका बाजूला कारमध्ये आईचा मृतदेह आणि दुसऱ्या बाजूला त्या घटनेपासून पूर्णपणे अनभिज्ञ असलेली तीन लहान मुले, असे अत्यंत हृदयद्रावक चित्र कारंजा शहर पोलीस ठाण्यात पाहायला मिळाले.