पुणे: पुण्यात ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे अभिजीत दिपके यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिक्षण व्यवस्थेशी संबंधित विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली आणि पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरे दिली. मात्र, या पत्रकार परिषदेपूर्वी अभिजीत दिपके यांची ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि वकील असीम सरोदे तसेच सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्याशी महत्त्वपूर्ण भेट झाली होती. त्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत दोघांनीही सविस्तर माहिती दिली.
ADVERTISEMENT
विश्वंभर चौधरी यांनी सांगितले की, त्यांनी आणि असीम सरोदे यांनी अभिजीत दिपके यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. सर्वप्रथम त्यांनी गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो भेट म्हणून दिला. त्यामागचा उद्देश स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, कोणतेही आंदोलन यशस्वी व्हायचे असेल तर त्याचा पाया शांतता आणि अहिंसा या मूल्यांवर आधारित असला पाहिजे.
त्याचबरोबर त्यांनी आणखी एक महत्त्वाचा सल्ला दिला. आंदोलनाची कार्यकारिणी आणि नेतृत्व शक्यतो ३५ वर्षांखालील तरुणांच्या हाती असावे, असे त्यांनी सांगितले. नवीन विचार, नवीन ऊर्जा आणि बदलाची इच्छा असलेली पिढीच समाजात परिवर्तन घडवू शकते, असे त्यांचे मत होते. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्यासारख्या ज्येष्ठांनी मार्गदर्शकाची भूमिका निभावावी, मात्र आंदोलनाचे चेहरे आणि नेतृत्व तरुणांचेच असावे.
हे ही वाचा>> उद्धव ठाकरे आक्रमक, कॉकरोच जनता पार्टीवरुन सरकारला निर्वाणीचा इशारा
"आम्ही फक्त पाठिंबा देण्यासाठी आहोत. ही मुलं चांगलं काम करतील, त्यांना संधी दिली पाहिजे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आंदोलनं जिवंत राहिली पाहिजेत आणि त्यासाठी पुढची पिढी तयार झाली पाहिजे," असे विश्वंभर चौधरी म्हणाले.
असीम सरोदे यांनी सांगितले की, सध्या ही चळवळ काहीशी असंघटित स्वरूपात सुरू आहे. ती एखाद्या ठराविक आराखड्यातून जन्माला आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर सोशल मीडियावर सुरू झालेल्या चर्चेतून आणि तरुणांच्या असंतोषातून ही चळवळ आकाराला आली.
त्यांच्या मते, अनेक तरुणांना आपले प्रश्न ऐकून घेतले जात नाहीत, लोकशाहीत त्यांना स्थान नाही, अशी भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून अभिजीत दिपके अमेरिकेतील नोकरीची संधी सोडून भारतात परतले आणि प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून लोकांचा पाठिंबा किती आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागले.
हे ही वाचा>> इंटेलिजन्स ब्युरोचा इशारा, अन् कॉकरोज जनता पार्टीचं X हँडल बंद, इन्स्टा अकाऊंटवरही कारवाई?
आंदोलनाच्या स्वरूपाबाबत बोलताना विश्वंभर चौधरी यांनी आंदोलनांचा इतिहास सांगितला. स्वातंत्र्यलढा असो, जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन असो किंवा इतर सामाजिक चळवळी असोत, त्या नेहमी तरुणांनीच पुढे नेल्या आहेत. आंदोलनात वय नसते, आंदोलनात ऊर्जा असते आणि ती ऊर्जा तरुणांकडे असते, असे ते म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, प्रत्येक आंदोलन देशाला नवीन चेहरे देते. या चळवळीतूनही अनेक नवे कार्यकर्ते आणि नेतृत्व पुढे येऊ शकते. त्यामुळे या चळवळीचे मूल्यमापन करण्यासाठी अजून वेळ आहे.
असीम सरोदे यांनी शिक्षण व्यवस्थेच्या मुद्द्यावर विशेष भर दिला. "एखाद्या मंत्र्याचा राजीनामा मागणे हा अंतिम उद्देश असू शकत नाही. शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक, सर्वसमावेशक आणि गुणवत्तापूर्ण कशी होईल, यावर चर्चा झाली पाहिजे," असे त्यांनी सांगितले. अभिजीत दिपके यांनीही शिक्षणासंदर्भातील धोरणात्मक भूमिका लवकरच जाहीर करण्याचे संकेत दिल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. त्यांनी स्पष्ट केले की, हा पाठिंबा कोणत्याही राजकीय विचारसरणीमुळे नाही. महाराष्ट्रातील पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार आणि तरुणांच्या वाढत्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर जर तरुण स्वतः पुढे येऊन प्रश्न उपस्थित करत असतील, तर त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
त्यांनी सांगितले की, या आंदोलनामागे कोणतेही लपलेले राजकीय अजेंडे असल्याचे त्यांना सध्या तरी दिसत नाही. उलट, नव्या पिढीने आपल्या प्रश्नांसाठी पुढे येणे ही लोकशाहीसाठी सकारात्मक बाब आहे.
चर्चेच्या शेवटी विश्वंभर चौधरी यांनी एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. "ही चळवळ अजून केवळ पंधरा दिवसांची आहे. एवढ्या लवकर तिच्यावर अंतिम मत व्यक्त करणे योग्य नाही. या आंदोलनाला वाढण्यासाठी वेळ दिला पाहिजे. ते कुठे जाते, कसे विकसित होते, यावर नंतर टीका किंवा मूल्यमापन करता येईल. पण सध्या त्याला संधी आणि शुभेच्छा देणे अधिक महत्त्वाचे आहे," असे ते म्हणाले.
त्यामुळे ‘कॉक्रोच जनता पार्टी’ आणि अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाकडे आता केवळ सोशल मीडियावरील चर्चेच्या दृष्टीने नव्हे, तर नव्या पिढीच्या नेतृत्वाच्या उदयाच्या शक्यतेच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे.
ADVERTISEMENT











