Ajit Pawar NCP on Ruapali Chakankar and Rupali Patil Thombare conflict : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) आणि रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) दोन महिला नेत्यांमधील संघर्ष गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. रूपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पदाची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. तर रूपाली ठोंबरे या पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या आहेत. एकाच पक्षातील या दोन नेत्यांमधील वाद आता शिगेला पोहोचला आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रूपाली ठोंबरे यांना शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे.
ADVERTISEMENT
अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून रुपाली ठोंबरेंना नोटीस
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याबाबत माध्यमांशी बोलताना केलेले वक्तव्य हे पक्षशिस्तीचे उल्लंघन असल्याचे नमूद करून पक्षाचे संघटन सरचिटणीस संजय खोडके यांनी ठोंबरे यांना सात दिवसांत खुलासा देण्याचे निर्देश दिले आहेत.
फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणात रूपाली ठोंबरे यांनी चाकणकर यांनी मृत तरुणीचे चारित्र्यहनन केल्याचा आरोप करत त्यांच्यावर तीव्र टीका केली होती. या वादाची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसने ठोंबरे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे की, आपण पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून जबाबदारी सांभाळत असताना पक्षाच्या वरिष्ठ महिला नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा यांच्याबाबत माध्यमांत केलेले वक्तव्य हे पक्षशिस्त भंग करणारे आहे. त्यामुळे आपल्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई का करू नये, याबाबत खुलासा सात दिवसांच्या आत करावा, अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. या नोटीसीची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनाही देण्यात आली आहे.
नोटीस बजावल्यानंतर रुपाली ठोंबरेंची पहिली प्रतिक्रिया
याबाबत प्रतिक्रिया देताना रूपाली ठोंबरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले की, “पक्षाकडून महिला आयोगाच्या अध्यक्षांविषयी केलेल्या वक्तव्याबाबत खुलासा मागण्यात आला आहे. परंतु सात दिवसांचा कालावधी फारच कमी आहे. मी वैयक्तिक हितसंबंध, हगवणे प्रकरण आणि आमच्या भगिनी कैलासवासी डॉ. संपदा मुंडे यांच्या चारित्र्यहनन प्रकरणासह संपूर्ण बाबींचा सविस्तर खुलासा करणार आहे. ज्यांनी मयत भगिनीचे चारित्र्यहनन केले, त्यांच्या बाबतीत मी काय खुलासा द्यावा?” असे ठोंबरे यांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मैदानावर असताना मासिक पाळी आल्यास महिला क्रिकेटपटू काय करतात? जेमिमा रॉड्रीग्जचं उत्तर ऐकून अंगावर काटा येईल
ADVERTISEMENT











