मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या आहेत. 9 निवृत्त सदस्यांच्या जागेवर आणि 1 पोटनिवडणूक. हे 10 आमदार विधानसभेतल्या आमदारांकडून निवडून जाणार असल्याने पक्षीय बलाबल महत्वाचं ठरतं. विधान परिषदेच्या या निवडणुका कशा होणार आहेत? त्याचा कोटा कसा ठरतो? हेच आपण समजून घेऊया.
ADVERTISEMENT
देशात 6 राज्यांमध्येच विधानपरिषद आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. राज्याच्या निर्मितीपासून जरी विधान परिषद नसली तरी ती नव्याने आणता येते, आणि एखाद्या राज्यात असलेली विधान परिषद ही नष्टही करता येते. पंजाब, पश्चिम बंगाल, तामिळनाडूने तसं केलं आहे. जम्मू आणि काश्मिरमध्ये या राज्याचीही आधी विधान परिषद होती, मात्र केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळे ती नष्ट झाली.
विधान परिषदेची जास्तीत जास्त सदस्य संख्या ही त्या राज्याच्या विधानसभेच्या सदस्य संस्थेपेक्षा एक तृतीयांश असू शकते. आणि किमान सदस्यसंख्या ही 40 असते.
विधान परिषदेचे आमदार कुठून निवडून येतात?
विधान परिषदेच्या आमदाराचा कार्यकाळ हा 6 वर्षे असतो. दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होत असतात आणि त्यांच्या जागी नव्या आमदारासाठी निवडणूक होते. मात्र विधानसभेचे सरसकट सर्व आमदार हे जनतेमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी असतात तसं विधान परिषदेत नसतं.
विधान परिषदेतील सदस्य हे समाजातील वेगवेगळ्या भागातून निवडून येतात ज्याचे 4 प्रकार आहेत. विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षक-पदवीधर आणि राज्यपाल नियुक्त. महाराष्ट्रात विधान परिषदेचे एकूण 78 सदस्य आहेत, ज्यात विधानसभेच्या आमदारांमधून विधान परिषदेवर 30 आमदार निवडून दिले जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून 22 आमदार, शिक्षक-पदवीधर मतदारसंघातून 14 आणि राज्यपालांकडून नियुक्त 12 आमदार विधान परिषदेवर जातात.
हे ही वाचा>> समजून घ्या: डिलिमिटेशन म्हणजे काय? 'या' राज्यांना नेमकी भीती तरी कसली?
सध्या निवृत्त होणाऱ्या 9 सदस्यांमध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीमधून शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, भाजपमधून गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रणजितसिंह मोहिते-पाटील, रमेश कराड आणि काँग्रेसचे राजेश राठोड यांचा कार्यकाळ संपला आहे.
या पलिकडे प्रज्ञा सातव यांच्या काँग्रेसमधून भाजप प्रवेश झाल्याने त्यांच्या जागेची पोटनिवडणूक होणार आहे.
आता या निवडणुकीसाठी कोटा असतो, कारण विधानसभेतल्या आमदारांमधून विधान परिषदेवर निवडून जाणारे हे आमदार आहेत. त्यासाठी एक गणित असतं. फॉर्म्युला पहिले बघा.
हे ही वाचा>> समजून घ्या: निवडणूक आयोगाचा थेट पहारा! ऐन निवडणुकीत कोणते नवे नियम?
विधानसभेच्या आमदारांची संख्या गुणिले 100 भागिले निवडणूक लागलेल्या जागा आणि अधिक 1 असं मिळून जो आकडा येतो तो म्हणजे कोटा.
आकड्यांनुसार समजून घेऊ...
विधानसभेतल्या आमदारांची संख्या सध्या 288 गुणिले 100 भागिले निवडणूक लागलेल्या 9 जागा आणि अधिक 1 असं मिळून कोटा 29 वर जात आहे.
त्यानुसार आता महाविकासआघाडीकडे संख्याबळ 49 आहे, त्यामुळे त्यांचा एकच उमेदवार विधानपरिषदेवर जाईल, ज्यामध्ये मतं एकगठ्ठा पडण्यासाठी आणि शक्यतो निवडणूक बिनविरोध पाडण्यासाठी उद्धव ठाकरे यांचंच नाव निश्चित होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे महायुतीचं संख्याबळ 234 इतकं आहे पोटनिवडणुकीत युतीचेच उमेदवार जिंकले तर 236 वर जाईल संख्याबळ अशात त्यांचे सहज 8 उमेदवार विधानपरिषदेवर जाईल. मात्र ठाकरेंच्याऐवजी मविआने दुसराच उमेदवार दिला तर महायुतीही नववा उमेदवार उतरवेल ह्याची दाट शक्यता आहे.
ADVERTISEMENT











