Crime News: मध्य प्रदेशातील निवाडी जिल्ह्यात विवाहबाह्य संबंधातून धक्कादायक बातमी घडल्याचं समोर आलं आहे. येथे एक तरुणी विवाहित असून तिने आपल्या एक्स बॉयफ्रेंडसोबत असलेले प्रेमसंबंध सुरूच ठेवले. मात्र, त्या प्रियकराने संबंधित महिलेसोबत असं काही केलं, ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. आरोपी प्रियकराने आधी आपल्या विवाहित प्रेयसीसोबत संबंध बनवले, त्यानंतर तिची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह घरतच पुरला. इतकेच नव्हे तर, त्याच ठिकाणी पलंग टाकून तो त्याच्यावर झोपू लागला. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT
संबंधित प्रकरण हे रजपुरा गावातील असल्याची माहिती आहे. येथे राहणारी रोहिणी राजपूत नावाची एक विवाहित तरुणी बेपत्ता असल्यामुळे तिचा पती आणि कुटुंबियांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी यासंबंधी तपास केला असता रोहिणीचं लग्नाआधी रतिराम राजपूत नावाच्या एका तरुणासोबत अफेअर असल्याचं समोर आलं. मात्र, लग्न झाल्यानंतर सुद्धा ती तरुणी आपल्या एक्स बॉयफ्रेंडला भेटत राहिली. तपासादरम्यान, पोलिसांनी संशयाच्या आधारे महिलेच्या प्रियकराला ताब्यात घेतलं आणि त्याची कठोर चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्यावेळी आरोपीने रोहिणीची हत्या करून तिचा मृतदेह घरातच पुरल्याचं आरोपी प्रियकराने सांगितलं.
पतीला सोडण्यासाठी सुद्धा तयार होती...
आरोपीने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितलं की "रोहणीचे लग्नाआधी माझ्यासोबत प्रेमसंबंध होते. तिच्या लग्नानंतर सुद्धा आम्ही दोघे लपुनछपून भेटत होतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रोहणी माझ्यावर लग्नासाठी सतत दबाव आणत होती. आपल्या पतीला सोडून देणार असल्याचं ती नेहमी मला म्हणत होती." परंतु, रतिरामला रोहिणीसोबत लग्न करायचं नव्हतं असं आरोपीच्या चौकशीतून समोर आलं.
हे ही वाचा: मुंबईमध्ये प्लॉट घेण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांना घातला गंडा, आरोपींची 'ती' ट्रिक अन् तब्बल 6 लाख रुपये...
हत्येचा कट रचला अन् निर्घृण हत्या
प्रेयसीच्या वागण्याला वैतागून आरोपी प्रियकराने त्याच्या मित्रांसोबत मिळून आपल्या विवाहित प्रेयसीच्या हत्येचा कट रचला. 2 ऑक्टोबरच्या रात्री रतिरामने आपल्या प्रेयसीला त्याच्या गावातील एका घरात बोलावलं. तिथे त्याने पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि यादरम्यान, आरोपी पीडित तरुणीचा गळा दाबून तिची हत्या केली.
मित्रांसोबत मिळून मृतदेह जमिनीत पुरला अन्...
हत्येनंतर, आरोपीने त्याच्या मित्रांसोबत मिळून घरातील फरशीवर खड्डा खणला आणि त्यात पीडितेचा मृतदेह पुरला. मृतदेह पुरल्यानंतर, माती आणि शेणाने जमीन सारवली आणि त्यावर एक पलंग टाकून त्यावर दोन दिवस आरामात झोपला. प्रकरणाचा खोल तपास केल्यानंतर, पोलिसांनी आरोपीला अटक केली. परंतु, पोलीस कस्टडीत असताना आरोपी तरुण कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून अचानक फरार झाला.
हे ही वाचा: क्रिकेट हा निव्वळ व्यवसाय, त्यामध्ये खेळासारखं काही राहिलं नाही, सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्व टिप्पणी
सध्या, पोलीस प्रकरणाचा तपास करत असून आरोपी तरुणाचा शोध घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
