नवी दिल्ली: बरोबर एक वर्षापूर्वी इंदिरा गांधींचा आणि आता पंडीत जवाहरलाल नेहरूंचा रेकॉर्ड पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडला. मोदींसाठी हे रेकॉर्ड मोडणं कशा अर्थाने महत्वाचं आहे, नेहरू आणि गांधींचा किती दिवसांचा रेकॉर्ड होता आणि तो खरंच मोदींनी मोडला असं म्हणता येईल का? हेच आपण समजून घेऊया.
ADVERTISEMENT
पं. नेहरूंचा पंतप्रधान पदावर राहण्याचा रेकॉर्ड PM मोदींनी कसा मोडला?
भारताचे पहिले पंतप्रधान झाले पंडीत जवाहरलाल नेहरू. 1947 ला देश स्वतंत्र झाला तेव्हाच नेहरू भारताचे पंतप्रधान झाले. 1947 पासून ते मृत्यूपर्यंत म्हणजेच 1964 पर्यंत नेहरू भारताचे पंतप्रधान राहिले, म्हणजेच एकूण आणि सलग 17 वर्ष नेहरू पंतप्रधान होते, पण विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले असले तरी अजून त्यांचा 17 वर्षांचा कार्यकाळ झालेला नाही. मोदींचा कार्यकाळ हा सद्या 12 वर्षांचा आहे, 2014 ते 2026. त्यामुळे या अर्थाने बघायला गेलं तर मोदींनी अजून नेहरूंचा रेकॉर्ड मोडलेला नाही. आणि ही माहिती सरकारी वेबसाईट प्रधानमंत्री संग्रहालयावरूनच तुम्हाला सांगतो आहोत, मनातलं नाही!
असो, पण हे वास्तव असूनही का भाजपकडून मोदींनी नेहरूंचा रेकॉर्ड मोडल्याचं सांगितलं जात आहे, तर त्याचं कारण नेहरू जेव्हा 1947 मध्ये पंतप्रधान झाले तेव्हा ते जनतेतून निवडून आलेले नव्हते. पारतंत्र्यातून स्वतंत्र झालेल्या भारताची तेव्हा कोणतीही राज्यघटना नव्हती, निवडणुका कशा होणार, पंतप्रधान कसे निवडले जाणार ह्याची कोणतीही रूपरेषा नव्हती, आपली घटना तयार झाली 1950 मध्ये आणि त्यानंतर नेहरू खऱ्या अर्थाने 1952 मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये लोकांमधून निवडून आले, पुढे पंतप्रधान झाले. यानुसार नेहरू आणि मोदींच्या कार्यकाळाची तुलना करायची झाली तर
- पंडीत जवाहरलाल नेहरू- 13 मे, 1952 ते 27 मे, 1964 = म्हणजे 4,398 दिवस
- नरेंद्र मोदी- 26 मे, 2014 ते 10 जून, 2026 = म्हणजे 4,399 दिवस.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेहरूंप्रमाणेच इंदिरा गांधींचाही सलग जास्त काळ पंतप्रधानपद भूषवण्याचा विक्रम 2025 मध्ये मोडून काढला आहे.
हे ही वाचा>> समजून घ्याः INDIA आघाडीचे नेते भेटले, पण हातातून 51 खासदार निसटले?
- इंदिरा गांधी- 24 जानेवारी, 1966 ते 24 मार्च, 1977 = म्हणजे 4,077 दिवस
- नरेंद्र मोदी- 26 मे, 2014 ते 25 जुलै, 2025 = म्हणजे 4,078 दिवस
नेहरू आणि गांधी यांच्यावर इतक्या मोठ्या कार्यकाळानंतरही 14 पंतप्रधान झाले, मात्र ठराविकच नरसिंह राव, राजीव गांधी, वाजपेयी, मनमोहन सिंह सारख्या पंतप्रधानांना 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला, त्यापलिकडे सलग तर सोडाच पण 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पंतप्रधानही भारताला मधल्या काळात लाभले नाहीत. भारताचे पहिले पंतप्रधान नेहरूंच्या निधनानंतर...
