Shahid Jawan Dinesh Sharma : पाकिस्तानवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने आता सीमावर्ती भागात गोळीबार सुरू केलाय. पाकिस्तानने पुंछ भागात मोठ्या प्रमाणात गोळीबार आणि उखळी तोफांनी हल्ला केला. यामध्ये भारतीय सैन्यातील सैनिक शहीद झाला आहे. हरियाणाच्या पालवल जिल्ह्यातील मोहम्मदपूर गावचे 32 वर्षीय लान्स नायक दिनेश कुमार यांना वीरमरण प्राप्त झालं.
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वीच झाली होती लान्स नायक म्हणून बढती
दिनेश 2014 मध्ये सैन्यात भरती झाले होते. अलीकडेच त्यांची लान्स नायक म्हणून बढती झाली होती. ते जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात तैनात होते, अशी माहिती त्यांचे वडील दया राम शर्मा यांनी दिली. “आज सकाळी आम्हाला त्यांच्या मृत्यूची बातमी मिळाली. त्याच्यावर उद्या (गुरुवारी) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत,” असं राम शर्मा म्हणाले.
हे ही वाचा >> पाकिस्तान पुन्हा हादरला! लाहोरला तीन मोठे स्फोट, सायरन वाजला, लोक पळत सुटले, घटना काय?
ऑपरेशनसाठी जाताना केला होता शेवटचा फोन...
दिनेश शर्मा यांचा धाकटा भाऊ पुष्पेंद्र म्हणाला, दोन दिवसांपूर्वी तो माझ्याशी बोलला होता. तेव्हा त्यानं कुटुंबातल्या सर्वांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. दिनेशचा जवळचा मित्र प्रदीप म्हणाला की, काल रात्री दिनेश ऑपरेशनसाठी जात असताना त्यानं रात्री 10:30 वाजता त्याच्याशी बोलून तो ऑपरेशनसाठी जात असल्याचं सांगितलं होतं. ऑपरेशनदरम्यान फोन जवळ ठेवता येणार नाही, म्हणून आपण नंतर बोलू असं सांगून प्रदीपने त्याला कॉल डिस्कनेक्ट करण्यास सांगितलं होतं.
दिनेशच्या मुलालाही सैन्यात पाठवणार
“दिनेश आणि इतर चार सैनिक नियंत्रण रेषेवर (LOC) गस्त घालत असताना उखळी तोफांच्या हल्ल्यात शहीद झाले. संपूर्ण देशाला त्याचा अभिमान आहे. त्याचं बलिदान कायम स्मरणात राहील. तो एक शूर सैनिक होता,” असं दया राम यांनी डबडबलेल्या डोळ्यांनी सांगितलं. दुखाच्या या क्षणात असतानाही ते अभिमानाने म्हणाले, माझे इतर दोन मुलंही सैन्यात आहेत. दिनेश यांचा मुलगाही भविष्यात सैन्यात जाऊन वडिलांचा वारसा पुढे नेईल.
हे ही वाचा >> पाकिस्तानी सैन्याची गाडी रिमोट बॉम्बने उडवली, 7 जणांच्या चिंधड्या उडाल्या... BLA ने केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ
दिनेशचे दोन भाऊही सैन्यात
दिनेश हे पाच भावंडांपैकी सर्वात मोठे होते. गावचे सरपंच भूप राम यांनी सांगितलं, “त्यांचे दोन धाकटे भाऊ कपिल आणि हरदूत यांची ‘अग्निवीर’ म्हणून निवड झाली आहे. त्यांचा सर्वात लहान भाऊ पुष्पेंद्र हा विद्यार्थी आहे, तर दुसरा भाऊ विष्णू शेती करतो. दिनेश यांची पत्नी सीमा या वकील असून, त्या गर्भवती आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.”
“दिनेश यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. लहानपणापासूनच त्यांना सैन्यात जायचं होतं. त्यांचा देशाला अभिमान आहे,” असं भूप राम म्हणाले. दिनेश यांच्या बलिदानाने गावात शोककळा पसरली असून, त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि गावकरी पुढे आले आहेत.
ADVERTISEMENT
