मुंबई: हाचिको (Hachiko) हा जपानमधील 'अकिता' जातीचा एक अत्यंत इमानी कुत्रा होता. १९२० च्या दशकात तो प्राध्यापक हिदेसाबुरो युएनो यांच्यासोबत टोकियोमध्ये राहायचा. हाचिकोचा रोजचा नियम होता. दररोज सकाळी प्राध्यापक युएनो कामासाठी बाहेर पडायचे, तेव्हा हाचिको त्यांना सोडायला शिबुया रेल्वे स्टेशनपर्यंत जायचा. संध्याकाळी जेव्हा प्राध्यापक कामावरून परत यायचे, तेव्हा हाचिको आधीपासूनच तिथे त्यांची वाट पाहत उभा असायचा. हा नित्यक्रम वर्षभर सुरळीत चालू होता. पण एका दिवशी अचानक घडले असे की, विद्यापीठात शिकवत असताना प्राध्यापकांना ब्रेन हॅमरेजचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. ते कधीही स्टेशनवर परतले नाहीत.
ADVERTISEMENT
नेहमीप्रमाणे हाचिको संध्याकाळी स्टेशनबाहेर आपल्या मालकाची वाट पाहत उभा होता. मालक परत न आल्याने तो दुसऱ्या दिवशी गेला, तिसऱ्या दिवशी गेला... असं करत करत तो तब्बल 9 वर्षे, 9 महिने आणि 15 दिवस रोज संध्याकाळी स्टेशनवर ट्रेन येण्याची आणि मालक बाहेर येण्याची वाट पाहत राहिला. शेवटी एका दिवशी, वयाच्या अकराव्या वर्षी या निष्ठावान कुत्र्याचा शिबुया स्टेशनवरच मृत्यू झाला. संपूर्ण जपानला हा प्रकार समजल्यावर ते हळहळले. कुत्र्याची ही अनोखी निष्ठा पाहून जपानमधील लोकांनी स्टेशनबाहेर त्याचा कांस्याचा पुतळा उभारला, जो आजही सर्वांना त्याच्या प्रामाणिकपणाची आणि प्रेमाची आठवण करून देतो.
आता दुसरी गोष्ट...
महाराणा प्रताप हे मेवाडच्या सिसोदिया घराण्यातील सर्वात शूर शासक होते. अकबराच्या नेतृत्वातील मुघल साम्राज्याविरोधात त्यांचा प्रतिकार सर्वश्रुत आहे. त्यांच्या सैन्यात जसे एकनिष्ठ सहकारी होते तसाच एक रामप्रसाद नावाचा हत्तीही होता. रामप्रसाद हा महाराणा प्रताप यांचा युद्धहत्ती होता. त्याची ओळख शौर्य आणि अंतर्ज्ञानासाठी प्रसिद्ध आहे. हळदीघाटीच्या लढाईत रामप्रसादनं असामान्य शौर्य दाखवलं.. त्यानं ताकदीनं मुघल सैन्यावर हल्ला केला. अखेर रामप्रसादला लढाईदरम्यान घेरण्यात आलं. त्याला पकडून अकबरासमोर हजर केलं. त्याची महारत आणि ख्याती कानावर होतीच. त्यामुळे अकबरानं त्याच्या खाण्यापिण्याची उत्तम सोय केली. त्याचं नाव बदललं.. पीरप्रसाद ठेवलं.. पण रामप्रसादनं हे सर्व नाकारलं.. अन्नपाणी सोडून दिलं.. रामप्रसादची निष्ठा इतिहासात कायम राहिली.
आता, तुम्ही म्हणाल की या गोष्टींचा आजच्या विषयाशी काय संबंध आहे.. आता तेच जाणून घेऊयात सविस्तरपणे.
महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरनं धुमाकूळ घातला आहे. ठाकरेंच्या सहा खासदारांनी बंडाचं निशाण फडकावलंय. हे सहाही खासदार 2024 ला मशाल चिन्हावर निवडून आले आहेत. त्यावेळी यातल्या एक दोन लोकांची भाषा काय होती बघा.
सगळ्यात आक्रमक खासदार असलेल्या ओमराजेंपासून सुरुवात करु.. हे धाराशिवचे खासदार आहेत. “देशात राजकीय द्वेषातून ईडी आणि इन्कम टॅक्ससारख्या सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आजपर्यंत भाजपच्या एकाही नेत्यावर कारवाई होत नाही, मग विरोधकांवरच कारवाया कशा होतात?”
“सत्तेची मस्ती करणाऱ्यांना इशारा देताना, जशी भरती असते तशी ओहटी देखील असते आणि सत्तेच्या खेळात कोणीही ताम्रपट घालून जन्माला येत नाही," असे म्हणत ओमराजेंनी भाजपच्या कारभारावर हल्लाबोल केला होता.
दुसरे नेते संजय दिना पाटील.. आपल्या मुंबईचे ते काय म्हणाले होते बघा..
भाजप ईडी (ED) आणि इतर तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
“विरोधकांच्या आमदारांना आणि खासदारांना फोडण्यासाठी भाजप सत्तेचा आणि पैशांचा वापर करत असून, या वृत्तीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा बाजार झाला आहे.”
बाकी आष्टीकर, संजय देशमुख, बंडू बॉस उर्फ संजय जाधव आणि साईबाबांची शपथ घेणारे भाऊसाहेब वाकचौरे ही सगळी मंडळी लढली महायुतीविरोधात..
