विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, विवेकानंद पाटीलने नकार का दिला?

मुंबई तक

• 08:11 AM • 07 Oct 2026

काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी विवेकानंदच्या आई-वडिलांसाठी नवीन घर बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, "मला माझ्या गरिबीचे भांडवल करायचे नाही," असे सांगत विवेकानंदने माईकवरून नम्रपणे ही ऑफर नाकारली.

MPSC Protest

MPSC Protest

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो

point

विवेकानंद पाटीलने नकार का दिला?

MPSC Protest : पुण्यातील एमपीएससी (MPSC) आंदोलनस्थळी कोल्हापूरच्या विवेकानंद पाटील या विद्यार्थ्याने आपल्या स्वाभिमानी कृतीने उपस्थितांची मने जिंकली आहेत. काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी आंदोलनाच्या व्यासपीठावरून विवेकानंदच्या घरच्या बिकट परिस्थितीची दखल घेत नवीन घर बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, "मला माझ्या गरिबीचे आणि परिस्थितीचे भांडवल करायचे नाही," असे सांगत विवेकानंदने माईकवरून अत्यंत नम्रपणे ही ऑफर नाकारली. त्याच्या या स्वाभिमानी आणि कणखर भूमिकेचे सोशल मीडियासह संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत असून त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली जात आहेत.

हे वाचलं का?

'त्यांनीही गरीबीचे भांडवल केले नाही...'

आपल्या भाषणात भूमिकेचे समर्थन करताना विवेकानंदने तुकाराम मुंढे, लेखक शरद बाविस्कर, डीवायएसपी कृष्णा पिंगळे आणि स्व. पतंगराव कदम यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांची उदाहरणे दिली. या सर्वांनी अत्यंत बिकट परिस्थितीतून मार्ग काढत यश मिळवले, परंतु कधीही आपल्या गरिबीचे भांडवल केले नाही, अशी आठवण त्याने करून दिली. घरापेक्षा आपल्या पाठीशी उभ्या असलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा आणि भवितव्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा असल्याचे सांगत त्याने उपस्थितांची दाद मिळवली.

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात कोरडं हवामान, 'या' जिल्ह्यांत उष्णतेची लाट

70 हजारांच्या मेगाभरतीचा प्रश्न सोडवावा

या वेळी विवेकानंदने MPSC आंदोलनाच्या मुख्य मागण्यांवर पुन्हा एकदा जोर दिला. आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा, आयोगाच्या संपूर्ण बॉडीचे पुनर्रचना (रिस्ट्रक्चरिंग) करण्यात यावे आणि पेपरफुटी प्रकरणांची एसआयटी (SIT) चौकशी करून वीर-आधार समितीचा अहवाल सार्वजनिक केला जावा, अशी मागणी त्याने केली. तसेच गट 'ब' आणि 'क' मधील गैरप्रकारांवर कडक कारवाई करत 70 हजार पदांच्या मेगा भरतीचा प्रश्न त्वरित सोडवण्याची गरज त्याने व्यक्त केली. आंदोलनाला 'राजकीय' किंवा 'पेड' असे लेबल लावणाऱ्यांवर टीका करत, विद्यार्थ्यांच्या मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित करू नये, असे आवाहनही त्याने केले.

हे ही वाचा : Personal Finance: तुमच्या घरातील कोणत्या वस्तूंचा Insurance असायला हवा आणि कोणाचा नसावा?

प्लॅन बी काय?

आपल्या भाषणाचा शेवटी विवेकानंदने सरकारला इशारा देत संताप व्यक्त केला. परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणि सुधारणा न झाल्यास तरुण वर्ग आगामी काळात आपला 'प्लॅन बी' दाखवून देईल, असा इशारा त्याने दिला. परिस्थितीचे भांडवल न करता संघर्षाचा मार्ग निवडणाऱ्या विवेकानंद पाटीलच्या या भूमिकेने आंदोलनाला एक नवीन नैतिक बळ मिळाले आहे. लोकप्रतिनिधींनी मदतीचा हात पुढे केला असला, तरी स्वतःच्या स्वाभिमानाशी तडजोड न करणाऱ्या या विद्यार्थ्याच्या बाण्यामुळे पुण्यातील एमपीएससी आंदोलनाची चर्चा आता राज्यभरात रंगली आहे.