Maharashtra Politics : पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 119 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले असून हा विजय भाजपासाठी ऐतिहासिक मानला जात आहे. समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पालकमंत्री अजित पवार यांचे आव्हान असतानाही भाजपने पुण्यात निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र, एवढा मोठा विजय मिळवूनही आता भाजपपुढे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला आहे, तो म्हणजे पुण्याच्या महापौरपदाची जबाबदारी कोणावर सोपवायची?
ADVERTISEMENT
निवडणुकीपूर्वी उमेदवारी देण्यावरून राज्यभरात भाजपमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला होता. त्याच पार्श्वभूमीवर महापौरपदाच्या निवडीदरम्यान पुन्हा अंतर्गत वाद निर्माण होऊ नयेत, यासाठी वरिष्ठ नेतेच अंतिम निर्णय घेतील, अशी चर्चा पक्षात सुरू आहे. त्यामुळे पुण्यातील महापौरपदाचा निर्णय स्थानिक पातळीवर न होता थेट पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर जाण्याची शक्यता अधिक आहे.
सध्या पुण्यातून भाजपकडून शहराध्यक्ष धीरज घाटे आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष गणेश बिडकर यांच्यात महापौरपदासाठी चुरस रंगताना दिसत आहे. काल गणेश बिडकर यांच्या समर्थकांनी मतमोजणीपूर्वीच “महापौर गणेश बिडकर” असे बॅनर शहरात झळकावले होते. या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.
दुसरीकडे, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे हेही महापौरपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. मात्र त्यांनी थेटपणे आपली इच्छा जाहीर केली नसली तरी “हा विजय कोणाचा वैयक्तिक नसून संपूर्ण भारतीय जनता पक्षाचा आहे,” असे विधान करत त्यांनी अप्रत्यक्षपणे माजी खासदार मुरलीधर मोहोळ यांना राजकीय इशारा दिल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या विजयोत्सवावेळी मुरलीधर मोहोळ उपस्थित असताना धीरज घाटे मात्र गैरहजर होते. यामुळे पक्षातील गटबाजी अधिकच ठळक झाली आहे.
दरम्यान, श्रीनाथ भिमाले यांचेही नाव महापौरपदासाठी चर्चेत आहे. विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या भिमाले यांनी महापौरपदाचा शब्द मिळाल्यानंतर निवडणूक लढवण्यापासून माघार घेतल्याची अंतर्गत माहिती समोर येत आहे. आरक्षण सोडतीनंतर महापौरपदासाठी इच्छुकांची यादी मोठी असून ती थेट भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवण्यात आली आहे.
पुणे शहरात भाजपचे दोन स्पष्ट गट असल्याने महापौरपदाची निवड अधिक गुंतागुंतीची ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला असल्याचे सांगितले जात आहे. वरिष्ठ नेतृत्व कोणावर विश्वास दाखवते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पुण्यात भाजपने सत्ता मिळवली असली तरी महापौरपदावर कोण विराजमान होणार, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. मात्र तोपर्यंत भाजपमधील अंतर्गत राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळणार, हे निश्चित.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मुंबई अन् पुणे महानगरपालिकेत विजय मिळवताच मंत्रिमंडळाची बैठक, देवेंद्र फडणवीसांचे 10 धडाकेबाज निर्णय
ADVERTISEMENT











