Nanded Politics : लोहा (नांदेड): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कार्यकर्त्यांची ताकद मोजण्याची संधी मानली जाते, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र प्रत्यक्ष चित्र वेगळंच दिसत आहे. पक्षांतर्गत लोकशाही आणि घराणेशाहीविरोधी भूमिका जाहीरपणे मांडणाऱ्या पक्षांच्याही गोटात नातलगांना मोठ्या प्रमाणात उमेदवारी दिली जात असल्याचं लोहा नगरपरिषद निवडणुकीत स्पष्ट होत आहे. भाजपने लोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकाच कुटुंबातील तब्बल सहाजणांना तिकीट देऊन राजकीय चर्चांना उधाण आणलं आहे.
ADVERTISEMENT
भाजपने नगराध्यक्षपदासाठी गजानन सूर्यवंशी यांच्या नावाची घोषणा केली. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांना नगरसेवकपदाच्या उमेदवारीची संधी मिळाली आहे. गजानन सूर्यवंशी यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी (प्रभाग 7 अ), भाऊ सचिन सूर्यवंशी (प्रभाग 1 अ), भावजय सुप्रिया सूर्यवंशी (प्रभाग 8 अ), मेव्हणा युवराज वाघमारे (प्रभाग 7 ब) आणि भाच्याची पत्नी रीना व्यवहारे (प्रभाग 3) अशा सहा सदस्यांना तिकीट देऊन भाजपने घराणेशाहीविरोधी भूमिकेवरच प्रश्न निर्माण केले आहेत.
राजकीय वर्तुळात यावर जोरदार चर्चा सुरू असून, भाजप ‘घराणेशाहीला विरोध’ करत असल्याचा दावा कितपत खरा हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लोह्यात उमेदवार जाहीर झाल्यापासून विरोधकांनीही ही बाब हाणून पाडण्यास सुरुवात केली आहे.
लोह्यात तिरंगी लढत तीव्र
लोहा नगरपरिषद ही आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे मजबूत प्रभावक्षेत्र म्हणून ओळखली जाते. दहा प्रभागांसाठी वीस नगरसेवकांची निवडणूक होत असून, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी सामना रंगणार आहे. नांदेड जिल्ह्यातील स्थानिक निवडणुका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप लढवत आहे. चव्हाण यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात पक्षसंघटन मजबूत झाल्याचं मानलं जातं, मात्र लोह्यातील उमेदवारीतून उफाळलेल्या घराणेशाहीच्या मुद्द्यामुळे भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
एकाच कुटुंबातील तिघेही रिंगणात
लोहा शहरात घराणेशाहीचा मुद्दा केवळ भाजपपुरता मर्यादित नसून, काही अपक्ष आणि काँग्रेसच्या उमेदवारांमुळेही हा विषय अधिक गडद झाला आहे. प्रभाग क्रमांक 3 (अ) मधून शेख आजमुद्दीन हैदरसाब शेख आणि त्यांची पत्नी शेख बानुबी आजमुद्दीन हे दोघेही अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला उभे आहेत. तर त्यांचा मुलगा शेख शेरफुद्दीन आजमुद्दीन प्रभाग क्रमांक 4 मधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहे. एकाच कुटुंबातील तिघे वेगवेगळ्या पद्धतीने निवडणुकीत उतरल्याने स्थानिक राजकारणातील घराणेशाहीचा मुद्दा अधिक प्रकर्षाने पुढे आला आहे. मतदारांमध्येही हा विषय चर्चेचा बनला असून, कार्यकर्त्यांच्या निवडणुका मानल्या जाणाऱ्या नगरपरिषदांनी प्रत्यक्षात ‘कुटुंबीयांची माळा’ घातल्याची टीका जोर धरत आहे. लोह्यातील निवडणूक रंगताना घराणेशाही, पक्षांतर्गत निवड प्रक्रिया आणि स्थानिक राजकारणातील बदलणारे समीकरणे पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
सोलापुरातील अनगरनंतर साताऱ्यातही भाजपची कमाल, 5 नगरसेवक बिनविरोध; कोणत्या नगरपरिषदेत मिळवलं वर्चस्व?
ADVERTISEMENT











