मुंबई: मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले उद्धव व राज ठाकरे भावांनी एकत्र येत लढवलेल्या पहिल्या निवडणुकीत सुपडा साफ झालाय. आणि या निवडणुकीवरुन भाजपचा आंनंद पोटात माईना अशी परिस्थिती आहे. अर्थात ही निवडणूक छोटी असली तरी महत्त्वाची होती. बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनलने जबरदस्त विजय मिळवला. त्यांच्या 14 जागा निवडून आल्या.
ADVERTISEMENT
ठाकरे बंधूंचा मोठा पराभव
21 जागांसाठीची ही निवडणूक बेस्ट कामगारांची होती. या निवडणुकीत बॅलेट पेपर म्हणजे मत पत्रिकेद्वारे मतांची नोंदणी करण्यात आली होती. या निवडणुकीत भाजपा, प्रसाद लाड महायुतीला 6 जागा मिळाल्या यापैकी 4 भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला 2 जागा मिळाल्यात आणि एक जागा एससी एसटी वेल्फेअर असोसिएशन च्या युनियनने जिंकली आहे. आता या निवडणुकीत सपाटून पराभव मिळाल्यानंतर ठाकरे बंधूंच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उभे केले जाऊ लागले आहेत.
‘बेस्ट’ पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंच्या दोन्ही पक्षांच्या युतीच्या पॅनेलचा धुव्वा उडाल्याने ठाकरे बंधू एकत्र आल्याची सुरुवात काही चांगली झालेली नाही. या पराभवानंतर आगामी मुंबईसह अन्य महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्र लढविणार का, याबाबत अद्याप स्पष्टता काही नाही. बीएमसीसाठीही भावांमध्ये युतीचं अजून काहीही ठरलेलं नाही. पण भाजपकडून मात्र हा विजय महापालिका विजयाची जणू काही पायाभरणी आहे अशा पद्धतीने सेलिब्रेट केला जात आहे. हा विजय भाजपसाठी शुभसंकेत मानला जातोय.
खरोखर या पराभवाने दोन्ही ठाकरे भावांच्या युतीवर परिणाम होणार का? आणि आगामी मनपा निवडणुकीवर खासकरुन बीएमसीमध्ये याचा प्रभाव जाणवणार आहे का? याचबाबत आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
भाजपचं जोरदार सेलिब्रेशन
बेस्ट पतपेढीत शशांक रावांच्या पॅनलच्या विजयाचं सेलिब्रेशन त्यांच्या पॅनलपेक्षा भाजपकडूनच जास्त केलं जातं आहे. शशांक राव सध्या भाजपमध्ये असले तरी त्यांनी ठाकरेंसह भाजपविरोधात देखील ही निवडणूक लढवलेली. मात्र भाजपनं हे सेलिब्रेशन अत्यंत मनावर घेतलं.
आशिष शेलारांनी ट्वीट करत म्हटलंय भाजपासाठी मुंबईकरांचा शुभसंकेत! बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीत मुंबईकर जिंकले, कामगार जिंकले.कामगारांनी आम्हाला शुभसंकेत दिला आणि "पत" आणि "पेढी"साठी लढणाऱ्यांच्या हाती मोठा भोपळा दिला.मुंबईकर, कामगार, श्रमिक आमच्याबाजूने आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पक्ष म्हणून लढलो नाही पण आमचे प्रसाद लाड आणि शशांक राव विजयी झाले. हा तर मोठा शुभसंकेत! बॅलेट पेपरवर निवडणूका झाल्यावर हा विजय आम्हाला मिळाला आहे. मुंबईकर ही आमचा आणि मुंबई ही आमची! असं शेलार म्हणताहेत. फक्त शेलारच नाही तर भाजपचे बरेच नेते हा विजय असाच साजरा करताहेत.
15 हजारहून अधिक मतदार या निवडणुकीत होते. म्हणजे एखाद्या मोठ्या गावच्या निवडणुकीएवढी निवडणूक. या निकालानंतर सध्या हाईप खूपच सुरु आहे. या निकालाचं असं चित्र भाजपकडून दाखवलं जातंय की ही निवडणूक जिंकली म्हणजे बीएमसी जिंकली.
बेस्टमध्ये खाजगीकरण, बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर न होणं, बोनस, ग्रॅज्यूईटीसाठी वारंवार आंदोलनं या गोष्टी ठाकरेंच्या विरोधात गेल्याचं स्पष्ट दिसतंय. ठाकरे बंधू विरुद्ध महायुती असं चित्र जरी दाखवलं गेलं असलं तरी ही निवडणूक खरी तर शशांक राव आणि सुहास सामंत यांच्यात झाली.
मात्र चित्र असं रंगलं की शिवसेना यूबीटी विरुद्ध भाजप अशी आहे. शशांक रावांच्या पॅनलची जास्त चर्चाही नव्हती. प्रसाद लाड आणि दरेकर यांनी ऐनवेळी उडी घेतली आणि चार जागा तरी जिंकल्या.
ठाकरे भावांना मात्र भोपळा मिळालाय. शशांक रावांना 14 जागा मिळाल्या, एक जागा एससी एसटी वेल्फेअर असोसिएशनच्या युनियनला मिळाली.
या विजयाचा मुंबई महापालिकेवर काय परिणाम होईल?
