Uddhav Thackeray on Mahayuti Goverment : "कागदी घोडे नाचवण्यापेक्षा सरकारने शेतकऱ्यांमध्ये गेलं पाहिजे. त्यांना काय हवं नको ते पाहिलं पाहिजे. केंद्राचं पथक राज्यातील पूरस्थिती पाहाण्यासाठी कधी येणार? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुजरे मारायला दिल्लीत जातात. महाराष्ट्र संकटात असताना शेतकऱ्यांच्या मागणीसाठी त्यांनी दिल्लीत जायला हवं", असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. ते मातोश्रीवर पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मगाणी देखील सरकारकडे केली.
ADVERTISEMENT
हेही वाचा : बळीराजा नैराश्यात, मुलाच्या आत्महत्येनंतर बापाने जीव सोडला, धुळ्यात शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आयुष्य संपवलं
सध्या महाराष्ट्र अतिवृष्टीच्या संकटाला सामोरं जात आहे. मी स्वतःही अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. मी सरकारला हात जोडून विनंती करतो की, राजकारण न करता सर्वांनी मिळून उपाय शोधले पाहिजेत. पण दुर्दैवाने मुख्यमंत्री जाहिरातींमध्ये गुंतले आहेत, एक उपमुख्यमंत्री पाकिटांवर आपले फोटो छापण्यात व्यग्र आहेत, तर दुसरे उपमुख्यमंत्री दिसेनासे झाले आहेत आणि शेतकरी मात्र अडचणीत सापडले आहेत. अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 50 हजार रुपये तातडीने मदत देण्याची मागणी केली.
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रती टन 5 रुपये आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 10 रुपये, अशा मिळून टनामागे 15 रुपये कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एका बाजूला शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लावत दुसऱ्या बाजूला मदत केली जात आहे, यावरूनही ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. आज साखरसम्राट भाजपमध्ये गेले आहेत, त्यांचे कर्ज सरकार फेडणार आहे. मग शेतकरी फक्त भाजपात गेले तरच त्यांची कर्जमुक्ती होणार आहे का? म्हणूनच भाजप मदत थांबवून बसली आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
“तुम्ही साखरसम्राटांना माफी देता, पण आम्ही गरीब शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी करतोय. ज्यांच्यावर जमिनी आणि मंगळसूत्र गहाण ठेवण्याची वेळ आलेली आहे, अशा शेतकऱ्यांना पीकहानीमुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबून जावं लागतंय.” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.
हेही वाचा : मुंबईतील वृद्ध नागरिकाला 70 लाख रुपयांना गंडा... भामट्यांनी सरकारी अधिकारी असल्याची खोटी ओळख सांगितली अन्...
ADVERTISEMENT
