सध्या सोशल मिडियावर घटस्फोट सोहळ्याची चर्चा जोरात रंगली आहे. घटस्फोट सोहळ्याच्या व्हायरल झालेल्या सोहळ्याने तर साऱ्या महाराष्ट्राला अचंबित करून सोडले आहे. एवढंच बाकी राहील होत, आता हे ही पाहायला मिळाल, पुणे तिथे काय उणे, पाटलाचा नादच खुळा, लोक कशाचे सोहळे करतील सांगता येत नाही अशा कमेंट्सने तर हाहाकार माजवला आहे. घटस्फोट सोहळ्याची चाललेली जय्यत तयारी पाहता नक्की हा प्रकार काय आहे या विचाराने साऱ्यांनाच चिंतेत पाडले आहे. असा हा घटस्फोट सोहळा साऱ्यांनाच अचंबित करून सोडणारा आहे. चार दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला हा सोहळा काही घटस्फोट सोहळा नसून ‘मंगलाष्टक रिटर्न’ या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटा अंतर्गत असणाऱ्या चित्रीकरणाचा एक भाग आहे. नक्की घटस्फोट सोहळ्याची थीम काय आहे, हा आगळावेगळा सोहळा कशाचे भाकीत उलगडणार आहे याकडे साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या नजरा वळल्या आहेत. चित्रीकरणास सुरुवात होऊन अवघे चारच दिवस झाले असून या चित्रपटा अंतर्गत होणाऱ्या या घटस्फोट सोहळ्याने तर हाहाकारच माजवला आहे त्यामुळे प्रेक्षकांमधील चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘मंगलाष्टक रिटर्न’ चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक,आनंद इंगळे, सक्षम कुलकर्णी, वृषभ शहा, अभिनेत्री श्वेता खरात, प्रसन्ना केतकर, शीतल अहिरराव अभिनेता सुनील गोडबोले, कमलेश सावंत, समीर पौलस्ते अभिनेत्री प्राजक्ता नेवळे, सोनल पवार,भक्ती चव्हाण, शीतल ओस्वाल यांच्या ही दमदार भूमिका पाहायला मिळणार आहेत.
ADVERTISEMENT
लॉकडाउन नंतर चित्रपट सृष्टीला मिळालेल्या ग्रीन सिग्नल दरम्यान या ‘मंगलाष्टक रिटर्न’ चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला होता. दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित हा चित्रपट असून एका नव्या कोऱ्या विषयाचा आणि कोड्यात टाकणारा दमदार विषय घेऊन हा चित्रपट लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. हिंजवडी पुणे येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच घटस्फोट सोहळा असे नाव असलेल्या कमानीचा फोटो सर्वत्र व्हायरल झाला आहे. आणि फोटोसह बऱ्याच मनोरंजक अशा कमेंट्सचा माराही पाहायला मिळाला.दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मितीची धुरा निर्माता वीर कुमार शहा यांनी सांभाळली आहे. त्यांच्या ‘शारदा प्रॉडक्शन’ या प्रॉडक्शन हाऊसतर्फे या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘बाजार’ या चित्रपटातून अभिनेता, दिग्दर्शक योगेश भोसले प्रेक्षकांच्या समोर आला. ‘बाजार’ या त्यांनी केलेल्या दिग्दर्शित चित्रपटाला 16 अवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. आता त्यांचा ‘मंगलाष्टक रिटर्न’ हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. त्यामुळे या अचंबित करून टाकणाऱ्या सोहळ्याची नेमकी कथा काय असेल याची साऱ्या सिनेरसिकांना उत्सुकता लागून राहिली आहे. आता हा चित्रपट सिनेरसिकांच्या भेटीस केव्हा येतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
ADVERTISEMENT











