Abhijit Dipke : NEET पेपर लीक प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले असून, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजित दिपके आता भारतात परतणार आहेत. 6 जून रोजी शनिवारी सकाळी ते भारतात परतणार असून, शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवणार आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा : जालना हादरलं! विम्यासाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव, कारमध्ये कोणाचा दिला बळी?
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
अभिजित दिपके यांनी या आंदोलनाचे आवाहन करताना म्हटले आहे की, आता वेळ आली आहे की आपण सर्वांनी एकत्र येत भारतीय संविधानाच्या मार्गावर चालत, शांततापूर्ण पद्धतीने शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली पाहिजे. आपण सर्वजण एकत्र आलो तर आपली मागणी निश्चितपणे ऐकली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. गेली काही दिवस सोशल मीडियावर या मागणीसाठी मोठा जनआक्रोश दिसून येत असून, 8 लाख विद्यार्थ्यांनी या याचिकेला पाठिंबा दिला आहे. लखनौ, जयपूर आणि महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी आंदोलने होऊनही सत्ताधाऱ्यांवर कोणताही परिणाम होताना दिसत नाही, ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा : सांगली : वरिष्ठ लिपिकाची महिला सहकाऱ्याकडे नको ती मागणी, एसटी विभागीय कार्यालयात काय घडलं?
लोकशाही मार्गाने संघर्षाची तयारी; अटकेच्या शक्यतेवरही ठाम भूमिका
NEET चे 22 लाख, CBSE चे 17 लाख, CUET चे 16 लाख आणि SSC GD चे 40 लाख असे मिळून एक कोटीहून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य सध्या धोक्यात आले आहे. इतका मोठा गोंधळ आणि पेपर लीकच्या घटना घडल्यानंतरही जर शिक्षणमंत्र्यांनी राजीनाम्याची जबाबदारी स्वीकारली नसेल, तर देशात उत्तरदायित्व नावाची गोष्ट उरलेली नाही, असा आरोप दिपके यांनी केला आहे. ते दिल्लीत पोहोचल्यानंतर विमानतळावर समर्थकांना भेटून त्यानंतर संसद मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलनासाठी अधिकृत परवानगी मागणार आहेत. भारतीय संविधान आपल्याला अन्यायाविरुद्ध शांततेने आवाज उठवण्याचा पूर्ण अधिकार देते, त्याच चौकटीत राहून हा लढा लढला जाईल. अटकेच्या शक्यतेवर बोलताना ते म्हणाले की, माझ्या कुटुंबीयांना माझ्या अटकेची भीती आहे, परंतु लोकशाही देशात शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार असल्यामुळे मला विश्वास आहे.
आणि राहिली गोष्ट जेलच्या भितीची - भीतीमध्ये जगून आता किती दिवस चालणार? हा देश कोणत्याही एका पक्षाचा नसून आपल्या सर्वांचा आहे, असे स्पष्ट करत त्यांनी तरुणांना या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेत नोकरीचे अनेक पर्याय उपलब्ध असतानाही केवळ देशप्रेमापोटी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आपण भारतात परतत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गांधी, आंबेडकर, भगतसिंग आणि नेहरू यांचा आदर करणारा नागरिक म्हणून, संविधानावर पूर्ण विश्वास ठेवून हा लढा दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला असताना कोणीतरी येऊन आवाज उठवेल याची वाट पाहण्यापेक्षा, सर्वांनी मिळून एकत्र येण्याची हीच योग्य वेळ आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात 6 जूनच्या या आंदोलनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT











