अजितदादा भाजपसोबतची सत्ता सोडणार होते?, मुंबई Tak चावडीवर रोहित पवारांच्या विधानाने मोठी खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत बोलताना NCP-SP चे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार हे भाजपसोबतची सत्ता सोडून शरद पवारांसोबत येण्याबाबतची चर्चा करत असावे असं मोठं विधान केलं आहे. पाहा ते नेमकं काय म्हणाले.

ajit pawar was planning to quit alliance with bjp in maharashtra government rohit pawar statement at mumbai tak chavadi sparks a major stir in political corridoor

अजितदादा भाजपसोबतची सत्ता सोडणार होते?

मुंबई तक

• 10:51 PM • 07 Apr 2026

follow google news

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवारांच्या पक्षासोबत विलिनीकरणाबाबत सकारात्मक होते. असं सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून सांगितलं जात आहे. पण याच विलिनीकरणासंबंधी बोलताना आमदार रोहित पवार यांनी आज (7 एप्रिल) अत्यंत मोठं आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारं विधान केलं आहे.

हे वाचलं का?

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबई Tak चावडीवर बोलताना असं म्हटलं की, 'आम्ही जिथे आहोत तिथे आहोत. त्यामुळे विलिनीकरणाचा निर्णय घेतला जात असेल तर तो तिकडून इकडे येण्यासाठी घेतला जात असू शकतो.' 

रोहित पवारांच्या याच विधानाचा अर्थ आता असा लावला जात आहे की, अजित पवार जर शरद पवारांसोबत विलिनिकरणाची चर्चा करत होते तर त्याचवेळी ते भाजपसोबतची सत्ता सोडून येण्याचाही चर्चा नेत्यांसोबत करत होते. 

रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

रोहित पवार: 'शरद पवारांचं कालचं स्टेटमेंट जे होतं ते कुठल्या बाबतीत होतं ते होतं बारामती पोटनिवडणुकीच्या बाबतीत. त्यात त्यांनी काय सांगितलं की, साहेबांनंतर दादाच एक मोठे नेते होते. आता अजितदादा त्या ठिकाणी नाहीत.. तिथे आम्ही सुद्धा उमेदवार देऊ शकतो. काँग्रेसपेक्षा आमचा जो पक्ष आहे आणि त्याचं जे चिन्ह आहे ते जास्त प्रसिद्ध आहे किंवा लोकांच्या मनामध्ये आहे. आम्ही देऊ शकलो असतो उमेदवार.  पण कुटुंबप्रमुख म्हणून आज एक मोठा नेता आणि तो देखील कुटुंबातील एक व्यक्ती.. ज्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला असेल तिथे त्याच जागेवर पोटनिवडणूक होत असेल तर कुटुंबप्रमुख म्हणून आमची सुद्धा काही तरी जबाबदारी आहे. हे पवार साहेबांचं विधान होतं. ते इतर गोष्टीसाठी नव्हतं..'

हे ही वाचा>> '...नाहीतर मीही अनेक गोष्टी सांगू शकतो', 'त्या' विधानाने मोठी खळबळ.. NCP विलिनीकरणावर CM फडणवीस असं का म्हणाले?

'आमच्यासाठी विलिनीकरणाचा प्रश्न हा दादांनंतर त्याठिकाणी संपलेला आहे. आता विषय एवढाच आहे की, ते लोकं जे आहेत किंवा त्यातील काही नेते आहेत ते सातत्याने हा मुद्दा आणत आहेत त्याला आपण काय करणार?'

प्रश्न: विलिनीकरणाचा प्रश्न कायमचा संपलाय असं म्हणायचं की, सध्या संपलेला आहे म्हणायचं?

रोहित पवार: 'हे बघा.. दादा असताना देखील आम्ही हेच म्हणायचो की, आम्ही एकत्रित यायला तयार आहोत. आम्ही जिथे आहोत तिथे आहोत. त्यामुळे विलिनीकरणाचा निर्णय घेतला जात असेल तर तो तिकडून इकडे येण्यासाठी घेतला जात असू शकतो. पण आमचे जे नेते आहेत किंवा त्यांचे जे नेते आहेत त्यांच्यातील तो विषय आहे.' असं म्हणत रोहित पवारांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

हे ही वाचा>> 'महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या कृतघ्न मुलाने... ', पार्थ पवारांवर काँग्रेस चिडली! बरंच काही बोलले!

'अजित पवार सरकारमध्ये स्थिर होते, ते महायुतीतून बाहेर पडणार नव्हते..' CM फडणवीसांनी आधीच केलेला दावा 

दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर काही दिवसातच झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत विचारणा करण्यात आली होती. तेव्हा मुख्यमंत्री असं म्हणालेले की, 'समजा, अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते. तर ती चर्चा NDA मधून बाहेर पडण्याकरिता करत होते का? ते काही सरकारमधून बाहेर पडणार होते का? सरकारमध्ये ते स्पष्टपणे स्थिर होते. त्यामुळे रोज काही तरी कन्फ्यूजन तयार करायचं आणि मग आपली इको सिस्टिम वापरून ते कन्फ्यूजन इको करायचं ही पद्धत अयोग्य आहे.' असं म्हणत फडणवीसांनी त्यावेळी देखील हा दावा खोडून काढला होता की, अजित पवार हे सत्तेतून बाहेर पडतील. 

मात्र, आता पुन्हा एकदा रोहित पवारांनी जे विधान केलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात या सगळ्याबाबत आत पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.