CJP Pune Protest : पुण्यामध्ये 'कॉक्रोच जनता पार्टी'चे (सीजेपी) अभिजित दिपके यांची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडली. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या 'कॉक्रोच मीम'वरून या अनोख्या आंदोलनाचा जन्म झाला आहे. या पत्रकार परिषदेमध्ये अभिजित दिपके यांनी शिक्षणा संदर्भातले विविध मुद्दे मांडले. अवघ्या 15 दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या चळवळीला सोशल मीडियावर 48 तासांत लाखो फॉलोअर्स मिळाले असून, आता हे आंदोलन थेट रस्त्यावर उतरले आहे. अमेरिकेतील नोकरीची संधी सोडून भारतात परतलेला अभिजित सध्या रस्त्यावर उतरून या आंदोलनाला प्रत्यक्ष स्वरूपात किती लोकांचा पाठिंबा मिळतोय, याची चाचपणी करत आहे.
ADVERTISEMENT
गांधी-आंबेडकरांच्या विचारांची भेट
या पत्रकार परिषदेपूर्वी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कायदेतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे, विश्वंभर चौधरी आणि विजय कुंभार यांनी अभिजित दिपके यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या भेटीदरम्यान असीम सरोदे यांनी अभिजितला महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट दिली. आंदोलन यशस्वी करायचे असेल, तर 'शांतता आणि अहिंसा' ही पहिली पूर्वअट असल्याचे त्यांनी अभिजितला वयाने मोठे म्हणून सांगितले. तसेच, या आंदोलनाची संपूर्ण कार्यकारी समिती 35 वर्षांखालील तरुणांची असावी, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. नवीन विचार करू शकणारा तरुण मेंदूच हे आंदोलन पुढे नेऊ शकतो; त्यामुळे स्वतः मार्गदर्शक मंडळात राहून तरुणांना सक्षम करण्यास हे ज्येष्ठ कार्यकर्ते तयार आहेत.
हे ही वाचा : '370 रुपयांची बिर्याणी'.. अन् प्रणित मोरेचा तर बाजारच उठला!
चुका करुन शिकण्याचा अधिकार
डिजिटल विश्वातील हॅशटॅग आणि फॉलोअर्सच्या पलीकडे जाऊन 35 ते 40 अंश तापमानात रस्त्यावर उतरून लढण्याचे मोठे आव्हान या पिढीसमोर आहे. इतिहास पाहता स्वातंत्र्य संग्राम असो वा जेपी आंदोलन, सर्वच मोठी आंदोलने तरुणांनीच यशस्वी केली आहेत. आजची 'जनरेशन झेड' (Gen Z) ही केवळ भावनिक नसून अत्यंत स्मार्ट आणि स्वावलंबी आहे. आयटी आणि विविध क्षेत्रांत काम करणारी ही मुलं सक्षम असल्याने ती कोणावरही अवलंबून नाहीत. सुरुवातीच्या काळात या आंदोलनात काही अंशी विस्कळीतपणा किंवा नियोजनाचा अभाव दिसू शकतो, परंतु प्रत्येक पिढीला चुका करून शिकण्याचा अधिकार असतो, असा विश्वास ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा : Personal Finance: 'ही' कागदपत्रं असतील तरच खरेदी करा सेकंड हँड गाडी, नाहीतर...
शिक्षण व्यवस्थेतील बदलाचा अजेंडा आणि भविष्यातील दिशा
केवळ घोषणाबाजी न करता या आंदोलनाला एक ठोस वैचारिक गाभा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पेपर फुटी, ऑनलाइन गुणांमधील गोंधळ आणि बोगस भरती घोटाळे यामुळे आजचा तरुण वर्ग भरडला गेला आहे आणि तो प्रचंड घाबरलेला आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणे हा केवळ सुरुवातीचा टप्पा असून, शिक्षण व्यवस्था कशी बदलायची, ती सर्वांसाठी स्वस्त आणि दर्जेदार कशी करायची, यावर धोरण ठरवणे गरजेचे आहे. अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी लवकरच तज्ज्ञांच्या मदतीने या विषयावर एक निश्चित धोरण जाहीर करणार आहेत. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आंदोलने जिवंत राहणे आवश्यक आहे, त्यामुळे या चळवळीला वाढण्याची संधी आणि शुभेच्छा दिल्या पाहिजेत.
ADVERTISEMENT