बघा.. ओमराजे लढले भाजप नेते आणि आताच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे भाचे राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नीविरोधात.. संजय जाधव परभणीतून रासपच्या महादेव जानकरांविरोधात लढले. शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे भाजपच्या सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात लढले. हिंगोलीचे नागेश आष्टीकर शिंदेसेनेच्या बाबूराव कदमांविरोधात लढले. संजय दिना पाटील यांनी भाजपच्या मिहिर कोटेचांना हरवलं. यवतमाळच्या संजय देशमुखांनी शिंदेसेनेचे माजी खासदार हेमंत पाटलांच्या पत्नीविरोधात निवडणूक लढवली.
असो.. तर सांगायचा मुद्दा हा की, जर उद्धव ठाकरेंनी 2019 ला युतीचा धर्म न पाळून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन करुन चूक केली. तर मग आता महाविकास आघाडीच्या मतांवर निवडून आलेल्यांनी काय केलं...? हा प्रश्न आहे.
पण 300 पेक्षा जास्त खासदार एनडीएकडे असताना ही जी पक्ष फोडाफोडी सुरुय.. ती का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
मग तुम्हाला कळेल की आपचे खासदार, तृणमूलचे खासदार आणि आता शिवसेनेचे खासदार का पक्ष सोडून जात आहेत.
एकतर विरोधात असाल तर निधी मिळणार नाही, तुमच्या लोकांची आणि मतदारसंघाची कामं होणार नाहीत ही शिक्षावजा नवी रित सत्ताधाऱ्यांनी आणली आहे. त्यामुळे मतदारसंघात विकासकामांना खीळ बसते. निधी न मिळाल्यानं वैयक्तिक नुकसानही होतं आणि कार्यकर्त्यांना खूश ठेवता येत नाही हा प्रॉब्लेम आहे.
शिवाय काही ठिकाणी ईडी, सीबीआय, आयटी आणि इतर पोलीस खात्याचा ससेमिराही अनेकदा नेत्यांच्या पाठीचा कणा लवचिक करतोय. पण परत मुद्दा तोच की 300 पेक्षा जास्त खासदार असताना सत्ताधाऱ्यांना हा भस्म्या का झालाय..? त्याचं उत्तर 2029 च्या निवडणुकीत आहे.
बघा... भाजपची आत्ता 20 पेक्षा अधिक राज्यात सत्ता आहे. पण केंद्रात ते बहुमतापासून दूर झाले. उत्तरेतला त्यांचा प्रभाव लोकसभेच्या निवडणुकीत ओसरताना दिसला. म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड वगैरे.. त्यात अजूनही केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्रात भाजपला म्हणावे तसे पाय पसरता आले नाहीत.. त्यामुळे जर देशावरची सत्ता राखायची असेल तर भाजपच्या मतदारांचा प्रभाव ज्या राज्यात जास्त आहे, तिथल्या जागा वाढल्या तर सत्तेत येण्याची खात्री वाढते. अर्थात उत्तरेत जो हिंदुत्वाचा प्रभाव आहे त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो.
आता त्या जागा वाढवण्याचा मार्ग म्हणजे डिलिमिटेशन.. अर्थात मतदारसंघ पुनर्रचना. खरंतर ते झालं पाहिजे ताज्या-ताज्या जनगणनेननंतर.. म्हणजे जी आता सुरुय.. पण 2011 च्या जनगणनेनुसारच डिलिमिटेशन विधेयक रेटण्याचा कार्यक्रम सुरुय. तसं झालं तर लोकसभेतल्या जागा होतील 850 आणि जी उत्तरेतली 10 भाजपला फेव्हरेबल राज्यं आहेत त्यात जागा होतील.
उदा. यूपी आणि बिहार या दोन राज्यात मिळून 222 खासदार असतील. आणि दक्षिणेतल्या 5 राज्यात मिळून 164 च्या घरात. आता हा असमतोल उत्तरेचं राजकारणातलं आणि देशातलं प्रभुत्व वाढवणारा आहे. त्यामुळे एखाद्या पक्षानं केवळ उत्तरेतल्या 80 टक्के जागा जिंकल्या तरी तो पक्ष सत्तेत येऊ शकतो. त्यामुळेच हा खटाटोप सुरु आहे. त्याच अजेंड्याचा भाग म्हणून आधी आम आदमी, नंतर तृणमूल आता शिवसेना आणि भविष्यात कदाचित राष्ट्रवादीसकट इतर रिजनल पक्षांवरही अशीच गाज पडू शकते.
आता महत्त्वाचा पार्ट बघा.. एकदा हे डिलिमिटेशन विधेयक विरोधकांनी हाणून पाडलं आहे. कारण सरकारकडे संवैधानिक तरतूद बदलण्यासाठीचं दोन तृतीयांश बहुमत नव्हतं. त्यासाठी लोकसभेत 363 खासदारांचं बळ लागतं. एनडीएकडे होते 313. त्यात आता तृणमूलचे 20 आणि शिवसेनेचे सहा पकडा. दुसरीकडे काँग्रेसपासून दुरावलेली डीएमकेही वेगळा निर्णय घेऊ शकते. म्हणून हा सगळा राडारोडा सुरुय.
आता हे विचार वगैरे.. हिंदुत्व वगैरे.. राष्ट्र वगैरे.. किंवा आणखी बड्या-बड्या पोकळ बाता मारणारे जे सांगतील त्यावर किती विश्वास ठेवायचा ते तुम्ही ठरवा. बाकी महाविकास आघाडी म्हणून ज्या मतदारांनी या संजय देशमुख, आष्टीकर, वाकचौरे, संजय दिना, संजय जाधव आणि ओमराजे वगैरेंना निवडून दिलं त्यांनी आपलं तोंड फोडून घ्या.. कारण यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवलात. आणि यापुढे कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही नेत्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा एखादा हाचिको पाळा.. म्हणजे कुत्रा.. म्हणजे निष्ठा शब्द जिवंत तरी राहील.
ADVERTISEMENT











