ADVERTISEMENT
Ramdas Athawale on Mumbai Mahapalika election ,नवी मुंबई : मुंबई शहरातील मतदाररचनेचा दाखला देत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकांबाबत मोठं भाकीत केलं आहे. मुंबईत सुमारे 60 टक्के परप्रांतीय तर 40 टक्के मराठी मतदार असल्यामुळे ठाकरे बंधूंना मुंबईत अपेक्षित यश मिळणार नाही, असा दावा आठवले यांनी केला. पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत ते बोलत होते.
मुंबईत 60 टक्के परप्रांतीय मतदार आहेत, 40 टक्के मराठी मतदार - आठवले
रामदास आठवले म्हणाले, उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळे महाविकास आघाडीत फुट पडलीये. काँग्रेस पक्ष वेगळा झालेला आहे. त्यांची ताकद पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये महायुतीसोबत राहायला पाहिजे होतं. काँग्रेसकडे गेले, अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद मिळालं. पण धनुष्यबाण त्यांच्या हातून गेलेला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची प्रतारणा करुन त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठित खंजीर खुपसला होता. त्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचा फायदा होणार नाही. कारण मुंबईत 60 टक्के परप्रांतीय मतदार आहेत, 40 टक्के मराठी मतदार आहेत. राज ठाकरेंना सोबत घेतल्याने त्यांचं मोठं नुकसान होणार आहे.
रामदास आठवले पुढे बोलताना म्हणाले की, पनवेल महानगरपालिकेची निवडणूक ही आमच्यासाठी फार अवघड निवडणूक नाही. प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी येथे मजबूत पक्ष आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसोबत आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकणे आम्हाला अजिबात अडचणीचे वाटत नाही. कारण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पनवेलचा मोठा विकास झालेला आहे. पनवेलला विकसित करण्यासाठी आम्ही भरपूर निधी देणार आहोत.
राज्यभरातील महानगरपालिका निवडणुकांबाबत बोलताना आठवले यांनी महायुतीच्या विजयाचं गणित मांडलं. “महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीला 90 टक्क्यांपेक्षा अधिक यश मिळेल,” असा ठाम दावा त्यांनी केला. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची महायुती मजबूत असून, विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्या पाठीशी उभी राहील, असं आठवले म्हणाले.
बाहेरून काही वाद दिसत असले तरी आम्ही आतून एक आहोत - रामदास आठवले
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. “बाहेरून काही वाद दिसत असले तरी आम्ही आतून एक आहोत. निवडणुकीच्या वेळी सर्वजण एकत्र येऊ. महायुतीत कोणताही गोंधळ नाही,” असं आठवले यांनी स्पष्ट केलं. नवी मुंबईतही महायुतीचं नेतृत्व विकासकामांच्या जोरावर जनतेचा विश्वास जिंकेल, असा दावा त्यांनी केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











