मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. अशोक चव्हाण यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत राहुल गांधींना खुल्या चर्चेला आणि वस्तुस्थितीला सामोरं जाण्याचं आव्हान दिलं आहे.
ADVERTISEMENT
अशोक चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये “Rahul Gandhi, Don't run, Don't hide. Face the debate, Face the Fact!” असं म्हणत राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे. त्यांच्या या पोस्टवर काही तासांतच शेकडो प्रतिक्रिया येत आहेत.
अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले?
अशोक चव्हाण यांच्या पोस्टचा थेट रोख राहुल गांधींकडे आहे. त्यांनी राहुल गांधींना संसदेतील चर्चेपासून किंवा प्रश्नांपासून पळून न जाता त्याला सामोरं जाण्याचं आव्हान दिलं आहे.
“Don’t run, Don’t hide, Face the debate, Face the Fact!” या शब्दांतून चव्हाण यांनी राहुल गांधींना थेट आव्हान दिलं आहे. त्यामुळे या पोस्टमुळे महाराष्ट्रातील भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे.
नेमका वाद काय?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. विरोधकांकडून अमित शाह यांनी संसदेत या प्रकरणावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली जात आहे. दुसरीकडे, सरकारने अमित शाह चर्चेसाठी आणि निवेदनासाठी तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा>> शिवसेना नाव आणि चिन्ह वाद : ठाकरेंचा शेवटचा वार कोणावर? सुप्रीम कोर्टात काय घडतंय?
राहुल गांधी यांनीही अमित शाह यांच्यावर प्रश्न उपस्थित करत, विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईबाबत गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारावी आणि संसदेत उत्तर द्यावे, अशी भूमिका घेतली आहे.
याच पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी राहुल गांधींना लक्ष्य करत चर्चेपासून दूर न पळता संसदेत चर्चेला सामोरे जाण्याचे आव्हान दिले आहे.
भाजपमध्ये आल्यानंतर चव्हाणांचा काँग्रेसवर सातत्याने निशाणा
अशोक चव्हाण यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी ते काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते आणि माजी मुख्यमंत्री होते. सध्या ते भाजपचे राज्यसभेचे सदस्य आहेत.
हे ही वाचा>> हा ग्राऊंड रिपोर्ट डोळे उघडून बघायलाच हवा, इन्फ्रामॅन कुठे आहेत?
काँग्रेसमधील दीर्घ राजकीय कारकिर्दीनंतर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या चव्हाणांकडून काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर करण्यात येणाऱ्या टीकेला त्यामुळे राजकीय महत्त्व प्राप्त होत आहे.
काँग्रेसकडून अशोक चव्हाणांवर पलटवार
दरम्यान, अशोक चव्हाणांनी आज (11 ऑगस्ट) राहुल गांधींना जे आव्हान दिलं. त्यानंतर काँग्रेसकडूनही चव्हाणांना तात्काळ प्रत्युत्तर देण्यात आले. काँग्रेसने चव्हाणांना उद्देशून म्हटलं की, 'तुमचे दिल्लीतले ‘कुचू आणि पुचू’ एवढे दिवस त्याच राहुल गांधी यांना घाबरून संसदेत येत नव्हते. आता त्यांना सांगा, संसदेपासून पळू नका, संसद सभागृहात या आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. दिल्लीत विद्यार्थ्यांवर खिळे लावलेल्या लाठ्या, पॅलेट गन्स चालवण्याचे आदेश कोणी दिले? की पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांना याची माहितीच नव्हती?'
अशी टीका आधी काँग्रेसकडून करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर काँग्रेसने 'अशोकराव ‘Fact Facing’च्या गप्पा तुम्ही करू नका; आधी स्वतःच्या तथ्यांना सामोरं जाण्याची तयारी ठेवा!' असा मेसेज आणि फोटो टाकत अशोक चव्हाणांवर टीकेची झोड उठवली.
ADVERTISEMENT












