Mumbai Mahapalika Election 2026, मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीला काठावरचं बहुमत मिळालंय. सर्वात मोठा पक्ष ठरल्याने भाजप स्वाभाविकपणे त्यांचा महापौर बसावा, यासाठी प्रयत्न करणार आहे. मात्र, दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने अडीच वर्षे आम्हाला महापौरपद मिळावे, अशी मागणी देखील केली आहे. दरम्यान, या निवडणुकीत कडवी झुंज देणारे ठाकरे बंधू आणि काँग्रेस केवळ 15 जागांनी सत्तेपासून दूर राहिले आहेत. शिवाय, या निवडणुकीतील महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. ठाकरे बंधू आणि काँग्रेसला 30 ठिकाणी मतविभाजनाचा फटका बसल्याचं समोर आलंय. नेमकं काय घडलंय? सविस्तर जाणून घेऊयात..
ADVERTISEMENT
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्याचा मोठा फटका दोन्ही पक्षांना बसल्याचे चित्र निकालातून स्पष्ट झाले आहे. शहरातील जवळपास 30 प्रभागांमध्ये या दोन पक्षांमधील मतविभाजनाचा थेट फायदा भाजप आणि एकनाथ शिंदे गटाला झाल्याचे दिसून येत आहे. अनेक प्रभागांमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाची एकत्रित मते ही विजयी भाजप किंवा शिंदे गटाच्या उमेदवारांपेक्षा अधिक असतानाही, स्वतंत्र लढतीमुळे दोन्ही पक्षांना पराभव स्वीकारावा लागला.
काँग्रेस अन् ठाकरे गट स्वतंत्र लढल्याचा सत्ताधाऱ्यांना फायदा?
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र लढले होते. त्या वेळी मनसे ही महाविकास आघाडीचा भाग नव्हती. मात्र यंदाच्या महापालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली, तर काँग्रेसने स्वतंत्र मार्ग स्वीकारला. या राजकीय समीकरणांमुळे मुंबईतील मतदारांचा कल विभागला गेला आणि त्याचा फायदा सत्ताधारी गटांना झाला.
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या मते, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर शिवसेनेकडे वळली होती. मात्र त्याच प्रमाणात शिवसेनेची मते काँग्रेस उमेदवारांना मिळाली नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन काँग्रेसने सुरुवातीला ‘स्वबळावर निवडणूक’ लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करण्यात आली. मात्र या युतीचा फारसा सकारात्मक परिणाम निकालात दिसून आलेला नाही.
वंचित बहुजन आघाडीनेही निवडणूक निकालानंतर काँग्रेसवर थेट आरोप केले असून, युतीमुळे अपेक्षित लाभ न झाल्याची भूमिका घेतली आहे. एकूण निकालांचा अभ्यास केला असता, मुंबईतील 30 हून अधिक प्रभागांमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेसची एकत्रित मते ही भाजप किंवा शिंदे गटाच्या विजयी उमेदवारांपेक्षा अधिक असल्याचे आढळते.
याचे ठळक उदाहरण म्हणजे प्रभाग क्रमांक 1. येथे शिवसेना शिंदे गटाच्या रेखा यादव या 7,544 मते मिळवून विजयी झाल्या. मात्र याच प्रभागात काँग्रेसला 5,040 मते, तर शिवसेना ठाकरे गटाला 4,314 मते मिळाली. दोन्ही पक्षांची मते एकत्र केली असता ती विजयी उमेदवारांच्या मतांपेक्षा जास्त ठरतात.
अंधेरीतील प्रभाग क्रमांक 63 मध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. भाजपचे रुपेश सावरकर हे 9,193 मते मिळवून केवळ 583 मतांच्या फरकाने विजयी झाले. येथे ठाकरे गट आणि काँग्रेसची एकत्रित मते 12 हजारांहून अधिक आहेत. मात्र मतविभाजनामुळे दोन्ही पक्षांना पराभव पत्करावा लागला.
एकंदरीत, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील समन्वयाचा अभाव, स्वतंत्र लढतीचे धोरण आणि बदललेली राजकीय समीकरणे यामुळे मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये भाजप आणि शिंदे गटाला निर्णायक फायदा झाला आहे. भविष्यातील निवडणुकांसाठी ही बाब दोन्ही पक्षांसाठी गंभीर आत्मपरीक्षणाची गरज निर्माण करणारी ठरली आहे.
मुंबई महापालिका निवडणूक निकाल; कोणी किती जागा जिंकल्या?
भारतीय जनता पार्टी – 89
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – 65
शिवसेना (शिंदे गट) – 29
इंडियन नॅशनल काँग्रेस – 24
ऑल इंडिया मजलिस इत्तेहादूल मुस्लिमीन – 8
महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 6
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – 3
समाजवादी पार्टी – 2
नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) – 1
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