मनसेचं या बेस्टमध्ये म्हणावं असं प्राबल्य नाही, दबदबा होता तो ठाकरेंच्या सेनेचा आणि सुहास सामंत यांचा. शिवसेनेनं मतदारांना गृहित धरलं, बाहेर चित्र रंगवलं की भाऊ एकत्र आलेत वगेरे मात्र प्रत्यक्षात दोन्हीकडील बड्या नेत्यांनी रस घेतला नाही. शिवाय ठाकरेंना आत्मविश्वास नडला, 9 वर्षांपासून इथे जी एकाधिकारशाही होती त्याचा हिशोब मतदारांनी केला असल्याचं बोललं जात आहे. मतदारांना गृहित धरलं तर काय होतं याचं हे मोठं उदाहरण...
शशांक राव भाजपसोबत आहेत. मात्र इलेक्शन त्यांनी संघटनेकडूनच लढवण्याचा निर्णय घेतला. शेलारांनी त्यांना मदत केली. दरेकर आणि लाडांनी ही निवडणूक चुरशीची केली.
शशांक राव यांच्या पॅनेलच्या विजयात गेल्या अनेक वर्षांपासून कामगार संघटनांसोबत काम करण्याचा अनुभव, आंदोलने आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात वेळोवेळी घेतलेला पुढाकार हे घटक महत्त्वाचे ठरले. या सगळ्यामुळे बेस्ट पतपेढीच्या मतदारांनी ठाकरे बंधू आणि महायुती दोघांनाही नाकारत शशांक राव पॅनेलला एकहाती सत्ता दिली.
आता येऊयात हा विजय आणि बीएमसी निवडणूक या मुद्द्यावर. तर ही फक्त बेस्ट कामगारांपुरती निवडणूक होती, त्यामुळं खूप मोठा फायदा मनपा निवडणूकीत होईल असं नाही. जरी ही निवडणूक शिवसेना ठाकरेंनी जिंकली असती तर त्यांनाही याचा तसा विशेष फायदा झालाच नसता. पतपेढी वगैरेचं इलेक्शन वेगळं असतं, तिथे विविध पक्षाचे लोक असतात. इथेही ते दिसून आलं आहेच. त्यामुळं महापालिका निवडणुकीत हे लोक आपापल्या पक्षांचे असतात.
बेस्ट कामगारांच्या मागण्यांवर विचार करुन भाजपनं मदत केलेली. त्यामुळं थोडाफार हातभार लागू शकतो.
शशांक रावांचे वडील शरद राव यांनी विरोधात असताना आणि 25 वर्ष शिवसेना-भाजपची सत्ता असताना पतपेढीवर वर्चस्व ठेवलं होतं. तेव्हा कर्मचारी पतपेढीत त्यांच्याबरोबर राहिले होते. मात्र, त्यांना याचा दुसऱ्या निवडणुकांमध्ये फायदा झाला नाहीच.
या निवडणुकीत ठाकरेंची सेना आणि मनसेचं पानिपत झालंय. याचा विचार दोन्ही ठाकरे बंधूंना करावाच लागेल. मनपाआधी या गोष्टींचा आढावा घ्यावा लागेल. सगळे कर्मचारी हे मराठी आहेत. बेस्टमध्ये सगळे कर्मचारी हे मराठी आहेत. या मराठी माणसांनी आधी शरद रावांना साथ दिली आता शशांक राव यांना.
असं जरी असलं तरी या निवडणुकीचा आणि निकालाचा मनपा निवडणुकीवर काही परिणाम होईल असं नाही. मुंबई मनपामध्ये चित्र वेगळं असू शकतं. मुंबईचे प्रश्न वेगळे आहेत, लोकांचे इशू वेगळे आहेत, तो कॅनव्हास मोठा आहे. त्यामुळं त्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम मनपात दिसून येईल. भाजप याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल, ते त्यांच्या बाजूने योग्य असेलच. मात्र या छोट्या निवडणुकीचा काही संबंध नाही, असं ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य सांगतात.
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणतात, एकाकडे गमावण्यासाठी काही राहिलेले नाही आणि दुसऱ्याकडे कमावण्यासाठी काही राहिलेले नाही, अशा ‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्ये जोडली तरी त्या गणिताचे उत्तर शून्यच येते, हे शाळा न शिकलेल्या मुलांनाही माहीत असलेले उत्तर ओळखले नाही तर काय होईल?… या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ‘बेस्ट कामगार पतपेढी’च्या निवडणूक निकालाकडे पाहा! कालपर्यंत दोन शून्ये आपली किंमत जोखण्याचे आव्हान देत होती, आज त्यांनाच त्यांची किंमत कळली आहे! असा टोला उपाध्ये यांनी लगावला.
मात्र युद्ध अजून संपलेलं नाही, कारण आम्ही अजून जिंकलेलो नाही, असं म्हणत संदीप देशपांडेंनी वेगळे संकेत दिलेत. एकूण ही निवडणूक आणि मनपाची निवडणूक यात जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळं याचा परिणाम बीएमसी निवडणूकीत होईल असं दिसत नाही. एक गोष्ट मात्र खरी की केवळ ब्रँड म्हणून असणे वेगळी गोष्ट आणि निवडणुकीला सिरीयसली घेऊन त्या पद्धतीनं पावलं उचलणं वेगळी गोष्ट आहे. या गोष्टींना ठाकरे बंधूंना सिरियसली घ्यावेच लागणार आहे, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT
