उद्धव ठाकरे अचानक रात्रीच पोहचले जंतर-मंतरवर, दिपकेच्या पाठीवर थाप अन् घणाघाती भाषण! जसंच्या तसं..

मुंबई तक

• 12:03 AM • 22 Jul 2026

Uddhav Thackeray Speech: दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट देत पाठिंबा दिला. पाहा त्यावेळी उद्धव ठाकरे काय म्हणाले.

uddhav thackeray supports neet protest uddhav thackeray joins students at jantar mantar change system not just government a scathing attack on Modi government

Uddhav Thackeray at Jantar Mantar

Google CTA

नवी दिल्ली: NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता राजकीय पाठिंबा वाढताना दिसत आहे. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनस्थळी जाऊन CJP (Collective Justice Platform) चे संस्थापक अभिजीत दिपके आणि आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना धीर देत केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला लोकशाहीची लढाई संबोधत, सरकारने आंदोलन दडपण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करावा, असे म्हटले.

'विद्यार्थ्यांना कॉकरोच म्हणणाऱ्यांना इतिहास माहीत नाही'

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हटले,

"ज्यांनी तुम्हाला 'कॉकरोच' म्हटलं... त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. हा देश कोणत्याही एका पक्षाने बनवलेला नाही. स्वातंत्र्यासाठी तुमच्यासारख्याच वयाच्या क्रांतिकारकांनी बलिदान दिलं, म्हणून आपण आज स्वतंत्र भारतात उभे आहोत."

त्यांनी पुढे ब्रिटिश राजवटीचा संदर्भ देत म्हटले की, त्या काळात क्रांतिकारकांनाही 'दहशतवादी' म्हटलं जात होतं. आज आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरही त्याच प्रकारची भाषा वापरली जात असल्याची टीका त्यांनी केली.

'विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज लोकशाहीला शोभणारा नाही'

उद्धव ठाकरे यांनी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईवरही तीव्र नाराजी व्यक्त केली.

"काल ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली, ती अत्यंत दुर्दैवी होती. पण आज प्रत्येकाच्या हातात मोबाइल आहे. त्यामुळे सत्य लपवता येणार नाही."

विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून घटना जगासमोर आणल्याचेही त्यांनी कौतुक केले.

हे ही वाचा>> राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, नाकही फुटलं.. मोदींच्या घराबाहेर काय-काय घडलं?

'आज ते सत्तेत आहेत, उद्या तुम्ही असाल'

विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवताना उद्धव ठाकरे म्हणाले,

"आज कदाचित ते सत्तेच्या खुर्चीवर बसले आहेत. पण उद्या त्या खुर्चीवर तुमच्यापैकी अनेक जण बसतील. काळ कायम एकसारखा राहत नाही."

ठाकरेंकडून अभिजीत दिपकेचे कौतुक

CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांचे नाव घेत उद्धव ठाकरे म्हणाले की, ते अमेरिकेत शिक्षण घेत असतानाही भारतात येऊन विद्यार्थ्यांसाठी लढत आहेत, ही मोठी गोष्ट आहे.

"स्वतःच्या करिअरपेक्षा देशातील विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय त्यांना अधिक महत्त्वाचा वाटला. हीच खरी युवा शक्ती आहे."

पेपरफुटीमुळे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उल्लेख

उद्धव ठाकरे यांनी पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचा उल्लेख करत भावनिक भूमिका मांडली.

"स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांना आपण आठवतो. पण पेपरफुटीमुळे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आपण विसरता कामा नये."

हे ही वाचा>> पोटची दोन्ही पोरं पोलिसांच्या ताब्यात, आई सोनिया गांधींची पोलीस ठाण्यात धाव अन्...

'फक्त सत्ता बदलून चालणार नाही'

आपल्या भाषणातील सर्वात महत्त्वाच्या विधानात उद्धव ठाकरे म्हणाले,

"फक्त सत्ता बदलून काही होणार नाही. संपूर्ण व्यवस्था बदलावी लागेल. जोपर्यंत व्यवस्था बदलत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या आयुष्यात खरा बदल होणार नाही."

'ही ठिणगी संपूर्ण देशात पोहोचली पाहिजे'

आंदोलनाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, दिल्लीत सुरू झालेली ही लढाई संपूर्ण देशात पोहोचली पाहिजे.

"या आंदोलनाची ठिणगी कधीही विझता कामा नये. महाराष्ट्र या आंदोलनाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मला अभिमान आहे की, महाराष्ट्रातील एक युवक या आंदोलनाचे नेतृत्व करत आहे."

'मी हिंमत द्यायलाच नाही, हिंमत घ्यायलाही आलोय'

विद्यार्थ्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले,

"मी फक्त तुमचं मनोबल वाढवायला आलो नाही, तर तुमच्याकडून प्रेरणा आणि हिंमत घ्यायलाही आलो आहे.''

'One Nation, One Emotion'

देशातील सामाजिक ऐक्यावर भर देत उद्धव ठाकरे म्हणाले,

"धर्माच्या नावावर उभ्या केलेल्या भिंती कोसळल्या पाहिजेत. राष्ट्र सर्वात मोठं आहे. One Nation, One Emotion."

अभिजीत दिपकेने मानले उद्धव ठाकरेंचे आभार

यावेळी अभिजीत दिपकेने उद्धव ठाकरे यांचेही आभार मानले. आंदोलन सुरू झाल्यापासून ते सातत्याने संपर्कात असून, विद्यार्थ्यांची विचारपूस करत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी पार्क येथे आंदोलनाच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

मोबाइल टॉर्चने आंदोलनकर्त्यांची एकजूट

दरम्यान, सभेच्या शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांनी मोबाइलची टॉर्च सुरू करून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. यावेळी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' आणि 'जय हिंद, जय भारत' अशा घोषणांनी जंतर-मंतर परिसर दुमदुमून गेला.