Maharashtra State election commission press conference ,मुंबई : मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील तब्बल 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून आज (दि.15) महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता असून, त्याचबरोबर आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक प्रक्रियेच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यात आले असून, आयोगाकडून आज सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
राज्य निवडणूक आयोगाने मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात ही पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकांची अधिकृत घोषणा होईल, अशी अपेक्षा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर निर्णय होण्याच्या टप्प्यावर प्रक्रिया पोहोचली आहे.
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता 14 डिसेंबर रोजी झाली. त्यानंतर महापालिका तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या घोषणेला गती मिळेल, असे संकेत दिले जात होते. अधिवेशन संपल्यानंतर 15 डिसेंबरनंतर कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात होता. आता येत्या 24 तासांतच निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागू होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 29 महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याबाबत आयोगाकडून सकारात्मक विचार सुरू आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेसह इतर सर्व महापालिकांमध्ये एकाच वेळी मतदान होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे असून, सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.
कोणत्या महापालिकांच्या निवडणूका होणार?
1. अहिल्यानगर महानगरपालिका
2. अकोला महानगरपालिका
3. अमरावती महानगरपालिका
4. भिवंडी निजामपूर महानगरपालिका
5. बृहन्मुंबई महानगरपालिका
6. चंद्रपूर महानगरपालिका
7. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
8. धुळे महानगरपालिका
9. इचलकरंजी महानगरपालिका
10. जळगाव महानगरपालिका
11. जालना महानगरपालिका
12. कल्याण डोंबिवली महानगरपालिका
13. कोल्हापूर महानगरपालिका
14. लातूर महानगरपालिका
15. मालेगाव महानगरपालिका
16. मीरा भाईंदर महानगरपालिका
17. नागपूर महानगरपालिका
18. नांदेड वाघाळा महानगरपालिका
19. नाशिक महानगरपालिका
20. नवी मुंबई महानगरपालिका
21. पनवेल महानगरपालिका
22. परभणी महानगरपालिका
23. पिंपरी चिंचवड महानगरपालिका
24. पुणे महानगरपालिका
25. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका
26. सोलापूर महानगरपालिका
27. ठाणे महानगरपालिका
28. उल्हासनगर महानगरपालिका
29. वसई विरार महानगरपालिका
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने 29 महापालिका आणि सुमारे 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याबाबत प्राथमिक पातळीवर चाचपणी केल्याची माहिती समोर आली आहे. जर आज पत्रकार परिषदेत अधिकृत घोषणा झाली, तर राज्यातील राजकारणाला एकाच वेळी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय हालचालींना मोठा वेग येणार, हे मात्र निश्चित आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
राजगुरुनगर हादरलं, शिक्षक शिकवत असताना दहावीतील पुष्कराजचा गळा चिरला, खासगी क्लासमध्ये लहान मुलांचे गँगवॉर
ADVERTISEMENT











