तुळजापूर –गणेश जाधव : राज्यभर चर्चेत असलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद उर्फ पिटू गंगणे यांना भाजपने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याची चर्चा सुरू असून, या घडामोडीमुळे तुळजापूरच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. पिटू गंगणे यांनी आमदार राणा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना थेट नगराध्यक्ष पदाचा पक्षाचा फॉर्म देण्यात आल्याची माहिती स्थानिक राजकीय वर्तुळात फिरत आहे. या हालचालीवर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतल्यामुळे तुळजापूरमधील राजकीय वातावरण तापले आहे.
ADVERTISEMENT
वरिष्ठ नेतृत्वाच्या सूचना डावलून घेतलेला निर्णय
भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून महंत इच्छागिरी गगनगिरी महाराज किवा अन्य महंत यांना उमेदवारी देण्याच्या स्पष्ट सूचना असल्याचे समजते. मात्र या आदेशांकडे दुर्लक्ष करून आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि काही स्थानिक नेत्यांनी पिटू गंगणे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करून पक्षश्रेष्ठींचे निर्देश धुडकावल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे तुळजापूर विधानसभा क्षेत्रात भाजपमध्ये खरे निर्णय कोण घेतो? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जामिनावर असलेला आरोपी, विरोधकांचा तीव्र आक्षेप
पिटू गंगणे हा तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी मानला जातो. या प्रकरणात त्याने पोलिसांना सहकार्य करत भांडा फोडल्याचा दावा भाजप समर्थक करत आहेत. तर दुसरीकडे विरोधकांचे मत वेगळे आहे. त्यांच्या मते पिटू गंगणेच्याच माध्यमातून अनेक युवकांना या ड्रग्जचे व्यसन लागले आणि संपूर्ण प्रकरणाची मुळे त्याच्याकडेच पोहोचतात. घटनेनंतर पिटू गंगणे तब्बल एक महिन्यापेक्षा जास्त काळ तुरुंगात होता आणि सध्या तो जामिनावर आहे. अशा परिस्थितीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीस शहराच्या पहिल्या नागरिकपदाची, म्हणजेच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देणे कितपत योग्य, असा सवाल विरोधकांनी जोरदारपणे उपस्थित केला आहे. यापूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी एका कार्यक्रमात पिटू गंगणे यांचे कौतुक करीत वाजवा टाळ्या असे म्हटल्याने राज्यभरात मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. त्यावेळी भाजपच्या भूमिकेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
राणा पाटील यांच्यावर पुन्हा टीका
ड्रग्ज प्रकरणातील आरोपींशी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे जवळचे संबंध असल्याचे आरोप विरोधकांकडून पूर्वीपासूनच केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी या प्रकरणातील आणखी एक आरोपी आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर याला भाजपात प्रवेश देण्यात आला होता. त्या निर्णयावरूनही आमदार राणा पाटील यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. आता प्रमुख आरोपीलाच नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची वेळ आल्याने विरोधकांनी राणा पाटील यांच्यावर पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली आहे.
अधिकृत घोषणा न करता भाजपची गुप्तता
महत्त्वाचे म्हणजे भाजपने अद्याप पिटू गंगणे यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केलेली नाही. ए आणि बी फॉर्म दिल्याची चर्चा जोरात असली, तरी पक्षाने कोणतेही अधिकृत निवेदन केलेले नाही. पक्षांतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे की भाजप विरोधक आणि जनतेची प्रतिक्रिया किती तीव्र येते हे जाणून घेण्यासाठी मुद्दाम शांत भूमिका घेत आहे. परिस्थिती कशी बदलते त्यानुसारच पुढील अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. या गुप्त हालचालींमुळे तुळजापूरमधील राजकीय गोंधळ आणखी वाढला असून कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख निर्णायक
तुळजापूर नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 21 नोव्हेंबर आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडे आता दोनच पर्याय आहेत. एकतर उमेदवारी बदलून दुसऱ्या नावाचा विचार करणे किंवा पिटू गंगणे यांच्या नावावरच अंतिम निर्णय कायम ठेवणे. दोन्ही परिस्थितींना मोठे राजकीय परिणाम होणार असल्याने तुळजापूरमध्ये आगामी दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
भाजपची स्वच्छ प्रतिमा धोक्यात?
भाजप स्वतःला स्वच्छ, पारदर्शक आणि गुन्हेगारीविरुद्ध भूमिका घेणारा पक्ष म्हणून मांडत असतो. मात्र ड्रग्ज प्रकरणातील आरोपींचा पक्षप्रवेश आणि आता नगराध्यक्ष पदाची शक्य उमेदवारी या घटनांमुळे भाजपच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
सोलापुरातील अनगरनंतर साताऱ्यातही भाजपची कमाल, 5 नगरसेवक बिनविरोध; कोणत्या नगरपरिषदेत मिळवलं वर्चस्व?
ADVERTISEMENT











