Ajit Pawar on Pune and Pimpri Chinchwad municipal corporations Election Results : पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक निकालात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, भाजपने दोन्ही महापालिकांमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. पुणे महानगरपालिकेत अजूनही अनेक प्रभागांमध्ये मतमोजणी सुरू असल्याने अंतिम निकालाला उशीर होत आहे. प्रभाग क्रमांक 24, 41, 38, 9, 26, 31, 32, 30 आणि 12 मध्ये मतमोजणीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पुण्यातील चित्र स्पष्ट होण्यासाठी आणखी काही वेळ लागणार आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, पुणे महानगरपालिकेत आतापर्यंत भाजप 111 जागांवर आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. याउलट राष्ट्रवादी काँग्रेस 17 जागांवर तर काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर आहे. हा निकाल राष्ट्रवादीसाठी अपेक्षेप्रमाणे नसल्याचं चित्र असून, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतही पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निकालांमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. निकाल स्वीकारत त्यांनी जनतेच्या निर्णयाला सर्वोच्च मान देत असल्याचं स्पष्ट केलं. “जनतेचा कौल हा सर्वोच्च आहे आणि तो आम्ही पूर्ण आदरानं स्वीकारतो. विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
तसेच, जिथे अपेक्षित यश मिळालं नाही तिथे आत्मपरीक्षण करण्याची भूमिका त्यांनी मांडली. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत जिथं अपेक्षित यश मिळालं नाही, तिथं जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी आम्ही अधिक जबाबदारीनं, प्रामाणिकपणे आणि दुप्पट जोमानं काम करत राहू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पराभवातून बोध घेऊन पुढील काळात अधिक प्रभावीपणे काम करण्याचा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
यासोबतच अजित पवार यांनी विजयी उमेदवारांकडून अपेक्षा व्यक्त करताना म्हटलं की, “यश मिळवलेल्या सर्व उमेदवारांनी आपापल्या महानगरपालिकांमध्ये जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकास आणि लोककल्याणाच्या कामांना गती द्यावी.” तसेच जे उमेदवार विजयी होऊ शकले नाहीत, त्यांनीही निराश न होता जनतेसाठी कार्यरत राहावं, केंद्रस्थानी नेहमी जनतेचं भलं ठेवावं, असं आवाहनही त्यांनी केलं.
एकूणच पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील हा निकाल सत्ताधारी आणि विरोधकांसाठी महत्त्वाचा मानला जात असून, अंतिम निकालानंतर पुढील राजकीय समीकरणं कशी बदलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर जालना महापालिका निवडणुकीत विजयी
ADVERTISEMENT











