Inside Story: ठाकरेंचे खास ओमराजे निंबाळकर कसे आणि का गेले?, चारच गोष्टी!

उद्धव ठाकरे यांच्या अतिशय विश्वासातले समजले जाणारे खासदार ओमराजे निंबाळकर हे त्यांची साथ सोडून शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश करत असल्याचं आता जवळजवळ निश्चित झालं आहे. जाणून घ्या याच सगळ्या घटनेची इनसाइड स्टोरी.

inside story operation tiger how and why did mp omraje nimbalkar a close confidant of uddhav thackeray part ways with him four key points

फाइल फोटो

निलेश झालटे

• 07:51 PM • 17 Jun 2026

follow google news

मुंबई: ठाकरेच्या शिवसेनेचे काही खासदार शिवसेनेत गेले आहेत. अर्थात यावर अजून अधिकृतपणे शिक्कामोर्तब झालं नसलं तरी शिवसेनेचं म्हणजे एकनाथ शिंदेंचं 'ऑपरेशन टायगर' यशस्वी ठरलंय. यातलं सर्वाधिक शॉकिंग नाव आहे ते ओमराजे निंबाळकरांचं. सर्वात जास्त भावनिक लाटेवर निवडणूक झाली ती धाराशिव लोकसभा मतदारसंघातली. ओमराजेंना लोकांनी फक्त भाषणं ऐकूण आणि इमोशनली भरभरून मतं दिली अगदी विक्रमी. सगळी ताकद विरोधात एकवटली असतानाही ओमराजेंना चार लाखांहून अधिक मतांनी जिंकून दिलं. आता काही गोष्टी विरोधात असताना मिळत नसतातच आणि हे राजकारणात चालतं. मात्र ओमराजेंचा प्रेझेन्स ही गोष्ट कमालीची होती, आहे.  त्यांनी कामं केली नसती तरीही त्यांचा रीच, कनेक्ट आणि इमोशन या बळावर ते 2029 ला सहज निवडून आलेच असते, असंही बोललं जातंय.  
 
मात्र, ओमराजेंचं पक्ष सोडून जाणं हा कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे शिवाय ठाकरेंसाठीही. आता ओमराजे कसे गेले आणि का गेले हे तर आपल्याला जाणून घ्यायचं आहेच. मात्र ओमराजेंभोवतीची थोडी चर्चा व्यवस्थित समजून घेऊयात.

हे वाचलं का?

ओमराजेंनी ठाकरेंची साथ सोडण्याची Inside Story

खासदार ओमराजे निंबाळकर दिल्लीत दाखल झाले असल्याची माहिती आहे. अर्थात ते कुठे आहेत याचे अनेक अंदाज बांधले जात आहेत. सूत्रांच्या मते, मंगळवारी रात्री 1 वाजता एका खाजगी विमानाने त्यांनी पुण्यातून दिल्लीसाठी उड्डाण केलं. ओमराजे निंबाळकरांना दिल्लीला नेण्यासाठी पुणे विमानतळावर विशेष व्यवस्था करण्यात आली होती. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाने 2 खाजगी विमानं पुणे विमानतळावर सज्ज ठेवण्यात आली होती. ओमराजे निंबाळकर यांच्या दिल्ली दौऱ्याचा प्लॅन अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता आणि  दिवसभरात या विमानांच्या उड्डाणाच्या वेळेत तब्बल तीन ते चार वेळा बदल करण्यात आला असल्याची देखील माहिती आहे.

हे ही वाचा>> 'वडिलांच्या हत्या प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने हवा असेल तर...', ओमराजे निंबाळकरांबाबत राऊतांनी उडवून दिली खळबळ

या विशेष विमानाने केवळ ओमराजे निंबाळकरच गेले नाहीत, तर त्यांच्यासोबत माजी मंत्री तानाजी सावंत तसेच जय राजे निंबाळकर हे देखील दिल्लीला गेल्याची माहिती आहे. याशिवाय एक मंत्री देखील सोबत असल्याची माहिती आहे. आता मुंबई Tak नं ज्यावेळी ओमराजेंशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते पुण्यातच आहेत असं एकदा कळलं, नंतर दिल्लीहून पुण्याला आले असंही कळलं. 

