Bogus Voting in Municipal Elections : राज्यात सुरु असलेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी बोगस मतदानाचे प्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे अनेक ठिकाणी तणावपूर्ण वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागत आहे. सांगली, अहिल्यानगर, जालना आणि पुण्यात बोगस मतदान झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामुळे लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मतदान केल्यानंतर लावली जाणारी शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी, देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'निवडणूक आयोगाने..'
बोगस मतदानामुळे अहिल्यानगरमध्ये तणाव
मीनाक्षी शिवाजी चव्हाण या महिला अहिल्यागनरमधील प्रभाग क्रमांक 17-अ मध्ये मतदान करण्यासाठी गेल्या होता. मात्र मतदान केंद्रावर जाताच त्यांना धक्का बसला. त्यांच्या नावाचे मतदान आधीच झाले असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. यामुळे त्यांना नाईलाजाने मतदान न करताच घरी परतावे लागले. दरम्यान, प्रसार माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला. त्या म्हणाल्या की,'मी स्वतः मतदानासाठी आले असताना माझ्या नावावर कुणीतरी दुसऱ्याने मतदान करून गेले. त्यामुळे मला मतदानाचा हक्क नाकारण्यात आला.' येथील शिवसेनेचे उमेदवार अण्णासाहेब शिंदे यांनी या प्रकारावर आक्रमक भूमिका घेत निवडणूक यंत्रणेलाच थेट जाब विचारला. मतदार केंद्रात बसून जर कुणी दुसराच माझ्या नावावर मतदान करू शकत असेल, तर ही निवडणूक आहे की तमाशा? प्रशासन झोपेत होते का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
जालन्यात बोगस मतदान करणारा संशयित ताब्यात
जालन्यातील प्रभाग क्रमांक 9 मधील डबल जिन परिसरामध्ये एका मतदाराने बोगस मतदान केल्याचा संशय मतदान प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी संबंधित मतदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. संशयित मतदाराची सध्या पोलिसांकडून विचारपूस केली जात असून खात्री झाल्यानंतर पुढील कारवाई करणार असल्याचं पोलिसांची सांगितल. मधुकर देठे असं या संशयित बोगस मतदाराच नाव आहे. दरम्यान, संशयित मतदाराने कोणत्या नावाने मतदान केलं आहे, याची खात्री संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडून घेत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे.
हे ही वाचा : BMC Elections 2026 LIVE Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आतापर्यंत किती टक्के मतदान? पाहा, लाईव्ह अपडेट्स...
सांगलीतही बोगस मतदान
सांगली महापालिकेच्या प्रभाग 9 मध्ये बोगस मतदान झाल्याची घटना समोर आली आहे. मूळ मतदार इरफान शेख हे बूथ क्रमांक 13 याठिकाणी मतदान करण्यासाठी गेले होते. त्यांनी आपली स्लिप अधिकाऱ्यांना दाखवली तर त्याठिकाणी अगोदरच कोणीतरी मतदान करून गेल्याचे निदर्शनास आले. मतदान करायला न मिळाल्याने शेख संतप्त झाले असून सदर प्रकाराची निवडणूक अधिकाऱ्यांनी चौकशी करावी आणि लोकशाही शासनपद्धतीत मतदानाचा हक्क हिरावून घेतल्याबद्दल त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
ADVERTISEMENT











