INDIA Alliance Meeting : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात 'इंडियन एक्स्प्रेस'च्या अहवालानंतर देशभर आंदोलने तीव्र झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत पार पडलेल्या 'इंडिया' (INDIA) आघाडीच्या बैठकीत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे प्रत्यक्ष, तर शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते. सुमारे 10 मिनिटांच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या विखुरलेल्या आंदोलनांवर आणि काँग्रेसच्या 'एकला चलो रे'च्या भूमिकेवर हरकत घेतली.
ADVERTISEMENT
मविआतील संवादाचा अभाव
उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, बिहार, बंगाल असो की महाराष्ट्र, प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने स्वतंत्र आंदोलने करत आहे, जे योग्य नाही. मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधातील ही लढाई जिंकण्यासाठी सर्वांनी 'इंडिया' आघाडीच्या एकाच छताखाली एकत्र येऊन रस्त्यावर उतरायला हवे. महाराष्ट्रात काँग्रेसने महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी कुठलाही संवाद किंवा सल्लामसलत न करता मुंबईत स्वतंत्र आंदोलने सुरू केली. यातून महाविकास आघाडीतील संवादाचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो, असा थेट आक्षेप ठाकरे यांनी या बैठकीत मांडला.
हे ही वाचा : को-पायलटकडून चाकू हल्ला, जखमी अवस्थेतही भारतीय कॅप्टनने जीवाची बाजी लावून 180 प्रवाशांना वाचवलं
विरोधकांच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह
दुसरीकडे, या बैठकीला आम आदमी पक्ष (AAP) आणि द्रमुक (DMK) या प्रमुख घटकांची अनुपस्थिती, तसेच राज्यसभेच्या निवडणुकांमुळे अखिलेश यादव यांची गैरहजेरी यामुळे विरोधकांच्या एकजुटीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मतदारयादी फेरआढावा, फॉर्म-6 मधील वादग्रस्त बदल आणि निवडणूक आयुक्तांच्या अधिकारांवरून राजकीय पक्षांना फटका बसत असतानाही प्रादेशिक मतभेदांमुळे काही पक्षांनी अंतर राखल्याचे दिसले. अशा अत्यंत गंभीर मुद्द्यावर तरी विरोधकांनी मतभेद बाजूला ठेवून एकजूट दाखवणे गरजेचे होते, हाच सूर या बैठकीतून समोर आला.
हे ही वाचा : सांगली : भावनिक आधाराच्या बहाण्याने दोन वर्ष बलात्कार, नंतर धर्मांतराचा दबाव; महिलेसोबत काय घडलं?
एकी की अंतर्गत मतभेद?
आता महाराष्ट्रात येत्या 4 ऑक्टोबर रोजी शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी संयुक्तपणे आंदोलनाची घोषणा केली आहे. मात्र, काँग्रेसच्या स्वतंत्र आंदोलनांनंतर आता 4 ऑक्टोबरच्या या मोर्च्यात काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील इतर नेते सहभागी होतात की हा मोर्चा केवळ शिवसेना आणि मनसेपुरताच मर्यादित राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या बैठकीनंतर तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीची प्रत्यक्ष एकी दिसणार की अंतर्गत मतभेद कायम राहणार, हे आगामी आंदोलनांमधूनच स्पष्ट होईल.
ADVERTISEMENT












