Eknath Shinde Shiv Sena is engaging in hotel politics : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. महापौरपदावर कोणाची वर्णी लागणार, यावरून सध्या मोठी रस्सीखेच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ‘हॉटेल पॉलिटिक्स’चा मार्ग स्वीकारल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईत महापौर निवडला जाईपर्यंत शिवसेनेचे सर्व निवडून आलेले नगरसेवक पुढील तीन दिवस वांद्र्याच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहेत.
ADVERTISEMENT
मुंबईत महापौर होत नाही तोपर्यंत शिवसेनेचं हाॅटेल पाॅलिटिक्स
शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना तीन वाजता बांद्रा ताज लॅंड्स एंडला येण्याचे आदेश
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सर्व निवडून आलेले नगरसेवक वांद्र्याच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये नेणार.
आज दुपारी 3 वाजता वांद्र्याच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये नेणार.
पुढील 3 दिवस या नगरसेवकांचा मुक्काम वांद्र्याच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये असणार आहे.
शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना आज दुपारी तीन वाजता वांद्र्याच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पक्षातील कोणताही नगरसेवक फुटू नये, तसेच सत्तास्थापनेदरम्यान एकसंघ राहावे, यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपला एकहाती महापौर करता येत नसल्याने शिंदेंच्या शिवसेनेचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
कोणत्या पक्षाला किती जागा?
भारतीय जनता पार्टी - 89
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) - 65
शिवसेना - 29
इंडियन नेशनल काँग्रेस - 24
ऑल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन - 8
महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 6
नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी - 3
समाजवादी पार्टी - 2
नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार - 1
दरम्यान, निवडणूक निकालांकडे पाहिले असता भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने 89 जागा जिंकत एकूण 11 लाख 79 हजार 273 मते मिळवली असून मतांची टक्केवारी 21.58 टक्के आहे. विजयी उमेदवारांना मिळालेल्या एकूण मतांपैकी भाजपचा वाटा तब्बल 45.22 टक्के इतका आहे. तरीही बहुमताचा आकडा गाठण्यात भाजप अपयशी ठरला आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने 65 जागांवर विजय मिळवत 7 लाख 17 हजार 736 मते मिळवली आहेत. या पक्षाची एकूण मतांची टक्केवारी 13.13 टक्के असून विजयी मतांचा वाटा 27.52 टक्के आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 29 जागा जिंकल्या असून 2 लाख 73 हजार 326 मते मिळवली आहेत. मतांची टक्केवारी 5 टक्के तर विजयी मतांचा वाटा 10.48 टक्के इतका आहे.
इंडियन नॅशनल काँग्रेसने 24 जागांवर विजय मिळवला असून 2 लाख 42 हजार 646 मते (4.44 टक्के) मिळाली आहेत. AIMIM ने 8 जागा जिंकत 68 हजार 72 मते मिळवली, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 6 जागांवर विजय मिळवत 74 हजार 946 मते मिळवली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 3 जागा, समाजवादी पार्टीला 2 जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाला 1 जागा मिळाली आहे.
या सर्व समीकरणांमध्ये भाजपसाठी महापौरपदाचा मार्ग शिंदेंच्या शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय अवघड ठरत आहे. त्यामुळेच सध्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा ताज लँड्स एंडमधील मुक्काम आणि ‘हॉटेल पॉलिटिक्स’कडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मुंबईचा पुढील महापौर कोण, याचा निर्णय आता येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











