मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर; मोदींच्या आवाहानानंतर 4 मोठे निर्णय

Chief Minister Devendra Fadnavis : इंधन आणि परकीय चलन बचतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहने निम्मी करण्यासह अनेक कडक निर्बंध लागू केले आहेत.

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

मुंबई तक

13 May 2026 (अपडेटेड: 13 May 2026, 06:28 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर

point

पीएम मोदींच्या आवाहानानंतर 4 मोठे निर्णय

Chief Minister Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन आणि परकीय चलनाची बचत करण्याच्या अनुषंगाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.13) मुंबईत एका उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा केली. या बैठकीला मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, आता मुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या तात्काळ प्रभावाने अर्ध्यावर आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नियमाचे पालन करण्याची जबाबदारी संबंधित पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांच्यावर सोपवण्यात आली असून, बाहेरच्या प्रवासात ताफ्यातील वाहने निर्धारित संख्येपेक्षा जास्त नसावीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : फक्त एक लिंबू उचलला अन् गमावला जीव, अल्पवयीन मुलासोबत काय घडलं?

मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या खर्चात मोठी कपात

शासकीय खर्चात कपात करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांचे सर्व विदेश दौरे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, अत्यावश्यक कामाशिवाय मंत्र्यांनी शासकीय विशेष विमाने किंवा हेलिकॉप्टरचा वापर करू नये आणि त्याऐवजी नियमित व्यावसायिक विमानसेवेचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कामात सुधारणा करण्याच्या दृष्टीने, अधिकाऱ्यांना बैठकीसाठी प्रत्यक्ष बोलावण्याऐवजी जास्तीत जास्त बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या (VC) माध्यमातून घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय, शासकीय वाहनांच्या वितरणाचा कोटेकोर आढावा घेण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.

हेही वाचा : फक्त एक लिंबू उचलला अन् गमावला जीव, अल्पवयीन मुलासोबत काय घडलं?

इंधन बचतीसाठी नवीन नियमावली; आठवड्यातून एक दिवस मेट्रो प्रवास

इंधन बचतीचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यानुसार, मंत्री आणि अधिकाऱ्यांनी मेट्रो किंवा इतर सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर वाढवावा आणि पहिल्या टप्प्यात किमान एक दिवस असा प्रयोग करून नागरिकांसमोर आदर्श ठेवावा, असे बैठकीत ठरले आहे. या निर्णयामुळे केवळ इंधनाची बचत होणार नाही, तर सार्वजनिक वाहतुकीच्या वापराला प्रोत्साहनही मिळणार आहे. शासनाने घेतलेल्या या निर्धाराची कडक अंमलबजावणी व्हावी, यासाठी वरिष्ठ स्तरावरून विशेष लक्ष दिले जाणार असल्याचेही या बैठकीत नमूद करण्यात आले आहे.

अनावश्यक विद्युत रोषणाईवर निर्बंध; ऊर्जा बचतीसाठी कडक पावले

केवळ इंधनच नव्हे, तर वीज बचतीसाठीही मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. शहरांमधील अनावश्यक होर्डिंग्ज आणि फ्लेक्सवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून, अशा ठिकाणी सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या डेकोरेटिव्ह लायटिंगवर निर्बंध लादण्यात आले आहेत. ऊर्जा बचतीसाठी अनावश्यक वीज वापर थांबवणे ही काळाची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. या संपूर्ण मोहिमेचा उद्देश राज्याची आर्थिक बचत करणे आणि उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा विनियोग अधिक कार्यक्षमतेने करणे हा आहे. या निर्णयांचे संपूर्ण प्रशासकीय वर्तुळातून स्वागत होत असून, त्याची तातडीने अंमलबजावणी सुरू झाली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

डोंबिवलीतील तरुण मित्रांसोबत इर्शाळवाडी ट्रेकला गेला, पण घरी डेथ बॉडी परतली, काय घडलं?