बीड : नगरपालिका निवडणुकीच्या आदल्या रात्री बीड शहरात मोठा गोंधळ उडाला आहे. पेठ बीड परिसरात दोन तरुण स्कुटीवरून फिरत नागरिकांना पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आला असून, त्यांचा व्हिडिओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या प्रकरणामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
ADVERTISEMENT
पेठ बीड भागातील सोनार गल्लीमध्ये रात्री दोन तरुणांना काही युवकांनी थांबवले. स्कुटीची डिक्की उघडल्यावर त्यात मोठी रक्कम असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच त्या स्कुटीच्या डिक्कीत राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ चिन्ह असलेली पोस्टर्सही दिसत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. यामुळे हे दोन्ही तरुण अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाशी संबंधित असल्याची चर्चा रंगली. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ समोर आले असून त्यात पाचशे रुपयांच्या नोटा स्पष्ट दिसत असल्याचा दावा केला जात आहे.
हेही वाचा : मालवणमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीत घबाड सापडलं, निलेश राणेंनी थेट पोलीस स्टेशन गाठलं
घटनास्थळावर उपस्थितांनी दोन्ही तरुणांना पकडून पेठ बीड पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती मिळाली आहे. मात्र याबाबत पेठ बीड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी खेडकर यांनी वेगळीच भूमिका मांडली आहे. “आम्हाला कोणतीही रोकड आढळून आलेली नाही. केवळ काही लोकांकडून चाकू ताब्यात घेतले आहेत,” अशी प्राथमिक माहिती त्यांनी फोनवरून दिली. पण व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या नोटा आणि डिक्कीत चाकू असल्याचा आरोप यामुळे परिस्थिती गोंधळलेली आहे.
दरम्यान, बीडसह जिल्ह्यातील सहा नगरपालिकांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. नागरिकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण असून मतदान केंद्रांवर गर्दी वाढताना दिसत आहे. एकूण 434 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी 45 केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली असून येथे विशेष पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांना निर्भयपणे मतदान करता यावे यासाठी जिल्ह्यातील सहा ठिकाणचे आठवडी बाजार आज बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सकाळच्या सत्रात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत असल्याची माहिती मिळत आहे. पैसे वाटपाच्या आरोपांमुळे बीडमध्ये निवडणुकीची हवा अधिकच गरम झाली असून, पोलिसांच्या पुढील तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











