पटना: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आज (11 नोव्हेंबर) दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. ज्यानंतर आता वेगवेगळे Exit Poll समोर येत आहेत. पण बिहार विधानसभेच्या 243 मतदारसंघांपैकी सर्वाधिक चर्चेत असलेल्या अलिनगर विधानसभा मतदारसंघात नेमकं काय होणार याकडे फक्त बिहारच नव्हे तर देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण भाजपने या मतदारसंघातून अवघ्या 26 वर्षांची सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर हिला तिकीट दिलं होतं. याच मतदारसंघातील नेमका Exit Poll हा आता समोर आला आहे. जाणून घेऊया याचविषयी सविस्तर.
ADVERTISEMENT
दरभंगा जिल्ह्यात येणाऱ्या अलिनगर मतदारसंघातून यंदा भाजपकडून मैथिली ठाकूर निवडणूक लढवत आहे. या मतदारसंघात मिश्रीलाल यादव हे आमदार होते. पण मैथिली ठाकूरला तिकीट देण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या काही दिवस आधी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती.
हे ही वाचा>> Bihar Election Exit Poll: बिहारमध्ये पुन्हा येणार NDA सरकार, पाहा सगळ्या Exit Poll चे आकडे
दुसरीकडे राजदकडून विनोद मिश्रा हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाकडून विप्लव चौधरी यांना तिकीट देण्यात आलं. पण मैथिली ठाकूर हिची प्रमुख लढत ही राजदच्या विनोद मिश्रा यांच्या विरुद्धच आहे.
मैथिली ठाकूरचं या निवडणुकीत काय होणार? याबाबतच सध्या बिहारमध्ये अधिक चर्चा आहे. बिहार निवडणूक जाहीर झाल्यानंतर मैथिली ठाकूरला भाजपमध्ये प्रवेश देऊन तात्काळ तिकीटही देण्यात आलं. मैथिली ठाकूरच्या प्रचारासाठी भाजपने या मतदारसंघात दिग्गजांना उतरवलं होतं. याच मतदारसंघात अमित शाहांची प्रचार रॅली देखील झाली. तसंच पंतप्रधान मोदींनी मैथिली ठाकूरच्या प्रचाराचा व्हिडिओ देखील शेअर केला होता.
मैथिली ठाकूरचा मतदारसंघात नेमका किती प्रभाव?
अलीनगर मतदारसंघ हे मैथिली ठाकूरचं आजोळ आहे. सुरुवातीला भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांकडून मैथिली ठाकूरच्या नावाला प्रचंड विरोध झाला. कारण येथून भाजपचे विद्यमान आमदार मिश्रीलाल यांचं तिकीट कापून ते मैथिली ठाकूरला देण्यात आलं.
हे ही वाचा>> उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खासदार संजय राऊतांना फोन, नेमकं काय घडलं?
याशिवाय काही लोकं यासाठी देखील विरोध करत होते की, मैथिली ठाकूरने या मतदारसंघासाठी काहीच केलेलं नाही. कधी एखादा शो केला नाही किंवा एखाद्या इव्हेंटलाही ती आली नाही. असंही म्हटलं गेलं की, शो किंवा इव्हेंटला येण्यासाठी तिने पैशांची देखील मागणी केली होती. त्यामुळेच तिला भाजपचं तिकीट देण्यासाठी अनेकांचा विरोध होता.
पण जेव्हा तिकीट निश्चित झालं त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मैथिलीसाठी बराच जोर देखील लावला.
राजदचे विनोद मिश्रा देऊ शकतात जोरदार टक्कर
विनोद मिश्रा हे मागील निवडणुकीत देखील याच मतदारसंघातून लढले होते. त्यांचा अवघ्या 3100 मतांनी त्यावेळी पराभव झाला होता. यंदा विनोद मिश्रा यांचं निवडणूक कॅम्पेन हे मैथिली ठाकूरपेक्षा वरचढ असल्याचं दिसून आलं आहे. एकीकडे भाजपचं सगळं केडर हे मैथिलीच्या निवडणुकीसाठी सगळे प्रयत्न करत होते. पण स्थानिक पातळीवर विनोद मिश्रा यांना मतदारांना आकर्षित करण्यात यश आलं असल्याचं सध्या बोललं जात आहे.
Exit Poll मध्ये मैथिली ठाकूरचा पराभव
दरम्यान, बिहार Tak च्या Exit Poll नुसार, लोकगायिका आणि भाजपची उमदेवार असलेली मैथिली ठाकूर हिला पराभवाचा झटका सहन करावा लागू शकतो.
Exit Poll नुसार अलीनगरमध्ये यंदा मोठा फेरबदल होईल आणि ही जागा राजदच्या खात्यात जाईल. येथून विनोद मिश्रा हे निवडणूक जिंकू शकतात. कळीचा मुद्दा असा की, या मतदारसंघात जनसुराज पक्ष हा भाजपला त्रासदायक ठरत असल्याचं दिसतं आहे. यामुळे विनोद मिश्रा ही जागा काढतील असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे.
भाजप प्रत्येक निवडणुकीत काही ना काही नवनवे प्रयोग करत असतो. तसाच नवा प्रयोग त्यांनी अलीनगरमध्ये यंदा करून पाहिला आहे. पण एक्झिट पोलनुसार भाजपचा हा प्रयोग फसताना दिसत आहे.
ADVERTISEMENT











