Nana Patekar Death : भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. आज पहाटे (8 ऑक्टोबर) गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अचानक जाण्याने कलाक्षेत्रासह संपूर्ण महाराष्ट्रावर आणि देशभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नाना पाटेकर यांचा अजित पवार यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
ADVERTISEMENT
अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी मनाला अक्षरशः चटका लावणारी आहे. अभिनयाचा अस्सल आविष्कार आणि संवेदनशील सामाजिक जाणिवांचा सुंदर संगम असलेल्या नानांनी रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या दमदार अभिनयाने असंख्य व्यक्तिरेखा अजरामर केल्या. ‘नटसम्राट’, ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’ यांसारख्या कलाकृतींमधून त्यांनी आपल्या अभिनयाची अमीट छाप उमटवली. नाना पाटेकर यांचे दादांशी अतिशय जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने झालेली पोकळी माझ्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठीही विशेष दुःखद आहे.
कलेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी समाजातील वंचित घटक आणि शेतकरी बांधवांसाठी केलेले कार्यही सदैव प्रेरणादायी राहील. आज अभिनयविश्वातील एक संवेदनशील मन, एक दमदार आवाज आणि एक अस्सल कलाकार हरपला आहे. या अष्टपैलू, संवेदनशील कलाकाराला माझी भावपूर्ण श्रद्धांजली. नानांच्या स्मृती, त्यांच्या भूमिका आणि त्यांचे अमूल्य योगदान सदैव आपल्या मनात जिवंत राहील."
हे ही वाचा : 'मला अस्वस्थ वाटू लागलंय', नाना पाटेकरांनी पहाटे मित्राला कळवलं, गोव्यात काय घडलं?
शरद पवारांनीही वाहिली श्रद्धांजली
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, "ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे दुःखद वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असामान्य, संवेदनशील आणि प्रभावी पर्व आज संपले आहे. आपल्या दमदार अभिनयाने, आगळ्या संवादफेकीने आणि प्रत्येक भूमिकेतील विलक्षण सहजतेने त्यांनी रसिकांच्या मनावर कायमची अमिट छाप उमटवली. परिंदा, क्रांतिवीर, अग्निसाक्षी, अब तक छप्पन, वेलकम, नटसम्राट अशा अनेक चित्रपटांमधून त्यांच्या अभिनयाचे विविध पैलू रसिकांना अनुभवायला मिळाले.
कलाकार म्हणून यशस्वी असतानाच सामाजिक प्रश्नांप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि नाम फाउंडेशनच्या माध्यमातून केलेली कृतिशील समाजसेवा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तितकाच प्रेरणादायी पैलू होता. त्यांच्या निधनाने भारतीय कलाविश्वाने एक संवेदनशील आणि प्रतिभावान कलाकार, तर समाजाने एक कृतिशील व सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या अभिनयाची, विचारांची आणि सामाजिक कार्याची अमिट छाप सदैव स्मरणात राहील. नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!"
पहाटे काय घडलं?
आज पहाटे नाना पाटेकर नाना पाटेकर यांना सकाळी छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या होत्या. त्यांनी अस्वस्थ वाटतंय म्हणून त्यांच्या मित्रालाही फोन केला होता. यानंतर वैद्यकीय पथकाला तातडीने त्यांच्या फ्लॅटवर पाठवण्यात आले. तेथे पोहोचल्यावर नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत आढळले. वैद्यकीय पथकाने त्यांना तातडीने कार्डियाक मसाज दिला आणि रुग्णालयात नेले, जिथे गोव्याच्या मणिपाल रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने सकाळी 5:20 वाजता त्यांना मृत घोषित केले.
हे ही वाचा : क्षणात जीव घेणारा आजार! नाना पाटेकर यांच्या निधनानंतर कार्डियक अरेस्ट चर्चेत, हृदयविकारापेक्षा नेमकं काय वेगळं?
प्रेक्षकांच्या मनावर गाजवले अधिराज्य
नाना पाटेकर यांच्या अशा अकस्मात जाण्याने मनोरंजन विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या दमदार अभिनयशैलीने आणि कणखर व्यक्तिमत्त्वाने त्यांनी अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. या दुःखद प्रसंगी संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि चाहते त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत.
ADVERTISEMENT











