Aaditya Thackeray : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे केवळ राज्याचं नाहीतर देशाचं लक्ष लागलं आहे. याचपार्श्वभूमीवर आता ठाकरे बंधु एकत्र आल्याचं चित्र आहे. अशातच आज 11 जानेवारी रोजी रात्री मुंबईच्या दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंनी एकत्र सभा गाजवली. या सभेला संबोधित करताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल चढवत विकासाचा पाढा वाचला. आदित्य ठाकरे यांनी बोलताना दिल्ली आणि मुंबईचा उल्लेख केला. ते म्हणाले की, 'जर दिल्लीसमोर मुंबईला ताठ मानेनं उभं ठेवायचं असेल, तर कोणाला मतदान करणार? असा तिखट सवाल त्यांनी उपस्थितांना करत सभा गाजवली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अन्नामलाईंनी मुंबई शहरावर केलेल्या वक्तव्यावरून संदीप देशपांडेंचा पलटवार, म्हणाले 'हटाओ लुंगी आणि बजाओ पुंगी'
नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरेंनी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर चांगलाच हल्लाबोल चढवला आहे. ते म्हणाले की, 'ही निवडणूक वॉटर गटर आणि मीटरची आहे.पण काहीजण इथे दुसरा मुद्दा उपस्थित करतात. त्यांचा वेगळाच प्रचार सुरु असतो. मला तुम्ही झोपेतून जरी उठून विचारलं तुम्ही काय केलं? मी अभिमानाने सांगेन की, मुंबई महापालिकेत जेव्हा 1997 मध्ये आपली सत्ता आली तेव्हा, मुंबई महापालिकेत 600 कोटींची तूट होती. तेव्हा कुठेही कर न लावता, कुठेही छुपा कर न लावता, तसेच कोणताही टोल न लावता या मुंबईत आपण ती तूट भरून काढली होती.'
आदित्य ठाकरेंनी वाचून दाखवला मुंबईच्या विकासाचा पाढा
'इथं हॉस्पिटल स्वत:चं आहे. ट्रॉमा सेंटर्स उभारले गेले आहेत. तसेच 1200 शाळा उभारलेल्या गेल्या आहेत, त्या शाळांमध्ये आठ माध्यमांचे विद्यार्थी शिक्षण घेतात. इंग्रजी, मराठी, गुजराती, तेलगु, कनाडा या भाषेत शिक्षण दिलं जातं. दप्तरातील ओझं कमी करण्यासाठी टॅब्स उपलब्ध करण्यात आले होते. मोफत बससेवा आणली होती. तसेच एसएससी बोर्डसह, आयबी, सीबीएससी, आयसीएससी बोर्ड आणले.'
कोस्टल रोडवरून लाव रे तो फोटो म्हणत आदित्य ठाकरे...
तसेच नंतर त्यांनी कोस्टल रोडवरून लाव रे तो फोटो म्हणत राज ठाकरेंचीच लिबरटी घेतली. तेव्हा त्या फोटोत एका बाजूला आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे दिसत आहेत. तेव्हा आदित्य ठाकरे म्हणाले की, 'हे जिओ टेक्निकल सर्व्हेचं काम आहे. इथं फडणवीस दिसताहेत का कुठे? जिओ टेक्निकल सर्व्हे म्हणजे काम सुरु होण्यापूर्वी ठरलं जातं. काम कसं केलं जाईल? माती कोणती वापरली जाईल? दगड कोणता वापरण्यात येईल? त्यात मी आहे, उद्धवसाहेब आहेत. तसेच देसाई आहेत, त्याचप्रमाणे मेहता देखील आहे. यात कुठे फडणवीस आहेत, यात जर फडणवीस दिसत असतील तर तीन हजार देतो', असा मिश्लीक टोला लगावत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं.
हे ही वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ठाकरे’ आजही मोठा ब्रँड? मुंबईतील लोकांना काय वाटतं? C Voter च्या सर्व्हेमध्ये नेमकं काय?
'जर मुंबईला जिंकवायचं असेल आणि दिल्लीसमोर ताठ मानेनं...'
अंतिमक्षणी आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना बोलताना सांगितलं की, 'या निवडणुकीत मशाल चिन्ह, तुतारी वाजवणारा माणूस आणि रेल्वे इंजिन या चिन्हासमोरील बटन दाबा. ते बोलताना म्हणाले की, 'तुम्हाला राज ठाकरेंना मतदान करायचं असेल तर कोणाला मतदान करणार? जर तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मतदान करायचं असेल तर कोणाला मतदान करणार? जर तुम्हाला मुंबईला जिंकवायचं असेल तर कोणाला मतदान करणार? 'जर दिल्लीसमोर मुंबईला ताठ मानेनं उभं ठेवायचं असेल, तर कोणाला मतदान करणार? हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना मतदान करायचं असेल तर कोणाला मतदान करणार? आपल्या भवितव्यासाठी मतदान करणार ते कोणाला मतदान करणार? मशाल, इंजिन आणि तुतारी हेच सर्विकडे वातावरण असलं पाहिजे. लढायला तयार आहत? जिंकायला तयार आहात? चला लढूया आणि जिंकूया.
ADVERTISEMENT











