मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पडद्यामागून सुरू असलेल्या विलिनीकरणाच्या चर्चांना अजित पवार यांच्या निधनानंतर जास्तच उधाण आलं. मात्र चर्चांमधील मुख्य नेते असलेले अजितदादा यांच्या निधनामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बाजू लंगडी पडली आणि विलिनीकरणाच्या चर्चा बासनात गुंडाळल्या गेल्या. पण त्याचवेळी प्रश्न असाही उपस्थित होत होता की विलिनीकरण झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष महायुतीसोबत राहणार की महाविकास आघाडीसोबत? मुंबई Tak चावडी या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यावर मोठं भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
‘विलिनीकरणाची चर्चा ही केवळ अजित पवारांच्या अपघातामुळे थांबली. अपघात नसता तर १२ फेब्रुवारीला आम्ही एकत्र झालो असतो’असं थेट विधान रोहित पवार यांनी केलं आहे. पण याचनंतर त्यांनी याबाबत आणखीही काही मोठे खुलासे मुंबई Tak चावडीवर केले आहेत. पाहा रोहित पवार नेमकं काय म्हणाले.
मुंबई Tak चावडीवर रोहित पवारांचा मोठा खुलासा
प्रश्न- विलिनीकरणानंतर राष्ट्रवादी महायुतीचा भाग असती का?
रोहित पवार: दादांची गेल्या 4 महिन्यातली भाषणं तुम्ही बघा, ही भाजपच्या बाजूची होती की विरोधातली.
हे ही वाचा>> अजितदादा भाजपसोबतची सत्ता सोडणार होते?, मुंबई Tak चावडीवर रोहित पवारांच्या विधानाने मोठी खळबळ
प्रश्न- अजितदादा सगळ्या यंत्रणांचा दबाव झुगारून महाविकास आघाडीचा भाग झाले असते?
रोहित पवार: दादांवर झालेले आरोप हे क्लिअर झाले, भाजपच्या नेत्यांनी आणि यंत्रणांनीही ते सांगितलं. जेव्हा दादा आमच्या विचाराबरोबर होते तेव्हा त्यांना मुद्दाम बैलगाडीभर कसले पुरावे होते माहित नाही, पण टार्गेट केलं होतं. मी पण ईडीचा सामना केलाय, ईडीमध्ये तुम्ही चुकीचं नाही हे तुम्हाला सिद्ध करावं लागतं.. पण पहिले जेलमध्ये जावं लागतं, अशात आपली वयस्कर आई, कुटुंब अख्खा पक्ष, कार्यकर्ते यांना एकटं सोडून जर आपल्याला आत टाकलं तर या सगळ्यांचं काय होईल? याचा विचार करणारे काही असतात, दादांनी तो विचार केला असावा, नंतर दादांना क्लिनचिट मिळाली होती. त्यामुळे दादांबरोबर आम्ही एनडीएमध्ये जाणार होतो की दादा आमच्याबरोबर येणार होते, हे मी थेट बोलणार नाही.. पण दादा भाजप बरोबर मनापासून नव्हते.
हे ही वाचा>> 'महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या कृतघ्न मुलाने... ', पार्थ पवारांवर काँग्रेस चिडली! बरंच काही बोलले!
रोहित पवारांच्या याच उत्तरातून दोन गोष्टी स्पष्ट होत आहेत. एक की, अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर त्यांच्यावर झालेल्या आरोपांमधून त्यांना क्लिनचीट मिळाली आणि दुसरी गोष्ट की भाजपसोबत राहण्याच्या मन:स्थितीत नसल्यामुळे कदाचित अजित पवार विरोधी पक्षात आले असते असा अर्थ निघू शकतो.
मुंबई Tak चावडी या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण, पटेल-तटकरेंचं राजकारण, सुनेत्रा पवारांची सक्रीय राजकारणातली एंट्री, पार्थ पवारांभोवतीचे वाद, बारामती पोटनिवडणूक या सर्व मुद्द्यांवरील प्रश्नांवर रोहित पवार यांना आम्ही बोलतं केलंय. ही संपूर्ण चावडी मुंबई Tak च्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला पाहता येईल.
ADVERTISEMENT











