वर्षभरापूर्वी लव्ह मॅरेज, जुळी मुलं गर्भात वाढत असताना पत्नीची हत्या, अनैतिक संबंधांचा संशय

मुंबई तक

• 06:55 AM • 15 Jul 2026

crime news : पंजाबमध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशयातून आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात तिच्या गर्भातील जुळ्या बाळांचाही मृत्यू झाला असून, आरोपी पती फरार आहे.

punjab crime news

punjab crime news

Google CTA

बातम्या हायलाइट

point

वर्षभरापूर्वी लव्ह मॅरेज

point

जुळी मुलं गर्भात वाढत असताना पत्नीची हत्या

point

अनैतिक संबंधांचा संशय

crime news : पत्नीच्या कथित अनैतिक संबंधांच्या संशयातून एका तरुणाने आपल्या आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेत महिलेसह तिच्या गर्भात वाढणाऱ्या जुळ्या बाळांचाही मृत्यू झाला असून, एकाच वेळी तीन जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपी पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेमागील नेमके कारण आणि इतर बाबींबाबत अधिकृत माहिती दिली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : "1 किलो पनीरसाठी 5-6 लीटर दूध लागतं; मग 200 रुपयांमध्ये पनीर कसं मिळतं?"

जन्माआधीच दोन निष्पाप जीवांचाही मृत्यू

मृत महिलेची ओळख 22 वर्षीय सिमरजीत कौर अशी झाली आहे. तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमरजीतने सुमारे वर्षभरापूर्वी बुर्ज राठी गावातील सचप्रीत सिंह याच्यासोबत प्रेमविवाह केला होता. त्यानंतर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने त्यांचा विवाह विधिवत पार पडला होता. सिमरजीत आठ महिन्यांची गर्भवती होती आणि प्रसूतीसाठी ती आपल्या माहेरी आली होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तिच्या गर्भात जुळी बाळे वाढत होती. त्यामुळे या घटनेमुळे एका महिलेसह जन्माआधीच दोन निष्पाप जीवांचाही मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. ही घटना पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील ठूठियांवाली गावात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.

हेही वाचा : दुधातील भेसळ कशी ओळखाल? काय पाहायचं? तुकाराम मुंढेंचा महत्त्वाचा सल्ला

धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या

मृत महिलेच्या नातेवाईकांनी आरोपीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या दिवशी आरोपी दिवसा सासरी आला होता आणि काही वेळाने तेथून निघून गेला. त्यानंतर रात्री उशिरा त्याने सिमरजीतला फोन करून घराच्या बाथरूमजवळ बोलावले. तेथे त्याने धारदार शस्त्राने तिचा गळा चिरून हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या हल्ल्यात सिमरजीतचा जागीच मृत्यू झाला, तर तिच्या गर्भातील जुळ्या बाळांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबीयांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान,पोलिस चौकीचे प्रभारी मक्कन सिंह यांनी सांगितले की, या घटनेची माहिती गावच्या सरपंचांकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. मृत महिलेचे वडील सुखपाल सिंह यांच्या तक्रारीवरून आरोपी पती सचप्रीत सिंह याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांकडून छापेमारी सुरू असून, या प्रकरणातील प्रत्येक पैलूची सखोल चौकशी केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील सर्व तथ्यांची अधिकृत माहिती समोर येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.