Parth Pawar land scam case :उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि.8) माध्यमांसमोर येत अमेडिया कंपनी पुण्यातील कोरगाव पार्क येथील व्यवहार रद्द करत असल्याची माहिती दिली. बेकायदेशीर जमीन व्यवहार केला असल्याने पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर गुन्हा दाखल झाला आहे. असं असलं तरी पार्थ पवार यांच्यावर मात्र कारवाई करण्यात आलेली नाही. कारवाई झाली नसली तरी पार्थ पवारांना आता चांगलाच आर्थिक फटका बसणार आहे. झालेला व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवार यांना आत्ता 42 कोटी रुपये भरावेच लागणार आहेत. निबंधक कार्यालयाने हा व्यवहार रद्द करण्यासाठी ही अट घातली आहे. त्यामुळे पार्थ पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
पार्थ पवारांना निबंधक कार्यालयात 42 कोटी भरावे लागणार
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीनीचं प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलंच गाजतं आहे. पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या अमेडिया कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 40 एकरची जमीन 300 कोटी रुपयांना खरेदी केली होती. शीतल तेजवानी यांच्याकडून ही जमीन खरेदी करण्यात आली होती. प्रत्यक्षात ही जमीन शासनाच्या ताब्यात असल्याचं समोर आलं आहे. या सगळ्यामुळे खळबळ माजली होती. पार्थ पवार त्यांच्या कंपनीच्या मार्फत या ठिकाणी आयटी पार्क उभारणार होतं. त्यामुळे त्यांना मुंद्रांक शुल्कात सूट मिळालेली होती. केवळ 500 रुपये इतकंच मुद्रांक शुल्क या व्यवहारात भरण्यात आला होता. परंतु आता हा व्यवहार रद्द होत असल्याने तिथे आयटी पार्क होणार नाही. त्यामुळे पार्थ पवारांना मुद्रांक शुल्कात कुठलीही सूट मिळणार नसल्याचं सह दुय्यम निबंधक कार्यालयाने स्पष्ट केलं आहे. हा व्यवहार रद्द करायचा असेल तर पार्थ पवार यांच्या कंपनीला 42 कोटी रुपये भरावे लागणार आहेत.
मुंढव्यातील जागेवरुन वाद झाल्यानंतर पार्थ पवार यांच्या कंपनीने हा व्यवहार रद्द करत असल्याचं स्पष्ट केलं. त्यासाठी अमेडिया कंपनीचे अधिकारी सह दुय्यम निबंधक कार्यालयात गेले. त्यांनी लेखी स्वरुपात हा व्यवहार रद्द करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र सह दुय्यम निबंधक कार्यालयाने अमेडिया कंपनीला पत्र दिलं आहे. या पत्रानुसार अमेडिया कंपनीने या जमिनीचा व्यवहार करताना त्याजागी आयटी पार्क होणार असल्याचं सांगितलं होतं. त्या माध्यमातून त्यांनी मुद्रांक शुल्कात सूट मिळवली होती. आता व्यवहार रद्द झाल्याने तिथे आयटी पार्क होणार नाही. त्यामुळे ज्या कारणासाठी तुम्हाला सवलत मिळाली होती, ते कारण निरस्त झालेलं आहे. त्यामुळे पुन्हा तुम्हाला ती सवलत देता येणार नाही. व्यवहार रद्द होणं म्हणजे नव्याने होणं, म्हणजेच अमेडिया कंपनीने ही जमीन पुन्हा शीतल तेजवानी यांच्याकडे सोपवावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला 42 कोटी रुपये भरावे लागतील असं त्यात स्पष्ट करण्यात आलं आहे.
आता हे 21 कोटी रुपये कसे आले हे सुद्धा समजावून घ्यावं लागेल. हा सगळा जमिनीचा व्यवहार 300 कोटींना झाला. त्यावर 5 टक्के मुद्रांक शुल्क आकारलं जाणार. त्याचबरोबर एक टक्का स्थानिक संस्था कर आणि एक टक्का मेट्रोचा कर असा सात टक्के कर. या सगळ्याचे होतात 21 कोटी रुपये. आधी या मुद्रांक शुल्काला सूट देण्यात आली होती. मात्र आता हा व्यवहार रद्द होत असल्याने आधीचे 21 कोटी पार्थ पवार यांच्या कंपनीला भरावे लागणार आहेत. त्याचबरोबर व्यवहार रद्द होत आहे याचा अर्थ नव्याने होत असल्याने त्याचे 21 कोटी असे 42 कोटी रुपये पार्थ पवार यांच्या कंपनीला भरावे लागणार आहेत.
याबरोबरच साधारण साडेतीन लाखाचा अधिकचा दंड देखील पार्थ यांच्या कंपनीला भरावा लागणार आहे. पार्थ यांची कंपनी आयटी पार्क उभारणार असल्याने त्यांना मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलं होतं. परंतु एक टक्के स्थानिक संस्था कर आणि एक टक्का मेट्रो कर हा भरावाच लागणार होता. हा कर देखील पार्थ यांच्या कंपनीने भरला नव्हता. त्यामुळे 1 टक्का त्यांना यावर दंड देखील भरावा लागणार आहे. त्यामुळे एकीकडे पार्थ यांच्या कंपनीच्या हातातून जमीन गेलीच मात्र अधिकचा 42 कोटींचा दंड भरावा लागणार तो वेगळाच. दरम्यान या प्रकरणात पार्थ पवार यांचे पार्टनर दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर सरकारी अधिकाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची अधिकची चौकशी आता करण्यात येत आहे. या चौकशीतून काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