- गुलझारीलाल नंदा - 27 मे 1964 ते 9 जून 1964
- लालबहादुर शास्त्री- 9 जून 1964 ते 11 जानेवारी 1966
- गुलझारीलाल नंदा- 11 जानेवारी 1966 ते 24 जानेवारी 1966
- इंदिरा गांधी- जानेवारी 1966 ते मार्च 1977
- मोरारजी देसाई- मार्च 1977 ते जुलै 1979
- चौधरी चरण सिंह- जुलै 1979 ते जानेवारी 1980
- इंदिरा गांधी- जानेवारी 1980 ते ऑक्टोबर 1984
- राजीव गांधी- ऑक्टोबर 1884 ते डिसेंबर 1989
- व्हीपी सिंह- डिसेंबर 1989 ते नोव्हेंबर 1990
- चंद्रशेखर- नोव्हेंबर 1990 ते जून 1991
- नरसिंह राव- जून 1991 ते मे 1996
- अटलबिहारी वाजपेयी- मे 1996 ते जून 1996
- एच.डी.देवेगौडा- जून 1996 ते एप्रिल 1997
- इंदरकुमार गुजराल- एप्रिल 1997 ते मार्च 1998
- अटलबिहारी वाजपेयी- मार्च 1998 ते एप्रिल 1999
- अटलबिहारी वाजपेयी- ऑक्टोबर 1999 ते मे 2004
- मनमोहन सिंह- मे 2004 ते मे 2014
- नरेंद्र मोदी- मे 2014 पासून.. आजपर्यंत
केवळ कार्यकाळाचा रेकॉर्ड पूर्ण करण्याइतपतंच मोदींच्या कारकिर्दीचा आढावा मर्यादित असू शकत नाही. 12 वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात नोटाबंदी, 370 कलम रद्द, तिहेरी तलाक रद्द, अयोध्येत राम मंदिर, विशिष्ट भाजपशासित राज्यात समान नागरी कायदा, सर्जिकल-एअरस्ट्राईक, जातनिहाय जनगणना आणि अनेक विकासकामांचं श्रेय मोदी सरकारला जातं. मात्र त्याचवेळी फसलेली नोटाबंदी, विरोधकांची नाकाबंदी, पक्ष फोडाफोडी, यंत्रणांचा गैरवापर, स्वायत्त संस्थांवर ताबा असे काही डागही मोदी सरकारवर लागले आहेत जे विरोधकांचे आरोप आहेत.
हे ही वाचा>> समजून घ्याः एक-दोन नाही.. 40 खासदार कसे लागतायत भाजपच्या गळाला?
सलग तीन वेळा सत्तेत आल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपला एक पक्ष विस्तारासाठीही कमालीचा फायदा करून दिला. मोदींआधी केवळ अटलबिहारी वाजपेयी हे भाजपचे नेते पंतप्रधान झाले, मात्र त्यांच्या कार्यकाळात भाजपचा पक्ष विस्तार एवढा झाला नाही जेवढा मोदींच्या कार्यकाळात झाला. मे 2014 ला भारतामधील केवळ 8 राज्यांवर भाजपची सत्ता होती ती आज 18 वर पोहोचलेली आहे. एवढंच नाही तर बंगाल, बिहारसारख्या राज्यांमध्ये पहिल्यांदाच भाजपचे मुख्यमंत्री झाले.
भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीवर्षपूर्ती वर्षातच मोदींनी नेहरूंचा रेकॉर्ड मोडणं, भाजपचे भारतभर हातपाय पसरवणं परिणामी त्यांच्या मनातील हिंदू राष्ट्राची निर्मिती करणं ही स्वप्न दृष्टीक्षेपात दिसतायेत.
ADVERTISEMENT











