Sanjay Raut press conference : शिवसेना पक्षाच्या बैठकीला बंडखोर सहा खासदार अनुपस्थित राहिल्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना राऊत यांनी बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. हे खासदार सध्या नेमके कुठे आहेत, त्यांचा ठावठिकाणा काय आहे, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे त्यांनी म्हटले. काही जण पक्षाच्या बैठकीला आले नाहीत, मात्र ते दुसऱ्या गटासोबतही दिसत नाहीत, असे सांगत त्यांनी या संपूर्ण घडामोडींवर संशय व्यक्त केला. संबंधित खासदार जिल्ह्यात नसल्याची माहिती असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Personal Finance: रिडेव्हलपमेंटमध्ये ‘हे’ असतात घरमालकांचे हक्क, अजिबात घेऊ नका माघार..
'रस्त्यावर उतरून लढणारे कार्यकर्ते हेच पक्षाची खरी ताकद'
या प्रकरणाबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सातत्याने संपर्क सुरू असल्याचे सांगताना राऊत यांनी पक्षाची संपूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत असल्याचे स्पष्ट केले. पक्षातील सर्व कार्यकर्ते आणि नेते एकत्र असल्याचा दावा त्यांनी केला. काही खासदार गैरहजर राहिल्याने पक्ष कमकुवत होत नाही, असे सांगताना त्यांनी पक्ष म्हणजे केवळ चार-पाच खासदार नसून त्यांना निवडून देणारे कार्यकर्ते आणि जनतेचा पाठिंबा महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित केले. रस्त्यावर उतरून लढणारे कार्यकर्ते हेच पक्षाची खरी ताकद असल्याचेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा : ठाकरेंनी उमेदवारी दिल्यास 2029 ची लोकसभा लढणार आहात का? कैलास पाटील म्हणाले...
"खासदारांना मोठ्या सुरक्षेत मतदारसंघात जावे लागेल"
फुटीर खासदारांबाबत बोलताना संजय राऊत यांनी अत्यंत कठोर शब्दांत इशारा दिला. संबंधित खासदारांना त्यांच्या मतदारसंघात जाऊन दाखवावे लागेल, असे आव्हान देत त्यांनी तेथे जाणे त्यांच्यासाठी सोपे राहणार नसल्याचे म्हटले. "त्यांच्या घरात राहणेसुद्धा त्यांना कठीण होईल," असे वक्तव्य करत त्यांनी नाराजी व्यक्त केली. हा इशारा आपण अधिकृतपणे देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच हे खासदार मतदारसंघात गेले तर त्यांना मोठ्या सुरक्षेसह जावे लागेल, असेही ते म्हणाले. या संपूर्ण प्रकरणात पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची राहील, असे संकेतही त्यांनी दिले.
यावेळी राऊत यांनी न्यायव्यवस्था आणि निवडणूक आयोगावरही टीका केली. गेली चार वर्षे काही निर्णय प्रलंबित राहिल्यामुळेच आजची परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला. संबंधित प्रकरणात वेळेत निर्णय झाला असता तर ही वेळ आली नसती, असे ते म्हणाले. रविवारी सर्व खासदार एकत्र होते, काहींनी व्हर्च्युअल माध्यमातूनही सहभाग घेतला होता, मात्र अवघ्या दोन दिवसांत परिस्थिती बदलल्याचे त्यांनी नमूद केले. काय घडले याची माहिती संबंधित खासदारांनाच असेल, असे सांगताना त्यांना शोधण्यामध्ये पक्षाला कोणताही रस नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. हे सर्वजण प्रौढ आणि अनुभवी लोकप्रतिनिधी असल्याचे नमूद करत, यावेळी घेतलेल्या भूमिकेची त्यांना मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
ADVERTISEMENT











