दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. मुंबईतल्या मिल संस्कृतीवर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलमध्ये काही दृष्यांवर आक्षेप घ्यायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही या ट्रेलरमधील दृष्यांवर आक्षेप घेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याकडे तक्रार केली आहे.
ADVERTISEMENT
१४ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटाचं पोस्टर महेश मांजरेकर यांनी बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात रिलीज केलं होतं. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर यातील काही भडक दृष्यांची चर्चा होत आहे. या दृष्यांमध्ये एक अल्पवयीन मुलगा आणि एक महिला आक्षेपार्ह स्थितीत दाखवण्यात आले आहेत. अनेकांनी याविषयी आपली नाराजी व्यक्त केल्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगानेही याची दखल घेतली आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केल्यानंतर महेश मांजरेकर यांनी आपलं मत मांडलं होतं. मुंबईच्या जंगलातला हा धूर कोणालाच सुखासुखी जगू द्यायचा नाही, सगळ्यांची वाट लागणार…काँक्रिटच्या जंगलातलं वास्तव या टॅग लाईनने हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलवरुन वाद झाल्यानंतरही मांजरेकर आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याचं चित्र पहायला मिळत होतं. त्यामुळे महिला आयोग आणि केंद्रीय माहिती व प्रसारण खातं याविषयी आता नेमकं काय पाऊल उचलतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
