हत्येच्या प्रकरणात ८ वर्षाचा तुरुंगावास झाला. शिक्षा भोगत असताना लॉकडाऊनच्या काळात पॅरोलवर बाहेर आला. त्यानंतर झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम सुरू केलं, पण बायकोची महागडे कपडे आणि वस्तूंची हौस पुरवण्याच्या नादात पुन्हा त्याच्या हातात बेड्या पडल्या. सामान चोरून फरार झालेल्या या डिलिव्हरी बॉयला मुंबईतील कुरार पोलिसांनी त्यांच्या हातावरील टॅटूच्या आधारे शोधून काढलं.
ADVERTISEMENT
झालं असं की मुंबईतील कुरार पोलिसांनी झोमॅटोच्या एका डिलिव्हरी बॉयला अटक केली. त्याला शॅडो फॅक्स कंपनीच्या डिलिव्हरी बॉयच्या सामानाची चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याच्या अटकेनंतर पोलिसांना त्याच्या गुन्ह्यांची कुंडलीच कळाली.
२५ मार्च रोजी रहेजा कॉम्प्लेक्समध्ये शॅडो फॅक्स कंपनीचा एक डिलिव्हरी बॉय काही घरगुती सामानाचं पार्सल देण्यासाठी आला होता. त्याच्याबरोबर बरेच पार्सल होते. त्याने इतर पार्सल कॉम्प्लेक्सच्या गेटबाहेर उभ्या केलेल्या मोटारसायकलवर ठेवले आणि एक पार्सल घेऊन आतमध्ये गेला.
त्याचवेळी झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मनीष गौड तिथे आला (वय ३०) आणि जवळपास कुणी नसल्याचं बघून मोटारसायकलवरील सामान घेऊन फरार झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सतीश भालेराव आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला.
पोलिसांनी चोरी झालेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांना चोरी करताना सीसीटीव्ही दिसले, मात्र त्याची ओळख पटत नव्हती. मात्र, पोलिसांना त्याच्या हातावर टॅटू असल्याचं आढळून आलं. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोधून घेऊन अटक केली.
अटक केल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता, तो मनीष गणेश नगरमधील एका व्यक्तीच्या हत्या प्रकरणातील आरोपी असल्याचं समोर आलं. हत्येच्या प्रकरणात त्याला ८ वर्षांची शिक्षा झालेली आहे. तो नागपूरमधील तुरुंगात होता. कोरोना काळात त्याला पॅरोल मिळाला. पॅरोलवर सुटल्यानंतर त्याने झोमॅटो कंपनीत डिलिव्हरी बॉयचं काम सुरू केलं होतं.
पोलिसांनी त्याला गणेशनगरमधून अटक केली आहे. इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये त्याने केलेल्या चोऱ्यांतील सामान आणि एक स्कूटर पोलिसांनी जप्त केलं आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, पत्नीला महागडे कपडे आणि वस्तुंची आवड आहे. पत्नीला खुश करण्यासाठी चोरी करत असल्याचं त्याने सांगितलं.
ADVERTISEMENT
