'देवा भाऊ तुम्ही शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला...', कोण संतापलं एवढं?

इम्तियाज मुजावर

• 07:00 AM • 25 Mar 2026

Satara ZP: 'मोठा भाऊ म्हणत तुम्ही पाठीत खंजीर खुपसला..' असा थेट आरोप सातारा झेडपी निवडणुकीवरून रेश्मा जगताप यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केला आहे.

Mumbai Tak
Google CTA

Shiv Sena vs BJP: सातारा: सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत झालेल्या गोंधळ आणि कथित दडपशाहीमुळे महायुतीत तणाव वाढला असून, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कडून जिल्हा प्रशासनाविरोधात काल (24 मार्च) भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने महिला शिवसैनिक आणि पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते.

हे वाचलं का?

नेमकं काय घडलं साताऱ्यात?

शिवसेना संपर्कप्रमुख तथा ज्येष्ठ महिला नेत्या रेश्मा जगताप यांनी या मोर्चादरम्यान भाजपवर जोरदार टीका करत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला. रेश्मा जगताप म्हणाल्या, “भाजप हा शिवसेनेचा मोठा भाऊ आहे, पण साताऱ्यातील अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत देवा भाऊ, तुम्ही शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. तुम्ही लाडक्या बहिणीचा अपमान केला. जर खरोखर मोठा भाऊ म्हणून आम्हाला मानत असाल, तर त्या दिवशीच्या निवडणुकीला जबाबदार असलेल्या जुलमी पोलीस अधीक्षकांसह सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा.”

हे ही वाचा>> मंत्री शंभुराज देसाईंचं रक्त काढलं, मराठा आंदोलन लाठीमार अन् बिद्रे प्रकरणातही आरोप आणि दोशी?

तसेच त्यांनी आणखी कडक इशारा देताना त्या म्हणाल्या, “आज आम्ही शांततेत मूक मोर्चा काढला आहे; मात्र प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर वेळप्रसंगी आम्ही आमरण उपोषणाला बसू.”

निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळात पोलिसांनी काही सदस्यांना अटक केल्याचा, मंत्र्यांना धक्काबुक्की केल्याचा आणि मतदान प्रक्रियेत पक्षपाती भूमिका घेतल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मोर्चात उपस्थित महिला शिवसैनिकांनी जिल्हा प्रशासन, पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

हे ही वाचा>> साताऱ्याच्या ZP राड्यानंतर एकनाथ शिंदे विधानसभेत आक्रमक, देवेंद्र फडणवीसांचा तातडीने मोठा निर्णय

या घटनेचे पडसाद आधीच विधिमंडळात उमटले असून, उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशींसह संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते (जो निर्णय नंतर राखून ठेवण्यात आला). सातारा जिल्हा परिषदेत भाजपने प्रथमच अध्यक्षपद जिंकले असले तरी, या निवडीत ‘ऑपरेशन लोटस’सारख्या आरोपांसह प्रचंड गदारोळ झाला होता. 

या मोर्चामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. महायुतीतील ‘मोठा भाऊ-लाडकी बहीण’ संबंधांवर रेश्मा जगताप यांच्या टीकेने नव्या चर्चेला उधाण आले आहे. प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

रेश्मा जगताप यांच्या या आक्रमक भूमिकेने शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ते देखील आक्रमक झाले असून, प्रकरण पुढे कसे वळण घेते याकडे राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.