मुंबई: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्य सरकारने प्रारूप प्रभाग रचना अंतिम करून ती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. यामुळे महापालिका निवडणुकीचा लवकरच पडघम वाजणार आहेत. डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत मतदान होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे जानेवारी 2026 मध्ये राज्यातील अनेक महापालिकांना त्यांचे नवे महापौर आणि नगरसेवक मिळू शकतात.
ADVERTISEMENT
प्रारूप प्रभाग रचनेची प्रक्रिया
राज्य सरकारने तयार केलेली प्रारूप प्रभाग रचना 23 ते 25 ऑगस्ट 2025 या कालावधीत निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाईल. त्यानंतर सुमारे 15 दिवस नागरिकांना आणि संबंधितांना प्रभाग रचनेवर हरकती व सूचना नोंदवण्याची संधी मिळेल. या हरकतींवर निवडणूक आयोग सुनावणी घेईल आणि त्यानंतर 10 दिवसांत अंतिम प्रभाग रचना जाहीर करेल. यासोबतच प्रभागांमधील आरक्षणाची सोडतही काढली जाईल. या प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल.
हे ही वाचा>> EVM मतदानाची फेरमतमोजणी, सुप्रीम कोर्टामुळे हरलेला उमदेवार जिंकला.. देशातील पहिलीच घटना प्रचंड चर्चेत
महापालिका निवडणुकींचा संभाव्य कार्यक्रम
- - 23-25 ऑगस्ट 2025: प्रारूप प्रभाग रचना जाहीर.
- - ऑगस्ट-सप्टेंबर 2025: हरकती आणि सूचनांसाठी 15 दिवसांचा कालावधी.
- - सप्टेंबर 2025: हरकतींवर सुनावणी आणि अंतिम प्रभाग रचना जाहीर.
- - ऑक्टोबर 2025: प्रभागांमधील आरक्षणाची सोडत.
- - डिसेंबर 2025-जानेवारी 2026: मतदान आणि निकाल.
- - जानेवारी 2026: नवे महापौर पदग्रहण करतील.
इच्छुकांसाठी मोठी संधी
नगरसेवक किंवा नगरसेविका होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इच्छुकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची संधी आहे. प्रभाग रचनेच्या या टप्प्यामुळे आता निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी तीव्र होण्याची शक्यता आहे. राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी प्रभाग रचनेच्या अंतिम स्वरूपाकडे लक्ष केंद्रित केले आहे. आरक्षण सोडतीनंतर प्रभागनिहाय रणनीती ठरविण्यासाठी इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे.
हे ही वाचा>> ठाकरे ब्रँड एकत्र येऊनही ‘BEST’ दणका, BMC निवडणुकीवर काय परिणाम?
निवडणुकीचे महत्त्व
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा महत्त्वाचा टप्पा आहे. या निवडणुका स्थानिक पातळीवरील विकासकामे, धोरणे आणि नेतृत्व ठरविण्यासाठी निर्णायक ठरतात. यंदाच्या निवडणुकीत प्रभाग रचनेत झालेले बदल, आरक्षणाचे निकष आणि मतदारसंघातील नव्या सीमांकनामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
येत्या काही महिन्यांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल आणि डिसेंबर-जानेवारीत मतदान होऊन नव्या नेतृत्वाची निवड होईल.
ADVERTISEMENT