सुषमा अंधारेंनी याबाबत महत्त्वाची माहिती दिलीय. 'ओमराजेंना मी सकाळी फोन केला, पण माझा फोन त्यांनी उचलला नाही. ओमराजे तानाजी सावंतांसोबत दिल्लीला गेले. मग मी त्यांच्या पाठीशी भावासारखे, सावलीप्रमाणे सोबत असणाऱ्या आमदार कैलासदादा पाटील यांना फोन केला. ते म्हणाले, ताई मी दुसऱ्यांची गॅरंटी कशी देऊ, मी माझी गॅरंटी देऊ शकतो. त्यामुळे कैलास पाटलांच्या बोलण्यातील संधिग्धता बरीचशी बोलकी आहे.' असंही सुषमा अंधारेंनी म्हटलं. असो.. ते दिल्लीला गेले की नाही हे एवढं महत्त्वाचं नाही, मात्र ते ठाकरेंची साथ सोडत आहेत हा महत्त्वाचा मुद्दा आहे. नेटवर्क 18 मराठीशी बोलताना ओमराजेंनी आपण 20 तारखेनंतर भूमिका स्पष्ट करु असं म्हटलं. मात्र, ठाकरेंसोबतच राहणार असं ठामपणे सांगितलेलं नाही. आता याचे अर्थ आपण समजून जायचे.

हे ही वाचा>> ओमराजे फुटले, पण आता कैलास पाटलांचा मोठा निर्णय, काय म्हणाले?

संजय राऊतांनी ओमराजेंशी संबंधित एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवलं आहे. 'ओमराजेंवर दबाव असा आहे की, तुमच्या बाजूने निकाल हवा असेल तर आमच्यासोबत या. हवा तसा निकाल देतो. दोन खून आहेत. पवनराजे आणि त्यांच्या ड्रायव्हरचा. 20 वर्षानंतर काल (16 जून) निर्णय होणार होता. ओमराजेंना सांगितलं गेलं, एका व्यक्तीच्या माध्यमातून, जो नेता आज दिल्लीत आला आहे. तुमच्या बाजूने निर्णय हवा असेल तर सही करा. आमच्यासोबत या... अशा प्रकारे या देशाचा कायदा चालत असेल तर काय संविधान, काय कायदा, काय हायकोर्ट तुम्हीच सांगा. त्यामुळेच दोन दिवसासाठी हा निकाल राखून ठेवला', असा  गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 

आता काही दिवसांपासून ओमराजे निंबाळकर पुण्यात असल्याची माहिती होती आणि त्यांनी कॅमेऱ्यापासून अंतर ठेवले होते. निकालासाठी मंगळवारी ते मुंबई आले, मात्र तिथून ते पुन्हा पुण्याला गेले. तिकडे ओमराजे निंबाळकर यांच्या धाराशिव मधील गोवर्धनवाडी येथील घरी शुकशुकाट दिसून येत आहे.  

ओमराजे निंबाळकर यांच्या सोशल मीडिया पोस्टवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आम्ही तुमच्याकडून ही अपेक्षा करु शकत नाही, उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहा असे काहींनी म्हटले. तर, आधी खासदारकीचा राजीनामा द्या मग निवडून येऊन दाखवा असे आव्हानही नेटकऱ्यांनी दिले.
 
उद्धव ठाकरेंचे जवळचे समजले जाणारे ओमराजे निंबाळकर यांचेही नाव 'ऑपरेशन टायगर'च्या यादीत असल्याची माहिती आहे. त्यांच्या भावाच्या संबंधित बँकेचे प्रकरण मिटवण्याचं आणि त्यांच्याशी संबंधित काही कंपन्यांचं काम सुरळीत करण्याचा शब्द त्यांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे. याशिवाय मतदारसंघात कामं होत नसल्याबाबतही सातत्यानं ओमराजेंवर टीकेचा सूर आहे. याचं कारण अर्थातच निधी न मिळणे हेच आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी देखील ओमराजेंनी पक्ष सोडण्याच्या विचारात असावेत असंही बोललं जात आहे.

अजून तरी ऑफिशियली कन्फर्म नसलं तरी ओमराजेंचं जाणं हे धाराशिवसह राज्यातल्या निष्ठावंतांसाठी इमोशनली फार मोठा धक्का असेल. पण राजकारणात इमोशन्सची किंमत शून्य झालीय हे कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवंय. राजकारणात सर्वाइव्हलसाठी प्रॅक्टिकल पॉलिटिक्स ही काळाची गरज बनलीय. त्यासाठी यापुढेही असे अनेक धक्के बसू शकतात. त्यामुळं कार्यकर्त्यांनीही प्रॅक्टिकल होणं गरजेचं बनलं आहे.