Solapur Vidhan parshad election 2026 : सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना वरकरणी बहुमताची मजबूत साथ असल्याचे चित्र दिसत असले, तरी प्रत्यक्षात त्यांच्या वाटेत अनेक राजकीय अडथळे उभे राहत असल्याची चर्चा सुरू आहे. भाजप आणि महायुतीकडे संख्याबळ असल्याने निवडणूक सोपी मानली जात असली तरी मतदानाची वेळ जवळ येत असताना विविध मुद्दे पुन्हा चर्चेत येऊ लागले आहेत. स्वतः राजेंद्र राऊत यांनी मोठ्या मताधिक्याचा दावा केला असला, तरी जिल्ह्यातील काही जुने राजकीय वाद आणि स्थानिक समीकरणे त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
ADVERTISEMENT
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं प्रकरण
राऊत यांच्या अडचणींमध्ये सर्वाधिक चर्चिला जाणारा मुद्दा म्हणजे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संबंधित प्रकरण. बँकेतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्या प्रकरणामुळे जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते अडचणीत आल्याची चर्चा झाली होती. त्यानंतर राजकीय परिस्थिती बदलली असून त्यातील अनेक नेते आता भाजप किंवा महायुतीसोबत आहेत. त्यामुळे त्या काळातील घडामोडी आणि त्यातून निर्माण झालेली नाराजी निवडणुकीत परिणाम करू शकते का, याकडे लक्ष लागले आहे. राऊत यांनी मात्र आपण शेतकऱ्यांची बँक वाचवण्यासाठी भूमिका घेतल्याचे सांगत या आरोपांचे खंडन केले आहे.
हेही वाचा : सेंटर पॉइंटः राष्ट्रवादी कॉंग्रेस नेमकं चालवतंय कोण? ‘ही’ Inside स्टोरी वाचून तुम्हीही व्हाल हैराण!
दोन्ही बाजूंनी जोरदार संपर्क मोहिम
दुसरीकडे भाजपमधील अंतर्गत नाराजीचाही मुद्दा चर्चेत आहे. उमेदवारी प्रक्रियेमुळे काही भागांत नाराजी असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तसेच जिल्ह्यातील विविध नेत्यांमधील मतभेद आणि गटबाजीचाही फटका निवडणुकीत बसू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विरोधकांकडूनही या मुद्द्यांवर जोरदार राजकारण सुरू असून स्थानिक स्तरावरील मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे निवडणूक एकतर्फी होईल, असे चित्र सध्या तरी दिसत नाही.
कोण मारणार बाजी?
या निवडणुकीचा इतिहासही अनेक अनपेक्षित निकालांचा साक्षीदार राहिला आहे. त्यामुळे केवळ संख्याबळावर विजय निश्चित मानणे धोकादायक ठरू शकते, असे जाणकारांचे मत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्याभोवतीही राजकीय हालचाली वाढल्या आहेत. सध्या दोन्ही बाजूंनी जोरदार संपर्क मोहीम सुरू असून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे राजेंद्र राऊत अडचणींवर मात करतात की वसंतराव देशमुख बाजी मारतात, याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT











