मुंबई: भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांची काल (17 जुलै) विधीमंडळ परिसरात तुफान हाणामारी झाली. ज्या प्रकरणी दोन्ही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे आज (18 जुलै) विधानसभा अध्यक्षांनी हे प्रकरण कारवाईसाठी विशेष अधिकार समितीकडे सोपवलं आहे. पण निवदेनादरम्यान झालेल्या एका मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचंड संतापलेले पाहायला मिळाले.
ADVERTISEMENT
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निवेदनानंतर आमदार जितेंद्र आव्हाड हे बोलण्यास उभे राहिले. कालच्या हाणामारीच्या प्रकरणावर बोलताना आव्हाडांनी नंतर त्यांना व्हॉट्सअॅपवर आलेल्या धमकीचा उल्लेख केला. तेव्हा अध्यक्षांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे NCP (SP) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आव्हाडांना बोलू द्यावं बंदी करू नये असं अध्यक्षांना सांगितलं.
हे ही वाचा>> गोपीचंद पडळकरांच्या समोरच नितीन देशमुखांना मारहाण झाली, 'तो' Inside Video आला समोर
पण याचवेळी स्वत: मुख्यमंत्री उभे राहिले आणि त्यांनी या सगळ्या प्रकरणात राजकारण केलं जात आहे असा आरोप केला. त्यावेळी मुख्यमंत्री थेट असं म्हणाले की, 'आज या ज्या शिव्या बाहेर पडतायेत त्या काय एकट्या पडळकरला किंवा आव्हाडांच्या माणसाला नाही पडत आहेत. आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की, हे सगळे आमदार माजले म्हणून...' असं म्हणत फडणवीसांनी सगळ्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला.
हाणामारी प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिले 'हे' आदेश
'जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत आलेले अभ्यांगत नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्या समवेत आलेले अभ्यांगत सर्जेराव टकले या दोघांचे वर्तन सभागृहाच्या प्रतिमा आणि प्रतिष्ठेला मलीन करणारे असल्याने एक प्रकारे सभागृहाचे विशेष अधिकार भंग आणि अवमान त्यांनी केलं आहे. म्हणून त्यांच्याविरुद्ध चौकशी करून विशेष अधिकार भंग अवमानाची कारवाई करण्यास्तव मी हे प्रकरण विधानसभा विशेष अधिकार समितीकडे सुपूर्द करीत आहे.'
'जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर विधानसभा सदस्य यांनी या अभ्यांगतांना विधानभवनात आणले. त्यांनी अभ्यांगतांच्या आक्षेपार्ह आणि विधिमंडळाच्या प्रतिमा आणि प्रतिष्ठा मलीन करणाऱ्या कृतीबद्दल सभागृहात खेद व्यक्त करावा आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची हमी घ्यावी.' असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यावेळी म्हणाले.
गोपीचंद पडळकरांनी केला खेद व्यक्त
अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सांगितल्यानंतर गोपीचंद पडळकर म्हणाले की, 'आपण जी सूचना दिलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करेन आणि काल जी घटना घडली आहे त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो, आपली दिलगिरी व्यक्त करतो.'
'नितीन देशमुख माझ्यासोबत सभागृहात आला नव्हता', जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टपणे सांगितलं
पडळकरांनंतर बोलण्यासाठी जितेंद्र आव्हाड हे उभे राहिले. ते म्हणाले की, 'यानंतर अध्यक्ष महोदय, आपण बोलत असताना म्हणालात की, नितीन देशमुख माझ्याबरोबर आले होते.. तर सभागृहात येताना मी दररोज एकटाच येतो. माझ्याबरोबर मी कधीही कोणाला आणत नाही. माझ्या मागे फक्त माझा पीए चालत असतो. त्याशिवाय माझ्यासोबत कोणी नसतो. कधीही मी कोणाच्या पासवर सही करत नाही. कोणाला पासही देत नाही. त्यामुळे रेकॉर्डवर चुकीचं येऊ नये की, नितीन देशमुखांना मी घेऊन आलो.'
हे ही वाचा>> VIDEO: विधानसभेच्या परिसरात तुफान हाणामारी, पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची कपडे फाटेपर्यंत मारामारी!
'ते आपल्या ताब्यात आहेत ते.. आपण त्यांना विचारा की, ते कसे आले होते. त्यामुळे मी हे कृत्य करण्यास भाग पाडलं असं कुठेही महाराष्ट्रात समज होऊ नये. चुकीचं रेकॉर्डवर येऊ नये.'
'काल जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी सभागृहातही नव्हतो, परिसरातही नव्हतो. मी मरीन लाइन्समध्ये होतो. त्यामुळे या घटनेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे असा माझा कुठलाही संबंध नाही.'
'घटना घडावी म्हणून मी कोणाला उद्युक्त केलं का? तर तसंही नाही.. मी कोणाला खुणवलं का? तर तसंही केलं नाही.'
'अध्यक्ष महोदय, मी काल आपल्याकडे निवेदन केलं होतं की, माझ्या WhatsApp वर मला अत्यंत गलिच्छ भाषेत टीका करण्यात आली. मला मारण्याची धमकी देण्यात आली. मला बोलू द्या अध्यक्ष महोदय..' असं आव्हाड यावेळी म्हणाले.
आव्हाडांना बोलण्यास अध्यक्षांनी रोखलं अन्...
दरम्यान, आव्हाडांना मध्येच थांबवत अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, 'मला वाटतं या विषयाचं गांभीर्य या सभागृहातील सर्व सदस्यांनी घेणं आवश्यक आहे. तुम्हाला इतर सगळ्या गोष्टी मला दालनात येऊन मला सांगितलेल्या आहेत. त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून.. हे योग्य नाही. तुम्हाला हा विषय राजकीय करायचा असेल तर हे योग्य नाही.'
ज्यावर राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ आमदार जयंत पाटील यांनी अध्यक्षांना सांगितलं की, 'त्यांना (आव्हाडांना) जी धमकी मिळाली त्याचा उल्लेख करायला बंदी करणं हे योग्य नाही. त्यांना बोलू द्या ना...'
'हे सगळे आमदार माजले असं लोकं बाहेर बोलतात'
या सगळ्या प्रकरणात जयंत पाटलांनी हस्तक्षेप केल्यानंतर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उभे राहिले आणि बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की, 'अध्यक्ष महोदय, धमकीचा उल्लेख करायला कोणाचीही बंदी नाही. विषय काय चाललेला आहे.. आज अध्यक्षांनी एखादा विषय किंवा प्रस्ताव मांडल्यानंतर.. कधी तरी आपण राजकारणाच्या पलीकडे जाणार आहात की नाही?'
'एक विषय जर अध्यक्षांनी मांडला, एक निर्देश अध्यक्षांनी दिला आहे.. हे बघा जयंतराव, आपण एक लक्षात ठेवा की, आपण फार सीनियर आहात. ही प्रतिष्ठा काय कोण्या एका व्यक्तीची नाही.. इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा ही खराब झाली आहे.'
'आज या ज्या शिव्या बाहेर पडतायेत त्या काय एकट्या पडळकरला किंवा आव्हाडांच्या माणसाला नाही पडत आहेत. आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की, हे सगळे आमदार माजले म्हणून...'
'जरा काही गांभीर्याने घ्या.. ही प्रत्येक गोष्ट अशी राजकीय करून आपण महाराष्ट्रातील जनतेला काय सांगणार आहोत जयंतराव? हे बरोबर नाही. अशाप्रकारे समर्थन करणं योग्य नाही.' असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या प्रकरणी संताप व्यक्त केला.
ADVERTISEMENT
