Raj Thackeray facebook post : दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा पुन्हा शिवाजीराजे भोसले हा सिनेमा 31 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. हा सिनेमा शिवाजी राजे भोसले बोलतोयचा दुसरा भाग आहे. दरम्यान, हा सिनेमा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाहिला असून त्यावर त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सविस्तर भाष्य केलं आहे. राज ठाकरे यांनी हा सिनेमा पाहिल्यानंतर सध्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केलंय.
ADVERTISEMENT
राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी
मी २ दिवसांपूर्वी, माझे मित्र आणि एक उत्तम दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा, 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट पाहिला... समकालीन सिनेमा हा शब्द सहज वापरला जातो पण तो अनेकदा असतोच असं नाही... पण खरा समकालीन, किंवा आत्ताच्या परिस्थितीवरचा चित्रपट बघायचा असेल तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाला पर्याय नाही...
आज फक्त मोठे मोठे महामार्ग, पूल (ज्यावर काही महिन्यात खड्डे पडतात ) आणि चमकदार घोषणा म्हणजे 'विकास' अशी कल्पना सत्ताधाऱ्यांनी रुजवली आहे. यांत बाकी कोणाचा विकास होतो की नाही माहित नाही पण सत्ताधाऱ्यांचा विकास नक्की होतो. हे केलं आणि धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की मग शेतकरी असो की इथला मराठी माणूस यांना हवं तसं वापरून फेकून द्यायला हे मोकळे.
हेही वाचा : हडपसरमध्ये शाळकरी मुलीवर 23 वर्षीय तरुणाकडून अत्याचार, POCSO अंतर्गत गुन्हा दाखल
या राज्यातील शेतकरी तर पार हतबल आहे. एका बाजूला पाऊस झोडपतो आणि दुसऱ्या बाजूला सरकारी यंत्रणा अनास्थेने झोडपते.. याच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं, त्याच महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करतो हे भीषण दुर्दैव आहे. एका बाजूला ग्रामीण भागात शेतकऱ्याला इतकं जेरीस आणायचं की त्याला जमीन विकावीच लागेल आणि दुसरीकडे शहरात मराठी माणसांनाच घरं नाकारायची, त्यांच्या भाषेचा अपमान करणाऱ्यांना अभय द्यायचं, त्यांनी काय खायचं ? काय नाही खायचं यावर बंधन आणणऱ्यांचे लाड करायचे हे सुरु आहे.
हे सगळं मराठी माणसाला दिसत नाहीये का ? दिसत असेल ही... पण जोपर्यंत तुमच्या मनात याविरोधात चीड निर्माण होणार नाही, आग निर्माण होणार नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलणं सोडा अजून भीषण होईल. या सिनेमातून ही चीड महेश मांजरेकर, त्यांचे कलाकार आणि त्यांचे लेखक यांनी उत्तम मांडली आहे. हा फक्त चित्रपट नाही तर या टीमच्या मनातील अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता महाराष्ट्रातील जनतेने अनुभवयाला हवी. त्यासाठी माझं तुम्हाला आवाहन आहे की 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' हा चित्रपट जरूर पहा...
इतर महत्त्वाच्या बातम्या
नितेश राणेंची कट्टर विरोधक असलेल्या संजय राऊतांसाठी काळजी करणारी पोस्ट, 6 शब्दात काय म्हणाले?
ADVERTISEMENT











