Dharashiv : धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात आलेल्या महापूरामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना धाराशिवचे जिल्हाधिकारी मात्र, नाचगाण्यात मग्न असल्याचं पाहायला मिळालंय. धाराशिवचे जिल्हाधिकारी Keerthi Kiran Pujar यांनी तुळजापूर सांस्कृतिक महोत्सवात तुफान डान्स केलाय. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून सामान्य लोक त्यांच्या कृतीमुळे संताप व्यक्त करत आहेत. यावर आता ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
बेजबाबदारपणे वर्तन करणे, ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट - कैलास पाटील
कैलास पाटील म्हणाले, धाराशिव जिल्ह्यात महापूर आलाय. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय, त्याचे 100 टक्के पंचनामे अजून पूर्ण झालेले नाहीत. अ-ब-क-ड स्वरुपात ही माहिती शासनाकडे द्यावी लागते. ही माहिता देखील अद्याप शासनाकडे पोहोचलेली नाही. अशा परिस्थितीत हे सगळं पूर्ण करणे. शेतकऱ्यांना धीर देणे, हे जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांचं आहे. अशा काळात बेजबाबदारपणे वर्तन करणे, ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे हे वर्तन शासनाचं वर्तन समजलं जातं. त्यामुळे जबाबदारीने वागणे, हे अधिकाऱ्यांचं कर्त्यव्य असतं.
महापूरामुळे धाराशिवमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
गेल्या काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना महापूराचा फटका बसलाय. धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजनुसार जिल्ह्यातील 2 लाख 26 हजार 706 हेक्टवरील पिके व फळबागांचीअतिवृष्टीमुळे नासधूस झालीये. एक हजार 48 घरांची पडझड झाली असून 207 जनावरं मृत्यूमुखी पडली आहेत. जिल्ह्यातील 363 गावांसह 1 लाख 98 हजार 375 शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने वेगाने हाती घेतले आहेत, 15 तलाव फुटले असुन 16 गावांचा संपर्क तुटल्याने 498 नागरिकांना सुरक्षित हलवण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
