मुंबई: राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणाऱ्या "ऑपरेशन टायगर" (Operation Tiger) संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) सूत्रांच्या माहितीनुसार, "ऑपरेशन टायगर" कोणत्याही अडथळ्याविना यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, तांत्रिक आणि कायदेशीर कारणांमुळे पक्षाने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाकरे गटातील सहा खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशाची घोषणा आणखी काही दिवस लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
'ऑपरेशन टायगर'मध्ये नेमके कोणते स्पीड ब्रेकर?
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी त्याबाबतचे पुरावे किंवा अधिकृत माहिती सध्या जाहीर करण्यात आलेली नाही. शिवसेना नेतृत्वाने पुढील दोन दिवस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे ठरवले आहे.
हे ही वाचा>> Inside Story: ठाकरेंचे खास ओमराजे निंबाळकर कसे आणि का गेले?, चारच गोष्टी!
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा आटोपून मुंबईकडे प्रस्थान केले आहे. विशेष म्हणजे, ते सध्या या विषयावर प्रसारमाध्यमांशी कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत झालेल्या राजकीय घडामोडींनंतर आता सर्वांचे लक्ष शिंदे गटाच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटाकडून कोणते कायदेशीर किंवा तांत्रिक आक्षेप घेतले जाऊ शकतात, याचा सखोल अभ्यास शिंदे गटाकडून सुरू आहे. त्यामुळे सहा खासदारांच्या अधिकृत प्रवेशाचा कार्यक्रम किमान दोन ते तीन दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची कायदेशीर अडचण निर्माण होऊ नये यासाठी पक्षाचे कायदेतज्ज्ञ आणि वरिष्ठ नेते सर्व बाबींची तपासणी करत आहेत. याशिवाय ठाकरे गटाची नेमकी काय भूमिका असणार हे पाहिल्यानंतरच शिंदेंची शिवसेना पुढील पावलं टाकणार आहे.
हे ही वाचा>> 'वडिलांच्या हत्या प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने हवा असेल तर...', ओमराजे निंबाळकरांबाबत राऊतांनी उडवून दिली खळबळ
याच पार्श्वभूमीवर, दिल्लीत असलेल्या संबंधित सहा खासदारांना सुरक्षेच्या कारणास्तव राजधानीबाहेर हलविण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यांच्या नेमक्या ठिकाणाबाबत गोपनीयता राखण्यात येत असून, राजकीय हालचालींना अधिक वेग आला आहे.
शिवसेना सूत्रांच्या दाव्यानुसार, "ऑपरेशन टायगर"ची अंमलबजावणी यशस्वी झाली असली तरी अंतिम घोषणा करण्यापूर्वी सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाबींची पूर्तता केली जाणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ठाकरे गटाकडून या घडामोडींवर काय भूमिका घेतली जाते आणि संभाव्य कायदेशीर लढाईचे स्वरूप काय असेल, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सर्व बाबींची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच शिंदे गटाकडून अधिकृत घोषणा केली जाणार असून, 20 किंवा 21 जून रोजी या प्रवेशाबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील शिवसेनेच्या राजकारणाला नवे वळण देणाऱ्या या घडामोडींमुळे आगामी काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे मानले जात आहे.
ADVERTISEMENT











