EVM मतदानाची फेरमतमोजणी, सुप्रीम कोर्टामुळे हरलेला उमदेवार जिंकला.. देशातील पहिलीच घटना प्रचंड चर्चेत

एका ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हा EVM मुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. कारण ईव्हीएमची फेरमतमोजणी करण्याचे आदेश थेट सर्वोच्च न्यायालयाने दिले. ज्यानंतर निवडणुकीचा निकाल हा पूर्णपणे वेगळा लागला. जाणून घ्या हे संपूर्ण प्रकरण काय आहे.

Mumbai Tak

निलेश झालटे

• 05:33 AM • 17 Aug 2025

follow google news

नवी दिल्ली: EVM मध्ये गडबड असल्याच्या घटनांचे दाखले वारंवार दिले जात असतात. ईव्हीएमवर सातत्यानं विरोधकांकडून बोट ठेवलं जातं आहे. आता सर्वोच्च न्यायालयानंच ईव्हीएमद्वारे झालेल्या निवडणुकाचा निकाल जागेवर फिरवत दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयात ईव्हीएमची फेरमतमोजणी झाल्यानंतर पराभूत उमेदवाराला 51 मतांनी विजयी घोषित करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ईव्हीएममधील मतांची पुन्हा मोजणी करण्यात आली. यानंतर हरियाणातील एका पंचायत निवडणुकीचा निकाल जागेवर फिरला. 

हे वाचलं का?

नेमकं प्रकरण काय?

देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच खटला असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना मराठ्यांनी पराक्रम गाजवलेल्या पानीपत जिल्ह्यातील आहे. पानिपतमधील बुआना लाखू ग्राम पंचायतीच्या निवडणूक निकालावरुन वाद झालेला. हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. न्यायालयाच्या निकालानंतर मतांची फेरमोजणी करण्यात आली.

हे ही वाचा>> "भाजप आणि निवडणूक आयोगाने मिळून मतं चोरली, महाराष्ट्रात तर..", महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत राहुल गांधींचा मोठा गौप्यस्फोट

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने फेरमतमोजणी करण्यास नकार दिला होता. याविरुद्ध पराभूत सरपंचाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. बुआना लाखू पंचायतीची निवडणूक 2 नोव्हेंबर 2022 रोजी झाली होती. यामध्ये कुलदीप सिंह यांना विजयी घोषित करण्यात आलं. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मोहित कुमार यांनी आक्षेप घेतला. त्यांनी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल करत निकालाला आव्हान दिलं.

तिथवरच प्रकरण थांबलं नाही, तर नंतर उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालय असा या प्रकरणाचा प्रवास झाला. 1 जून 2025 रोजी उच्च न्यायालयाने मतांची पुनर्मोजणी करण्यास नकार दिला आणि कुलदीप यांच्या बाजूने निर्णय दिला. 12 जून रोजी मोहित यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.

हे ही वाचा>> राहुल गांधींनी दाखवली 'ती' मतदार यादी, पुरावे अन्... Voter list मध्ये नेमकी काय गडबड? समजून घ्या क्रोनोलॉजी

सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं सगळ्याच बूथवरील ईव्हीएम आणि निवडणूक रेकॉर्ड सादर करण्याचे आदेश दिले. सगळ्या बूथवरील मतांची फेरमोजणी करण्याचे आदेश न्यायालयानं दिलं. संपूर्ण प्रक्रियेची व्हिडीओग्राफी करण्याच्या सूचना केल्या.

हरलेला उमेदवार जिंकला

7 जुलै रोजी देखरेखीखाली पुनर्मोजणीचे आदेश देण्यात आले. त्यामध्ये कुलदीप यांना 1000 तर मोहित यांना 1051 मते मिळाली. यानंतर, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आणि 11 ऑगस्टची तारीख दिली. 11 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने मोहित यांना विजयी घोषित केले आणि जिल्हा प्रशासनाला दोन दिवसांत शपथ घेण्याचे आदेश दिले. नवनिर्वाचित सरपंच मोहित मलिक यांना शपथ दिली. 
 
ईव्हीएमद्वारे झालेल्या निवडणुकीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर फेरमतमोजणीतून बदलला गेल्याची ही देशाच्या इतिहासातील पहिली घटना असल्यानं याची जोरदार चर्चा सुरु आहे.

    follow whatsapp