मुंबई: एसटी (ST) बँकेच्या बैठकीत आज (15 ऑक्टोबर) तुफान राडा झाला. या बैठकीत गुणरत्न सदावर्ते गट आणि शिवसेना शिंदे गटाचे अडसूळ यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. बैठक सुरु असतानाच दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. व्हिडीओत स्पष्ट दिसतंय की काही कार्यकर्ते बाटल्या आणि वस्तू फेकून मारत आहेत. यामध्ये काही संचालक जखमी झाल्याची सुद्धा माहिती आहे. या दोन्ही गटाचा वाद आता नागपाडा पोलीस ठाण्यात पोहोचला आणि एकमेकांविरोधात तक्रारी देण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT
हाणामारीचं नेमकं कारण काय?
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी बँकेची ही मिटिंग बोलवण्यात आली होती. त्यामध्ये दिवाळी बोनस वाटपाची चर्चा करण्यात आली. याच मुद्द्यावरून सदावर्ते गट आणि अडसूळ गट यांच्यामध्ये मतभेद झाले आणि नंतर त्याचे रुपांतर हाणामारीमध्ये झालं. एसटी बँकेच्या संचालकांच्या बैठकीमध्ये बाहेरुन आलेली माणसे बसवण्यात आल्याचा आरोप अडसूळ गटाकडून करण्यात आला आहे. सदावर्ते गटाकडून या बँकेमध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप अडसूळ गटाकडून करण्यात येत आहे. त्यातूनच आजचा राडा झाल्याचं समोर आलं.
हे ही वाचा>> अनंत तरे कोण होते? ज्यांचं ऐकलं नाही म्हणून उद्धव ठाकरेंना होतोय पश्चाताप
आज एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची मीटिंग घेण्यात आली होती. त्यात अडसूळ गटातील संचालकांनी सदावर्ते गटातील संचालकांनी बँकेत भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला. ज्यानंतर या बैठकीत अक्षरश: फ्री स्टाइल हाणामारी पाहायला मिळाली.
ही हाणामारी अक्षरशः कपडे फाडण्यापर्यंत गेली. तर दोन्ही गटाच्या लोकांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी तुडवलं. संचालकांचा हा राडा आता पोलीस स्टेशनपर्यंत गेला असून पुढील कारवाई चालू आहे.
हे ही वाचा>> 'पश्चाताप होतोय, तेव्हाच अनंत तरेंचं ऐकलं असतं तर शाहांच्या चरणी लोटांगण घेणारे...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
या बाबतीत माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, "या बँकेमध्ये सदावर्तेंनी जो भ्रष्टाचार, गैरव्यवहार केला त्यामुळे कर्मचाऱ्यांना ही बँक सुरक्षित वाटत नाही. सदावर्तेंनी बाहेरची माणसे बैठकीत आणले आणि त्यांनी हा राडा घातला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. या प्रकरणी आम्ही नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.'' असं अडसूळ यांनी सांगितलं. दरम्यान यावर सदावर्ते गटाकडून काही प्रतिक्रिया आलेली नाही.
एसटी को-ऑपरेटिव्ह बँक ही एसटी कर्मचाऱ्यांच्या घामाच्या पैशावर चालणारी आशिया खंडातील सगळ्यात मोठी को-ऑपरेटिव्ह बँक म्हणून ओळखली जाते. लालपरीच्या सेवेकऱ्यांच्या या बँकेच्या बैठकीतील राडा सध्या खूपच चर्चेत आहे.
ADVERTISEMENT
