Kailas patil on lok sabha election 2029 : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेबाबत निर्माण झालेल्या राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नसल्याचे सांगितले. त्याचवेळी आपण आणि आमदार प्रवीण स्वामी हे दोघेही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबतच राहणार असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. पक्षात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत अद्यापही संदिग्धता असल्याचे सांगताना, ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेल्या निर्णयामागील कारणे ते स्वतःच स्पष्ट करू शकतील, असेही कैलास पाटील यांनी म्हटले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Monsoon Update: मान्सून रेकॉर्ड ब्रेक करणार? पावसासाठी 'ही' नवी तारीख पण...
2029 ची लोकसभा लढणार का? कैलास पाटील म्हणाले...
मुलाखतीदरम्यान ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य भूमिकेचा आणि त्यातून धाराशिवमधील भविष्यातील राजकीय समीकरणांचा विषय उपस्थित झाला. जर भविष्यात पक्षाला धाराशिव लोकसभा मतदारसंघात नवीन उमेदवाराची गरज भासली, तर आपण निवडणूक लढवण्यास तयार आहात का, असा प्रश्न कैलास पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट होकार किंवा नकार न देता, लोकसभा निवडणुकीला अजून तीन वर्षांचा कालावधी असल्याचे सांगितले. त्या वेळी निर्माण होणारी राजकीय परिस्थिती, महाविकास आघाडीची भूमिका आणि पक्षाचा निर्णय यानुसारच पुढील भूमिका निश्चित केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : ठाकरेंचे 6 खासदार फुटले पण ट्रोलर्सने सोशल मीडियावर ओमराजेंचाच बाजार का उठवला? विषय लईच गंभीर!
जिल्हा नेहमीच ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ राहिल्याचा दावा
कैलास पाटील म्हणाले की, पक्ष जे सांगेल तो निर्णय आपण प्रामाणिकपणे स्वीकारू. उमेदवारीबाबत अंतिम निर्णय हा पक्ष नेतृत्वाचाच असेल आणि त्यानुसार काम केले जाईल. त्यामुळे 2029 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपण स्वतः इच्छुक आहात की नाही, याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली नसली तरी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला पूर्ण प्राधान्य दिले जाईल, हे त्यांनी अधोरेखित केले. याचवेळी त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिक आणि जनतेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचेही सांगितले. हा जिल्हा नेहमीच ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ राहिल्याचा दावा करत, भविष्यातील कोणत्याही आव्हानांचा सामना करण्याची तयारी असल्याचे त्यांनी व्यक्त केले.
राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर बोलताना कैलास पाटील यांनी सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षातील नेते आणि लोकप्रतिनिधींना आपल्या गोटात आणण्यावर भर देण्याऐवजी सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले. शेतकरी, बेरोजगारी, पावसाची परिस्थिती, खत आणि बियाण्यांची उपलब्धता यांसारखे प्रश्न अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, विरोधी पक्षात राहूनही लोकांचे प्रश्न मांडण्याचे काम सुरूच राहील, असे सांगत त्यांनी आपल्या राजकीय भूमिकेची पुनरुच्चार केला. दरम्यान, 2029 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने आदेश दिल्यास आपण त्या निर्णयाचे पालन करू, या वक्तव्यामुळे भविष्यातील राजकीय शक्यतांबाबत चर्चा रंगू लागली आहे.
ADVERTISEMENT











